पर्यटन व्यवसायामध्ये रोजगार निर्मितीची क्षमता ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

दोनापावला येथे ‘जागतिक पर्यटनदिन’ साजरा

पणजी, २७ सप्टेंबर (स.प.) – पर्यटन व्यवसायामध्ये रोजगार निर्मितीची क्षमता आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी २७ सप्टेंबरला दोनापावला येथील जागतिक पर्यटनदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात काढले. गोवा पर्यटन खात्याने ‘ट्रॅव्हल अँड टुरिझम् असोसिएशन ऑफ गोवा’ (टीटीएजी) आणि ‘स्कल इंटरनॅशनल’ आस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक पर्यटनदिन २०२३’ साजरा केला. या वेळी ते बोलत होते. या वेळी दोनापावला येथील सिदाद द गोवा या पंचतारांकित हॉटेलमध्ये पर्यटन व्यवसायाशी संबंधित सर्वांना एकत्र भोजन देण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पर्यटन सचिव संजय गोयल, पर्यटन संचालक सुनील अंचापका, ‘टीटीएजी’चे अध्यक्ष नीलेश शहा, ‘स्कल इंटरनॅशनल’चे अध्यक्ष विवेक केरकर यांच्यासह पर्यटन व्यवसायातील इतर मान्यवर उपस्थित होते. यंदाच्या जागतिक पर्यटनदिनाची संकल्पना ‘पर्यटन आणि हरित गुंतवणूक’ ही होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या भाषणात पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीचे महत्त्व सांगितले. त्यांनी समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी ३० कोटी रुपयांसह सरकारने केलेल्या अन्य भरीव गुंतवणुकीवर प्रकाश टाकला.

ते म्हणाले, ‘‘महामार्ग सुधारणा आणि शहर स्वच्छता यांचे प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त वार्का समुद्रकिनार्‍यावर आगामी ‘बीच व्हॉलीबॉल’ स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये ३१ देशांचा सहभाग असेल आणि यामुळे राज्यातील पर्यटनाला लक्षणीय चालना मिळेल.’’ डॉ. सावंत यांनी येत्या ४-५ वर्षात आदरातिथ्य क्षेत्रात सुमारे २ लाख तरुणांना रोजगार देण्याची क्षमता असल्याचे सांगून रोजगार निर्मितीमध्ये पर्यटनाच्या भूमिकेवर भर दिला. ‘व्होकल फॉर लोकल’ (स्थानिक गोष्टींना प्रोत्साहन देणे) आणि ‘व्होकल फॉर ग्लोबल’ (जागतिक गोष्टींना प्रोत्साहन देणे) या संकल्पनांना चालना देण्यासाठी उद्योग समर्थनाच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ‘सरकार शाश्‍वत आणि दायित्वपूर्ण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यास वचनबद्ध आहे’, असे ते म्हणाले.

यासाठी त्यांनी पर्यटनाशी संबंधित सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे सांगितले.