छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे ‘शिवशस्त्रशौर्य’ प्रदर्शनात पहाता येणार !
राज्यात सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई येथे प्रदर्शनाचे आयोजन !
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा काढला, ती वाघनखे सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई येथे भारतियांना पहाता येणार आहेत. इंग्लंड येथील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’मधून आणण्यात येणार्या या वाघनखांचे ‘शिवशस्त्रशौर्य’ हे वीरश्री जागवणारे प्रदर्शन महाराष्ट्रात आयोजित करण्यात येणार आहे.
सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालय, कोल्हापूर येथील ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ आणि मुंबईमधील ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय’ या ठिकाणी ही वाघनखे जनतेला पहाण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
प्रदर्शनासाठी स्वतंत्र समितीची स्थापना !
या वाघनखांचे प्रदर्शन भरवणे, त्यांची सुरक्षा, तसेच प्रवास हे अतिशय जोखमीचे काम आहे. त्यामुळे या सर्व व्यवस्थापनासाठी पुरातत्व विभागाने समिती स्थापन करण्याची विनंती राज्यशासनाकडे केली होती. त्यानुसार यासाठी राज्यशासनाने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव या समितीचे अध्यक्ष आहेत.
अफझलखान वधाचा प्रसंग प्रदर्शनस्थळी साकारला जाणार !हिंदवी स्वराज्यावर आक्रमण करणारा विजापूरचा सरदार अफझलखान याचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाघनखांद्वारे प्रतापगडाच्या पायथ्याशी कोथळा काढला होता. या घटनेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची भेट, खानाने केलेले प्रतिआक्रमण आणि महाराजांनी खानाचा केलेला वध हे सर्व प्रसंग या प्रदर्शनाच्या ठिकाणी साकारले जाणार आहेत. |