भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आरती करत असतांनाच पुण्यातील मंदिराच्या कळसाला फटाक्यांमुळे लागली आग !
सुरक्षारक्षकांनी जेपी नड्डा यांना तात्काळ बाहेर काढले !
पुणे – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा पुणे दौर्यावर असतांना एक मोठी दुर्घटना टळली. पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळात बाप्पाची आरती करण्यासाठी २६ सप्टेंबर या दिवशी जे.पी. नड्डा आले होते; मात्र त्याच वेळी गणेश मंडळाने साकारलेल्या महाकाल मंदिराच्या देखाव्याला आग लागली. साने गुरुजी तरुण मंडळ हे पुणे शहरातील भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे मंडळ आहे. आरती चालू असतांनाच अचानक देखाव्याच्या कळसाच्या बाजूला आग लागली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी जे.पी. नड्डा यांना तात्काळ बाहेर काढले. नंतर लगेच पाऊस चालू झाल्याने आग लगेच विझली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
फटाक्यांमुळे आग लागली !
जे.पी. नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंडळात आरतीसाठी गेले असतांना त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ते करतांना आतिषबाजीचा एक फटाका हा मांडवाच्या कळसाला लागला. यामुळे त्या कळसाने पेट घ्यायला आरंभ केला. यामुळे आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमनदलाच्या २ गाड्या आणि १ पाण्याचा टँकर घटनास्थळी पोचला. त्यामुळे आग आटोक्यात आली. या घटनेत कुणीही घायाळ झाले नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Fire erupts during Ganpati event in Pune; JP Nadda promptly leaves pandal https://t.co/o0RGq7DUGG#fireinpune
— Pune Pulse (@pulse_pune) September 26, 2023
संपादकीय भूमिका
फटाक्यांच्या अतीवापरामुळे वातावरणातील रज-तम वाढते. धार्मिक उत्सवांमध्ये सत्त्वगुण वाढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. यासाठी फटाके न वाजवता अधिकाधिक प्रार्थना, नामजप करणे आवश्यक आहे. जनतेला हे सर्व समजण्यासाठी धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे ! फटाक्यांचे दुष्परिणाम पहाता आतातरी धार्मिक उत्सवांमध्ये फटाके वापरण्यावर बंदी घालणे आवश्यक ! |