नाशिक येथे घरात झालेल्या भीषण स्फोटात ३ जण घायाळ
नाशिक – नाशिक शहरातील सिडको परिसरातील एका घरात डिओड्रंटमुळे (दुर्गंधीनाशकामुळे) भीषण स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे. यात घरातील ३ जण गंभीर घायाळ झाले असून घर आणि वाहने यांच्या काचाही फुटल्या. या प्रकरणी अन्वेषण चालू असून घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अन्वेषणानंतर खरा प्रकार उघड होईल. तुषार जगताप, शोभा जगताप, बाळकृष्ण सुतार अशी घायाळ झालेल्यांची नावे असल्याची प्राथमिक माहिती आहे. भ्रमणभाष प्रभारित करण्यासाठी (चार्जिंगसाठी) लावलेला होता. त्याच्या शेजारीच डिओड्रंट आणि सौंदर्यप्रसाधनाची काही साधने ठेवलेली होती. भ्रमणभाषच्या उष्णतेने डिओड्रंटचा मोठा स्फोट झाला. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलेंडरचा स्फोट झाल्यासारखा आवाज झाल्याने आम्ही घाबरून घराबाहेर पळत सुटलो. घरात आग लागल्याने ती पाणी टाकून विझवली.