काँग्रेसला उतरती कळा !
चंडीगड येथील काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांना अमली पदार्थांच्या संदर्भातील वर्ष २०१५ मधील प्रकरणात पंजाब पोलिसांनी नुकतीच अटक केली. अमली पदार्थांच्या प्रकरणातील आरोपी असण्यासह बनावट पारपत्र बनवणार्यांना पाठिंबा दिल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. या प्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला होता. असे असतांनाही अटकेच्या वेळी खैरा यांनी पोलिसांसमवेत वाद घातला, तसेच अटकेचे कारण विचारले आणि वॉरंटची मागणी केली. यावरूनच काँग्रेसी नेत्यांचा उद्दामपणा आणि अरेरावी दिसून येते. खैरा यांनी या अटकेला विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि ‘माझ्यावरील ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित होऊन करण्यात येत आहे’, असे सांगून आरोपाचा ठपका पंजाबमधील आप सरकारवर ठेवला. काँग्रेससह शिरोमणी अकाली दल यानेही या कारवाईचा निषेध केला आहे. ‘खैरा यांनी आपचे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा यांच्या विवाहाच्या वेळी करण्यात आलेल्या अवाढव्य व्ययाच्या संदर्भात प्रश्न विचारला होता. यामुळे त्यांना अटक करण्यात आली’, असे काँग्रेसींचे म्हणणे आहे. शिक्षेस जितका विलंब, तितके आरोप-प्रत्यारोपांचे प्रमाणही विनाकारण वाढते. हे लक्षात घेऊन पोलिसांनीही प्रत्येक गुन्ह्यातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा कशी होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. खैरा यांची राजकीय पार्श्वभूमीही काही प्रमाणात वादग्रस्तच आहे. खैरा हे पूर्वी आपमध्ये होते; पण तेव्हाही आपच्या पंजाबमधील प्रमुख नेत्यांनी खैरा यांचा पक्षप्रवेश रोखला होता. त्यानंतर त्यांना पक्षातील अडचणींमुळे पंजाब विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावरून काढून टाकण्यात आले होते.
‘इंडिया आघाडी’ची ऐशीतैशी !
खैरा यांच्या अटकेनंतर झालेल्या वादंगामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी ज्या ‘इंडिया आघाडी’मध्ये काँग्रेस पक्ष सहभागी झाला, त्यातीलच पक्षावर, म्हणजे आपवर काँग्रेस आरोप करत असेल, तर अशी एकजूट काय कामाची ? पक्षाची वाटचाल चालू होण्याच्या अगोदरच हे पक्ष एकमेकांवरील कुरघोडीमुळे फुटल्यास नवल ते काय ? काँग्रेस-आप यांच्यातील विरोधामुळे ‘इंडिया आघाडी’चा फोलपणाच उघड होत आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधीच त्यांच्यात एकमेकांमध्ये वाद चालू झाले आहेत. तुमचेच लोक तुम्हाला अटक करत आहेत. मग हातात हात घालून सत्तेची स्वप्ने पाहून काय उपयोग ? ‘केवळ देशाला दाखवण्यासाठी यांची आघाडी आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काँग्रेसचे ‘खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे ’ आहेत. काँग्रेसची सर्वच राज्यांमध्ये दुर्दशा झालेली आहे. असे असतांना अशी फौज देश कसा चालवणार ? केवळ सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आलेले पक्ष देशाचे भवितव्य काय घडवणार ? ‘निवडणुकांनंतर आघाडीकडे सत्ता गेली’, असे जरी मानले, तरी देशात किती मोठ्या प्रमाणात अराजक घडेल, याची कल्पनाही करवत नाही. त्या परिस्थितीला कोण सामोरे जाणार ? हा तर केवळ प्रारंभ आहे. यातूनच आघाडीचा खरा चेहरा एक ना एक दिवस जनतेसमोर येणारच आहे. इतक्यातच एकमेकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतील, तर २८ राजकीय पक्षांची मिळून झालेली आणि आतापासूनच ४ दिशांना तोंडे असणारी ‘इंडिया आघाडी’ देश कसा चालवणार ? प्रत्येक पक्षाला स्वत:चा नेता पंतप्रधानपदाच्या खुर्चीत दिसत आहे. प्रत्यक्षात हे असे होणे अशक्य आहे. अशा बिनबुडाचे विचार करून हातात काय येणार ? या आणि अशा स्वरूपाच्या घटनांमुळे आघाडीकडे भारतीय जनता एक ‘हास्यविनोद’ म्हणून पहात आहे. याचा ‘इंडिया आघाडी’मधील सर्वच पक्षांनी गांभीर्याने विचार करावा. आघाडीच्या माध्यमातून चालू असलेली फसवेगिरी निश्चितच जनतेसमोर येईल आणि ‘इंडिया आघाडी’चे वास्तव लोकांना समजेल.
