भारतीय खेळांना प्रोत्साहन आवश्यक !
संपादकीय
चीनमध्ये होत असलेल्या ‘एशियन गेम्स २०२३’मध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. वर्ष १९८२ मध्ये पदक जिंकल्यानंतर भारताने ४१ वर्षांनंतर घोडेस्वारीत सुवर्णपदक जिंकले आहे. या स्पर्धेत भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, इराण यांसह ४५ देश सहभागी आहेत. स्पर्धेतील ३८ खेळांमध्ये भारताचे एकूण ६३४ खेळाडू सहभागी आहेत. सध्या या खेळात चीन ५९ सुवर्णपदके घेऊन प्रथम क्रमांकावर, तर ५ सुवर्णपदके मिळवून भारत ५ व्या क्रमांकावर आहे. गतकाही वर्षांमध्ये भारताची खेळांमधील कामगिरी सुधारत असली, तरी १४२ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला पदकांचा दुष्काळ संपण्यासाठी अनेक वर्षे वाट पहावी लागली, हेही तितकेच सत्य आहे.
पदके न मिळण्यासाठी येथील प्रशासकीय व्यवस्थेसमवेत भारताच्या मातीतील मल्लखांब, खो-खो, कब्बडी यांसह भारतीय खेळांना महत्त्व न मिळता क्रिकेटला या देशात मिळत असलेले अवास्तव महत्त्व हेही एक महत्त्वाचे कारण आहे. क्रिकेटसाठी जितका पैसा व्यय करतो, त्यासाठी जनतेसह लोकप्रतिनिधींकडून जितका पाठिंबा मिळतो, तितका पाठिंबा अन्य भारतीय खेळांना मिळत नाही. भारतापेक्षा लोकसंख्येने अत्यंत लहान असलेले जपान, दक्षिण कोरिया यांसारखे अनेक देश अधिक संख्येने प्रत्येक वेळी पदके का मिळवू शकतात ? हा निश्चित चिंतनाचा विषय आहे. त्यामुळे भारताने यापुढे क्रिकेटसारख्या पाश्चात्त्य खेळांना महत्त्व न देता भारतीय खेळांवर लक्ष केंद्रित करायला हवे. त्यासाठी खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास भारतही यापुढे प्रत्येक स्पर्धांमध्ये अधिक संख्येने पदांची लयलूट करतांना दिसेल, हे निश्चित !