परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे जिवावर बेतलेल्या अपघातातून वाचल्यावर समष्टी सेवांचे दायित्व स्वीकारून नेहमी आनंदी रहाणारी कु. वैशाली नागेश गावडा !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे जिवावर बेतलेल्या अपघातातून वाचल्यावर समष्टी सेवांचे दायित्व स्वीकारून नेहमी आनंदी रहाणारी खानापूर (बेळगाव) येथील कु. वैशाली नागेश गावडा (वय २३ वर्षे) !
शरीराची कल्पनातीत हानी करणारा अपघात झाल्यावर कुणी तो स्वीकारून अनेक सेवा करू शकेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. अशा सेवेचा आदर्श वैशालीने सर्वांसमोर ठेवला आहे. तसे करणार्या कु. वैशाली नागेश गावडा हिचे कौतुक करावे तेवढे थोडे ! अशा तर्हेने सेवा करून वैशाली साधनेत लवकरच जलद प्रगती करेल, याची मला खात्री आहे.
– परात्पर गुरु डॉ. आठवले |
१. महाविद्यालयातून घरी जातांना दुचाकीला अपघात होऊन बेशुद्ध पडणे आणि समोरून येणारी गाडी हातावरून गेल्याने हाताचा चुरा होऊन पुष्कळ रक्तस्राव होणे
‘मी महाविद्यालयात शिकत होते. १४.११.२०१६ या दिवशी दुपारी ३ वाजता मी दुचाकीवरून घरी येत होते. त्या वेळी पाठीमागून एक गाडी आली आणि ती माझ्या गाडीला धडकली. मी खाली पडले आणि बेशुद्ध झाले. त्याच वेळी समोरून एक गाडी आली. ती गाडी माझ्या डोक्यावरूनच जाणार होती; पण देवाच्या कृपेने ती माझ्या हातावरून गेली. त्यामुळे माझ्या हाताला मार लागून पुष्कळ रक्तस्राव झाला. ही माझी अवस्था पाहून तेथील लोकांनी ‘मी मृत झाले आहे’, असे समजून मला शवचिकित्सा करण्यासाठी (‘पोस्टमॉर्टेम’साठी) नेले. तेथे शवचिकित्सा करण्याची सर्व सिद्धता झाली होती; पण तेवढ्यात माझ्या उजव्या पायाच्या बोटांची हालचाल झाली. त्यानंतर मला लगेच बेळगावच्या ‘के.एल्.ई.’ रुग्णालयात नेले.
२. रुग्णालयात भरती करतांना आलेल्या अडचणी
माझी अवस्था पाहून रुग्णालयातील अधिकारी २ लाख रुपये दिल्याविना मला रुग्णालयात भरती करून घेत नव्हते. माझ्या बाबांनी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले; कारण तेव्हा नोटबंदी झाली होती. बाबांनी कसेतरी २ लाख रुपये जमा करून मला रुग्णालयात भरती केले. त्यानंतर माझ्यावर उपचार चालू झाले.
३. रुग्णालयात भरती केल्यावर घडलेला घटनाक्रम
३ अ. आधुनिक वैद्यांनी जगण्याची निश्चिती न देणे : आधुनिक वैद्य माझ्या जगण्याची शाश्वती देत नव्हते. त्यांनी सांगितले, ‘हिचा जीव तरी जाईल किंवा हात तरी कापावा लागेल.’’ तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, ‘‘मुलीचा हात गेला, तरी चालेल; पण माझी मुलगी जगली पाहिजे.’’ बाबांनी असे म्हटल्यावर आधुनिक वैद्यांनी माझ्यावर उपचार चालू केले.
३ आ. माझा रक्तगट असलेले (‘ब्लड ग्रुप’चे) रक्त कुठेही मिळत नव्हते. त्यामुळे घरच्यांना धावपळ करावी लागली.
३ इ. रक्त दिल्यानंतरही मी ३५ दिवस बेशुद्धावस्थेत (कोमामध्ये) होते. ३५ दिवसांनी मी शुद्धीवर आले.
