नागपूर येथील ढगफुटीची माहिती असूनही हवामान विभागाने ती न सांगितल्याची चर्चा !
असे असेल, तर विभागातील संबंधित उत्तरदायी अधिकार्यांना बडतर्फच करायला हवे !
नागपूर – ढगफुटीच्या ६ घंटे आधी आगाऊ चेतावणी देण्याचे दायित्व ‘नोडल एजन्सी’ या नात्याने भारताकडे जागतिक हवामान संघटनेने दिले आहे. भारतात नागपूर येथे ‘डॉप्लर’ यंत्रणा कार्यरत होती आणि ‘नागपूरमध्ये ढगफुटी होऊ शकते’, अशी माहिती ‘रडार यंत्रणा चालवणार्या अधिकृत शास्त्रज्ञांना होती’, असे म्हटले जात आहे. त्यामुळे ‘त्यांनी ही माहिती जिल्हाधिकारी, तसेच संबंधित महापालिकेच्या यंत्रणा किंवा वरपर्यंत कळवली कि नाही ?’ किंवा ‘कळवूनही काही झाले नाही का ?’ असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. २२ आणि २३ सप्टेंबर या दिवशी नागपूरमध्ये १२ घंट्यांत १५९.६ मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे, तसेच काही लोक मृत, तर काही बेपत्ता झाल्याची माहितीही पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर वरील प्रश्नांची चर्चा होत आहे.
‘ढगफुटी’ म्हणजे ‘क्लाउडबर्स्ट’ आणि त्यानंतर येणारा ‘फ्लॅश फ्लड’ ही स्थिती एका घंट्यात १०० मिलीमीटर (३.९४ इंच) पाऊस झाल्यावरच समजायची असते’, असे धोरण आहे. ‘१५ मिनिटांत २५ मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊसही ढगफुटीच म्हटला पाहिजे’; पण हे अधिकृतपणे मान्य केले जात नाही. त्यामुळे ‘ढगफुटी वा पूर यांकडे दुर्लक्ष होत रहाते’, असे काही जणांचे मत आहे. ढगफुटीची माहिती केवळ ‘एक्स बँड डॉप्लर रडार’ यंत्रणाच देऊ शकते. मग पाऊस किती, कसा, कधी होईल आणि ढगातील पाणी संपून थांबेल, हे सहज समजते. अक्षांश-रेखांशानुसार किती वाजता किती पाऊस आपल्या डोक्यावर पडेल, हे निश्चितीपूर्वक सांगणारी जगभर वापरली जाणारी अद्ययावत यंत्रणा म्हणून ‘एक्स बँड डॉप्लर रडार’चा नावलौकिक आहे. तज्ञांच्या मते, आपत्कालीन संकटाच्या दृष्टीने महाराष्ट्रात खरे तर अशा १८ यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. मुंबई येथे सी बँड डॉप्लर रडार बसवले गेले आहे. अतीवृष्टी आणि ढगफुटी यांची पूर्वसूचना वेळीच देणार्या यंत्रणा राज्यभर कार्यरत असणे आवश्यक आहे. या प्रगत तंत्रज्ञानाचा आफ्रिकी देशांत वापर होतो; मात्र भारत त्यात मागे आहे. भारतात अशा केवळ ३७ यंत्रणा असून आता त्या ७२ करण्यात येणार आहेत.