‘श्री गणपति पंचायतन देवस्थान ट्रस्ट’ येथे महिलांसाठी श्री गणपति अथर्वशीर्ष पठण !
ईश्वरापर्यंत जाण्याचे अत्यंत सोपे साधन म्हणजे अथर्वशीर्ष होय ! – राजेंद्र पटवर्धन, विश्वस्त
तासगाव (जिल्हा सांगली), २८ सप्टेंबर (वार्ता.) – १५ ऑगस्ट १९६१ हा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्याच्या दुसर्या दिवशीपासून मी अथर्वशीर्ष म्हणण्यास शिकलो. हे अथर्वशीर्ष आम्हाला संस्कृतचे शिक्षक वसंतराव गाडगीळ यांनी शिकवले. अथर्वशीर्ष म्हणण्यास प्रारंभ केल्यापासून माझ्या आयुष्यात पालट होण्यास प्रारंभ झाला. आम्हाला अथर्वशीर्ष शिकवणार्या गुरुजींनी श्रीरामरक्षा आणि हनुमानस्तोत्र ही दोन पुस्तकेही आम्हाला दिली अन् शिकवली. अथर्वशीर्ष हे अत्यंत सोपे असून आपल्याला समजेल असे आहे. ईश्वरापर्यंत जाण्याचे अत्यंत सोपे साधन म्हणजे अथर्वशीर्ष होय ! त्यातील एकेक वाक्य आयुष्यभर पुरेल, अशी शिदोरी आहे, असे प्रतिपादन ‘श्री गणपति पंचायतन देवस्थान ट्रस्ट’चे विश्वस्त आणि अध्यक्ष श्री. राजेंद्र पटवर्धन यांनी केले.
येथील ‘श्री गणपति पंचायतन देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणपति मंदिर येथे केवळ महिलांसाठी श्री गणपति अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. पठणासाठी ३५० हून अधिक महिला भाविक उपस्थित होत्या. पठण झाल्यावर पठणासाठी आलेल्या प्रत्येक महिला भाविकास प्रसाद म्हणून श्रीफळ देण्यात आले. या प्रसंगी श्री. पवनसिंह कुडमल, श्री. अथर्व अनंत जोशी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन श्री. जगदीश कालगावकर यांनी उत्कृष्ट केले.