साधकांशी सहजतेने संवाद साधून त्यांना घडवणारे सद़्गुरु राजेंद्र शिंदे !
भाद्रपद शुक्ल षष्ठी (२१.९.२०२३) या दिवशी सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात रहाणारे सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांचा ६१ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त आश्रमात रहाणार्या कु. दीपाली माळी यांना सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. साधकांना आध्यात्मिक त्रास होत असल्यास त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करणे, ‘साधकांना आध्यात्मिक त्रासांवर मात करता यावी’, यासाठी त्यांना प्रोत्साहन आणि बळ देेणे अन् साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून झाल्यावर त्याचे श्रेय साधकांना देणे
‘एका साधिकेला असलेल्या तीव्र आध्यात्मिक त्रासामुळे एकदा तिची प्राणशक्ती अकस्मात् न्यून झाली. तेव्हा सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी तिच्यासाठी नामजपादी उपाय केले. ती साधिकाही त्रासावर मात करण्याचा प्रयत्न करत होती. त्या साधिकेला काही वेळाने बरे वाटले. तेव्हा सद़्गुरु दादा तिला म्हणाले, ‘‘अरे, तुम्ही लगेच बरे झालात ! काय कमाल आहे !’’ त्या वेळी मला वाटले, ‘सद़्गुरु दादा तिला आध्यात्मिक त्रासावर मात करण्याचे प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन आणि बळ देत आहेत. सद़्गुरु दादा सतत इतरांचा विचार करतात. ते स्वतः साधकांचे त्रास सहन करतात; पण ते त्याचे श्रेय साधकांनाच देतात.’
२. ‘प्रतिकुल परिस्थितीतही साधकांनी आनंदी कसे रहायचे’, याविषयी सहजतेने सांगणे
एकदा परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीच्या बाहेर सदाफुलीची दोन रोपे आपोआप उगवली होती. ही रोपे भूमीवरील सिमेंटच्या ‘पेव्हर्स’मधून (एक प्रकारच्या फरशीमधून) उगवली होती, तरीही ती रोपे पुष्कळ टवटवीत दिसत होती. हे वैशिष्ट्यपूर्ण असल्याने सद़्गुरु दादांनी त्या दोन्ही रोपांची छायाचित्रे काढली. त्यांनी मला ती छायाचित्रे दाखवली आणि म्हणाले, ‘‘ताई, ही रोपे किती टवटवीत दिसतात ! त्या रोपांच्या बाजूचा सर्व भाग सिमेंटचा आहे, तरीही ती रोपे टवटवीत आहेत.’’ ‘त्या रोपांप्रमाणे साधकांनी कठीण प्रसंगांतही सतत उत्साही आणि आनंदी असायला हवे’, असे त्यांना सूचित करायचे आहे’, असेे माझ्या लक्षात आले.
३. ‘साधकांची साधना व्हावी’, याची तळमळ
प्रसारातील साधक काही वेळा आश्रमात सेवेसाठी येतात. तेव्हा सद़्गुरु दादा त्यांची स्वतःहून ओळख करून घेतात. सद़्गुरु दादा ‘ते साधक काय सेवा करतात ? साधनेचे कसे प्रयत्न करतात ?’, यांविषयी जाणून घेतात. एकदा ते मला म्हणाले, ‘‘साधकांची ओळख करून घ्यायला हवी. ‘ते साधनेचे कसे प्रयत्न करतात ?’, याविषयी जाणून घेऊन त्यांच्याकडून आपण ते शिकून घ्यायला हवे.’’
४. साधिकेशी सहजतेने संवाद साधून तिच्या मनावर स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व बिंबवणे
एकदा आमच्यात साधनेविषयी झालेला संवाद येथे दिला आहे.
सद़्गुरु राजेंद्र शिंदे : ताई, तुम्हाला सेवेतून आनंद मिळतो का ?
मी : हो.
सद़्गुरु राजेंद्र शिंदे : तुम्हाला साधकांना पाहून आनंद मिळतो का ?
मी : कधी मिळतो, तर कधी नाही.
सद़्गुरु राजेंद्र शिंदे : साधकांना पाहून आनंद मिळण्यासाठी काय करायला हवे ?
मी : साधकांमध्ये ईश्वराचे रूप पहायचे. त्यांचे गुण पहायचे.
सद़्गुरु राजेंद्र शिंदे : मुख्य म्हणजे साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यास साधकांना आपोआप आनंद मिळेल. सेवा करतांना आपल्याला त्यातून ईश्वराचे चैतन्य मिळते आणि आनंद मिळतो, तसेच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यास साधकांना सहसाधकांमधील गुण पहाता येऊ लागल्याने साधकांना पाहूनही आनंद मिळतो.
५. ‘सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितल्यानुसार प्रयत्न करणे’, हीच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आहे’, असे श्रीकृष्णाने सांगणे
मी सेवा करतांना ‘काय सेवा करते ? अचूक करते ना ?’ यांविषयी सद़्गुरु दादा जाणून घेत असतात. सद़्गुरु दादा आश्रमात नसतांना त्यांची मला उणीव भासते. मला त्यांची पुष्कळ आठवण येते. सद़्गुरु दादांच्या स्मरणाने मन व्याकुळ झाल्यावर मी सूक्ष्मातून श्रीकृष्णाशी बोलते.
मी श्रीकृष्णाला विचारते, ‘श्रीकृष्णा, मला सद़्गुरु दादांची आठवण येते. ‘त्यांना भेटावे’, असे मला वाटते. मी काय करू ?’ तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ‘अगं, सद़्गुरु दादा आश्रमात असतांना तू त्यांच्या सगुण रूपाची अनुभूती घेतलीस ना ! त्यांना पाहिल्याने तुला पुष्कळ आनंद होतो ना ! तुला भगवंताच्या स्थूल रूपात अडकायचे नाही, तर त्याच्या पुढच्या टप्प्याला जायचे आहे. तुला भगवंताच्या निर्गुण रूपाची अनुभूती घ्यायची आहे ना ! तुझ्याकडून सेवा करतांना काही वेळा चुका होतात, त्याविषयी सद़्गुरु दादांच्या लक्षात आल्यावर ते तुला चूक सांगून साहाय्य करतात. आता त्यांच्या अनुपस्थितीत ‘तुझ्याकडून चूक होऊ नये’, यासाठी तू प्रयत्नरत रहा. त्यांनी आतापर्यंत तुला जे शिकवले, ते तुला कृतीत आणायचे आहे. त्यातूनच तुला खरा आनंद अनुभवायचा आहे. ‘तू असे प्रयत्न करणे’, हेच तुझे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आहे.’
६. कृतज्ञता आणि प्रार्थना
अशा अनेक प्रसंगांतून ‘गुरुतत्त्व कसे कार्यरत असते !’ याची मला अनुभूती आली. ‘सद़्गुरु दादा आश्रमात नसतांनाही ते आश्रमातील सर्व साधकांमध्ये आहेत’, असे वाटून मला आनंद मिळाला. त्याबद्दल मी श्रीकृष्ण आणि सद़्गुरु दादा यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
‘हे श्रीकृष्णा, या अज्ञानी जिवाची पात्रता नसतांनाही तू मला ‘संतांचा सत्संग देऊन कसे घडायचे ?’, हे शिकवलेस. ‘सद़्गुरु दादांकडून शिकायला मिळालेले प्रत्येक सूत्र मला आचरणात आणता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. दीपाली राजेंद्र माळी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.३.२०२१)
स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यास साधकांना आपोआप आनंद मिळेल ! – सद़्गुरु राजेंद्र शिंदे |
|