भारताची आत्मनिर्भर शस्त्रसज्जता हे सामर्थ्याचे लक्षण ! – काशिनाथ देवधर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ
‘सोलापूर जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळा’च्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन
सोलापूर – भारतात नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार ८४ सहस्र ३२८ कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रविषयक खरेदीमधील ८२ सहस्र १२७ कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रविषयक वस्तू भारतीय बनावटीच्याच खरेदी करण्यात येणार आहेत. संरक्षणाविषयी स्वावलंबित्व हे भारताचे ध्येय असल्यामुळे विविध युद्धनौका, शस्त्रे, २५ लाखांहून अधिक रायफली, एल्.एम्.जी. (हलक्या वजनाची स्वयंचलित रायफल) हे भारत स्वत: सिद्ध करत आहे. अण्वस्त्रसंपन्न असलेला भारत आता जगाच्या प्रमुख देशांपैकी एक आहे. भारताची वाढती आत्मनिर्भर शस्त्रसज्जता हे सामर्थ्याचे लक्षण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी केले. ‘जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळा’च्या ४७ व्या वर्षांच्या व्याख्यानमालेचे शिवस्मारक सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या तिसर्या दिवशी म्हणजे २६ सप्टेंबरला ते बोलत होते.
प्रारंभी श्री गणेशाचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर ‘सोलापूर जनता सहकारी बँके’चे संचालक पुरुषोत्तम उडता, उपव्यवस्थापक अनंत घाटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा स्वामी यांनी केले, तर आभार प्रदर्शन पांडुरंग घोडके यांनी केले. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ देवधर यांच्या नेतृत्वाखाली डी.आर्.डी.ओ.ने (संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने) सिद्ध केलेल्या ‘रॉकेट लाँचर’ची माहिती देण्यात आली, तसेच ‘भारत पिनाक’ नावाची अग्नीबाणवाहिनी आणि ‘अटॅग्ज’ नावाची तोफवाहिनी सिद्ध करत असल्याचेही देवधर यांनी सांगितले.