३ ई. ‘साधिका भगवान श्रीकृष्णाला हाका मारत आहे’, हे कळल्यावर आधुनिक वैद्यांनी ‘श्रीकृष्णानेच तिला वाचवले आहे’, असे सांगणे : मला पुष्कळच त्रास होत होता. ‘मी कुठे आहे’, हे मला कळत नव्हते. मी सतत श्रीकृष्णाला हाका मारत होते आणि मला होणारा त्रास श्रीकृष्णाला सांगत होते. मी श्रीकृष्णाला हाका मारून सांगायचे, ‘कृष्णा मला रुग्णालयातून घरी घेऊन जा.’ आधुनिक वैद्यांंनी मी कृष्णाला मारलेल्या हाका ऐकून घरातील लोकांना विचारले, ‘‘हा कृष्ण कोण आहे ? त्याला लवकर हिच्याजवळ घेऊन या.’’ मग बाबांनी त्यांना सांगितले, ‘‘हा भगवान श्रीकृष्ण आहे. ती त्याची भक्ती करते; म्हणून ती त्याला हाका मारत आहे.’’ हे ऐकून आधुनिक वैद्य बाबांना म्हणाले, ‘‘श्रीकृष्णानेच तिला वाचवले आहे. माझ्या हातात काहीच नव्हते.’’
३ उ. आधुनिक वैद्यांनी डोक्याच्या डाव्या बाजूला मार लागल्यामुळे डाव्या डोळ्याला दिसणार नाही, तसेच ‘मानसिक त्रासासाठी नेहमी गोळ्या घ्याव्या लागतील’, असे सांगणे : आधुनिक वैद्यांनी माझ्या शरिराची पूर्ण तपासणी केली. ते म्हणाले,‘‘हिच्या डोक्याला पुष्कळ मार लागला असल्यामुळे ती बेशुद्ध झाली.’’ नंतर माझ्या डोक्याचे ‘स्कॅनिंग’ करण्यासाठी माझे पूर्ण केस काढले होते. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘हिला डोक्याच्या डाव्या बाजूला मार लागल्यामुळे डाव्या डोळ्याला दिसणार नाही, तसेच मानसिक त्रासासाठी नेहमी गोळ्या घ्याव्या लागतील.’’ नंतर मला घरी आणण्यात आले.
४. डोक्याला केस नाहीत आणि एक हात नाही’, हे समजल्यावर अतिशय दुःख होणे
मला हात नाही, हे मला समजले नव्हते. मी आईला म्हणायचे, ‘‘माझा हात बांधून का ठेवला आहे ? तो सोडा’’, तरी ती मला काही सांगत नव्हती. ती स्वतः रडत होती. मग मला थोडे थोडे लोकांचे बोलणे कळू लागले. मी आरशात बघितले. तेव्हा ‘मला हात नाही’, हे कळले. मला अतिशय दुःख झाले. माझ्या डोक्याला केस नाहीत. एक हात नाही, त्यामुळे मी सारखी रडत होते. मी कुठेही न जाता घरीच रहात होते.
५. साधकांनी घरी येऊन कुटुंबियांना नामजपादी उपाय करण्यास सांगणे आणि त्यांनीही उपाय करणे
माझा अपघात झाला होता, त्या ठिकाणी अनेक जणांचे अपघातात मृत्यू झाले होते. डोक्याला मार लागल्यामुळे मी रात्रंदिवस बडबडत आणि किंचाळत होते. या गोष्टीचा घरच्यांना त्रास होत होता; म्हणून मला झोपेचे इंजेक्शन देत होते. माझ्यासाठी साधकांनी घरी येऊन कुटुंबियांना नामजपादी उपाय करण्यास सांगितले. त्यांनी स्वतःही नामजपादी उपाय केले. त्यामुळे माझा त्रास न्यून झाला.
६. समष्टी सेवेला आरंभ
६ अ. माझ्याकडे भ्रमणभाष नव्हता; म्हणून बाबांनी मला भ्रमणभाष घेऊन दिला. त्यामुळे मी साधकांना सेवेसाठी संपर्क करण्याची सेवा करू लागले.
