श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी सातारा शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता पालट !
२७ सप्टेंबर (वार्ता.) – शहरातील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी अंतर्गत वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता पालट करण्यात आला आहे. २७ आणि २८ सप्टेंबर या दिवसांसाठी हे पालट असणार आहेत, अशी माहिती सातारा पोलीस दलाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
कमानी हौद, देवी चौक, मारवाडी चौक ते मोती चौक येथपर्यंत येणारे सर्व मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत, तसेच एम्.एस्.सी.बी. कार्यालय, समर्थ चित्रपटगृह, राधिका चित्रपटगृह, ऐक्य प्रेस, बुधवार चौक, श्री गणेशमूर्ती विसर्जन कृत्रिम तलाव, आंबेकर चौक, करंजे पेठ, स्टेट बँक प्रतापगंज पेठ, काटदरे मसाले दुकान, डीसीसी बँक, मोती तळे, मोळाचा ओढा ते बुधवार नाका या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. नागरिकांना बंद करण्यात आलेल्या मार्गांना पर्यायी अंतर्गत रस्त्याने वाहतूक करता येईल. २७ आणि २८ सप्टेंबर या दिवशी तालीम संघ मैदान, गुरुवार परज, गांधी मैदान आणि कोटेश्वर मैदान या ४ ठिकाणी आपली वाहने लावावीत. सातारा पोलीस दलाच्या वतीने वाहतुकीत करण्यात आलेल्या पालटांची नोंद घेऊन नागरिक आणि श्री गणेशभक्त यांनी सहकार्य करावे.