भारताची डोकेदुखी : काँग्रेस !
भारतावर ५४ वर्षांहून अधिक काळ राज्य करतांना काँग्रेसची जी मानसिकता होती, तिच्यात कोणताही पालट झालेला नाही. काँग्रेसला केवळ आणि केवळ सत्ता अन् पैसा इतकेच हवे आहे. तिला देश किंवा देशातील नागरिक यांच्याशी काहीही देणेघेणे नाही. देशाच्या उन्नतीचेही तिला काही पडलेले नाही. मग तो पैसा कुठून का मिळेना ! भ्रष्टाचारातून येऊ दे, देशाला फसवून येऊ दे किंवा दलाली करून मिळवलेला असू दे, काँग्रेसवाल्यांना त्याचीच हाव आहे. त्यामुळेच तर खैरा यांच्यासारख्यांना अटक होते.
काँग्रेसचे खैरा यांनी पंजाबमध्ये ‘जंगलराज’ चालू असल्याचा आरोप केला आहे. जर असे आहे, तर मग ‘जंगलराज’मधील ‘जंगली’ आहेत तरी कोण ?’ याचे उत्तर काँग्रेसी किंवा खैरा देतील का ? वर्ष २०१५ मधील प्रकरणात खैरा यांच्यावर आरोप करण्यात आले होते; पण मध्यंतरी पंजाबमधील काँग्रेस सरकारने हा खटला दाबून ठेवला. आता आप सरकार आल्यावर त्यांचे बिंग उघड झाले. मग यात प्रत्यारोपाचे सूत्र येतेच कुठे ? दोन वर्षांपूर्वी अभिनेते शाहरूख खान यांच्या मुलाला अमली पदार्थांच्या प्रकरणी अटक केली असतांना काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार के.टी.एस्. तुलसी म्हणाले होते, ‘‘अमली पदार्थ म्हणजेे प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग आहे. अमली पदार्थ आयुष्यातील वेदना न्यून करतात. त्यामुळे आवश्यकता असल्यास अमली पदार्थांच्या वापरास मान्यता का दिली जाऊ नये ?’’ ही आहे काँग्रेसींची मानसिकता ! काँग्रेसने गेल्या १३८ वर्षांमध्ये स्वतःचे असे चरित्रच निर्माण केले नाही. शेवटी काय, तर स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारून घेण्याची वेळ तिच्यावर ओढवली आहे. काँग्रेसला इतक्या मोठ्या कालावधीत जे जमले नाही, ते भाजप काही वर्षांत करून दाखवत आहे. आजवर केवळ अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करणार्या, दंगल, तसेच जात-पातविरोधी कारवाया घडवणार्या, आतंकवादी आणि देशद्रोही यांचे समर्थन करून जे.एन्.यू.सारख्या शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून राष्ट्रद्वेषी गरळओळ करू पहाणार्या काँग्रेसला येत्या निवडणुकांच्या वेळी जनतेने लक्षात ठेवायला हवे.
अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जाणार्या सत्तालोलुप काँग्रेसला येत्या निवडणुकीत लक्षात ठेवा ! |