६ आ. ‘साधना करायची, तर डोक्यावर केस नाहीत; म्हणून लाजायचे कशाला ?’, असा विचार करून सत्संगाला आणि सेवा करायला जाणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी मला या अपघातातून वाचवले. आता मला साधनाच करायची आहे; म्हणून मी स्थिर राहून व्यष्टी साधना करू लागले. माझे दुःख हलके करण्यासाठी साधकांनी मला ‘सत्संगाला आणि सेवा करायला ये’, असे सांगितले. त्यामुळे मी त्यांच्या समवेत जाऊ लागले. माझ्या डोक्याला केस नव्हते आणि मला एक हात नव्हता. त्यामुळे मला सेवेसाठी बाहेर जाण्याची लाज वाटत होती. तेव्हा गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मनात विचार आला, ‘कशासाठी लाजायचे ? मला साधना करायची आहे ना ?’ त्यामुळे मी न लाजता सेवेसाठी बाहेर जाऊ लागले.
६ इ. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला साधकांचा समन्वय करण्याचे दायित्व मिळाले.
६ ई. सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांनी जिल्ह्यातील सेवाकेंद्राचे व्यवस्थापन पहाण्यास सांगितले.
६ उ. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या ठिकाणी सेवा करणे : १५.२.२०२३ नंतर हिंदु राष्ट्र-जागृती सभा होती. मला दुसर्या गावी जाऊन सभेच्या संदर्भातील सेवा करण्याचे दायित्व दिले होते; पण ते मला स्वीकारता येत नव्हते. तेव्हा मी उत्तरदायी साधकांना ‘मला एकच सेवा जमेल’, असे सांगितले. तेव्हा उत्तरदायी साधकांनी माझा आत्मविश्वास वाढवला आणि मला दोन्हीही सेवा दिल्या. गुरुदेवांनी माझी क्षमता नसतांना माझ्याकडून दोन्हीही सेवा करून घेतल्या. त्याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
६ ऊ. आश्रमामध्ये राहून सेवा करणे : मला सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात सेवेला जाण्याची पुष्कळ इच्छा होती. तेव्हा गुरुप्रसाद गौडा यांनी माझे सेवेसाठी आश्रमात जाण्याचे नियोजन केले. मी आश्रमामध्ये सेवेच्या माध्यमातून पुष्कळ शिकले. गुरुदेवांच्या कृपेने मला साधना करतांना कशाचीही अडचण नाही. ‘सर्वकाही गुरुदेवच करून घेतात’, अशी माझी दृढ श्रद्धा आहे.
७. साधनेमुळे आनंदी रहाता येणे
एवढे सर्व घडूनही मी आता सतत आनंदी असते. मला आता कशाचेही दुःख वाटत नाही. इतर साधक मला म्हणतात, ‘‘तू इतकी आनंदी कशी असतेस ? तुझ्या चेहर्याकडे पाहिल्यावर आम्हालासुद्धा आनंद होतो.’’
८. गुरुकृपेमुळे आयुष्यभर घ्याव्या लागणार्या गोळ्या घेण्याची आवश्यकता न रहाणे
आधुनिक वैद्यांनी ज्या गोळ्या नेहमीकरता घेण्यासाठी मला दिल्या होत्या, त्यासुद्धा मला आता घ्याव्या लागत नाहीत. हे सर्व गुरुकृपेने झालेले आहे. यासाठी मी श्रीगुरुचरणी शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करते.
गुरुदेवांनी मला एवढ्या कठीण प्रसंगातून वाचवले. मला साधना शिकवली आणि इथपर्यंत आणले’, यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे. यापुढे मला प्रत्येक कृती करतांना गुरुदेवांचेच स्मरण राहू दे. ‘गुरुदेवा, मला आपल्या चरणी रहाता येऊ दे. प्रत्येक क्षणी मला तुमचे अस्तित्व अनुभवता येऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’
– कु. वैशाली नागेश गावडा (वय २३ वर्षे), खानापूर, जिल्हा बेळगाव. (२२.५.२०२३)