पंजाबमधील काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांना अमली पदार्थाच्या प्रकरणी अटक

चंडीगड – येथील काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांना अमली पदार्थांच्या जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली. पंजाब पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. या संदर्भात खैरा यांच्या फेसबुक खात्यावर एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यात ते पोलिसांशी हुज्जत घालतांना दिसत आहेत. खैरा पोलिसांकडे वॉरंटची मागणी करतांना आणि अटकेचे कारण विचारतांना दिसत आहेत. यावर पोलीस उपअधीक्षक त्यांना ‘अमली पदार्थाच्या जुन्या प्रकरणात तुम्हाला अटक करण्यात येत आहे’, असे सांगतांना दिसत आहेत. याला खैरा विरोध करतांना ‘राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई होत आहे’, असे सांगत विरोध करत आहेत.
मार्च २०१५ मध्ये जलालाबाद येथे खैरा यांच्यासह ९ जणांवर अमली पदार्थ नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. अमली पदार्थांच्या प्रकरणातील आरोपी आणि बनावट पारपत्र बनवणार्‍यांना पाठिंबा दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी त्यांची चौकशीही झाली होती. तसेच त्यांना अटकही करण्यात आली होती. तेव्हापासून या प्रकरणाची चौकशी चालू आहे. (वर्ष २०१५ मधील प्रकरणाची पोलीस अजूनही चौकशी करून कार्यवाही करत असतील, तर त्यांनी (अ)कार्यक्षमता यातून दिसून येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

काँग्रेसचे आमदार काय करतात, हेच यातून लक्षात येते !