‘क्षमायाचना करतांना उजव्या हाताने डावा कान आणि डाव्या हाताने उजवा कान धरून केलेली प्रार्थना, म्हणजे अहं-निर्मूलनासाठी केलेला छोटासा शुद्धीयज्ञच !
१. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगूनही आश्रमात परत येण्यास एक मास विलंब करणे आणि त्यासाठी क्षमायाचना करण्यासाठी त्यांच्या समोर दोन्ही कान पकडून बसणे
‘वर्ष २०१९ मध्ये मी देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात सेवेसाठी रहात होतो. दिवाळीनिमित्त मी काही दिवस अकोला येथे घरी गेलो होतो. त्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला दिवाळी होताच लगेच आश्रमात परत येण्यास सांगितले होते; पण मला आश्रमात परत येण्यास एक मास विलंब झाला. मी ‘माझ्याकडून ही चूक झाली. आता परात्पर गुरु पांडे महाराज यांना कसे भेटायचे ?’, या विचारात होतो. त्याच वेळी ते त्यांच्या खोलीतून बाहेर पडतांना मला दिसले. तेव्हा त्यांनी मला प्रेमाने त्यांच्या खोलीत बोलावून घेतले. मी भीतभीतच त्यांच्या खोलीत गेलो. ते काही बोलायच्या आतच मी माझे दोन्ही कान धरून क्षमायाचना करण्यासाठी त्यांच्या चरणांजवळ बसलो.
२. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी क्षमायाचना करतांना ‘उजव्या हाताने डावा कान आणि डाव्या हाताने उजवा कान धरणे’ या कृतीचे सांगितलेले लाभ
माझ्या मनातील अपराधीपणा परात्पर गुरु पांडे महाराज यांनी लगेच जाणला आणि त्यांनी मला ‘उजव्या हाताने डावा कान अन् डाव्या हाताने उजवा कान धरून क्षमायाचना केल्यास कसे लाभ होतात ?’, ते सांगितले. ते येथे दिले आहेत.
अ. उजव्या हाताने डावा कान आणि डाव्या हाताने उजवा कान धरून क्षमायाचना केल्याने स्वभावदोषांच्या तुलनेत घेतलेल्या प्रायश्चित्तांचे संतुलन राखले जाते.
आ. उजवी बाजू ही सूर्यनाडीची आहे आणि डावी बाजू चंद्रनाडीची आहे. जसा चंद्र सूर्यामुळे प्रकाशित होतो, तसे सूर्यनाडीच्या प्रभावामुळे आपल्या पापांचे क्षालन होते.
इ. डावी बाजू ही निषिद्ध मानली जाते. पापकर्मे ही स्वभावदोषांमुळेच घडतात. ती पापे नष्ट व्हावीत; म्हणून डाव्या हाताने उजवा कान धरावा. उजव्या हाताने डावा कान धरला की, सूर्यनाडीच्या प्रभावाने स्वभावदोष आणि पापे नष्ट होतात, तसेच डाव्या हाताने उजवा कान धरला असता सूर्यनाडीच्या प्रभावाने डाव्या बाजूला ऊर्जा मिळून अपराधीभाव निर्माण होतो.
ई. अपराधीभाव निर्माण झाल्यामुळे चुकांची खंत वाटते. खंत वाटल्यामुळे शरणागतभाव निर्माण होतो. शरणागतभावाची स्थिती निर्माण झाल्यामुळे डोळ्यांतून भावाश्रू येतात. ‘भाव तोची देव’ या उक्तीनुसार दयाळु गुरुमाऊली कृपावंत होऊन आपल्याला क्षमा करतात.
उ. महत्त्वाचे म्हणजे उजव्या हाताने डावा कान आणि डाव्या हाताने उजवा कान धरून क्षमायाचना करणे, म्हणजे अहं-निर्मूलनासाठी केलेला एक छोटासा शुद्धीयज्ञच आहे.’
– श्री. श्याम राजंदेकर, अकोला (वय ७८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) (२३.८.२०२३)