नम्र, प्रेमळ आणि सतत परेच्छेने वागणार्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या म्हापसा (गोवा) येथील सौ. प्रणिता आपटे (वय ५३ वर्षे) !
म्हापसा (गोवा) येथील सद़्गुरु सुशीला आपटेआजी आणि त्यांच्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सूनबाई सौ. प्रणिता आपटे गुरुदेवांना भेटण्यासाठी अधूनमधून रामनाथी येथील सनातन आश्रमात येत असतात. त्यांच्या संपर्कात असलेल्या म्हापसा येथील काही साधकांना सौ. प्रणिता आपटे यांच्याविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे २२ सप्टेंबर या दिवशी आपण पाहिली.
आज आपण आश्रमातील काही साधकांना सौ. प्रणिता आपटे यांच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे पाहूया.
५. श्री. अतुल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘सदगुरु आपटेआजी आणि सौ. प्रणिताकाकू गुरुदेवांना भेटण्यासाठी अधूनमधून आश्रमात येतात. तेव्हा मला त्यांची गुरुदेवांच्या समवेत छायाचित्रे काढण्याची सेवा मिळते. त्यामुळे माझी सौ. प्रणिताकाकूंशी ओळख झाली.
५ अ. प्रेमभाव
५ अ १. ‘छायाचित्रे काढण्याची सेवा करण्यास शक्ती मिळेल’, असे सांगून साधकाला प्रसाद देणे : सद़्गुरु आपटेआजी आश्रमात आल्यावर गुरुदेवांचे पाद्यपूजन करून त्यांचे औक्षण करतात. मी त्या वेळी छायाचित्रे काढण्याची सेवा करतो. एकदा अशाच त्या आल्या असतांना त्यांची छायाचित्रे काढून झाल्यावर मी बाहेर जाऊन थांबलो होतो. थोड्या वेळाने प्रणिताकाकू बाहेर आल्या आणि त्यांनी हळूच माझ्या हातात एक लाडू दिला. त्या मला म्हणाल्या, ‘‘छायाचित्रांची सेवा करण्यासाठी तुला शक्ती मिळेल.’’ त्यांचे हे वाक्य ऐकून माझी भावजागृती झाली.
५ अ २. साधकाचा विवाह झाल्यावर त्याच्या पत्नीसाठीही प्रसाद देणे : नोव्हेंबर २०२२ मध्ये माझा विवाह झाला. त्यानंतर एकदा सद़्गुरु आपटेआजी आणि प्रणिताकाकू गुरुदेवांना भेटण्यासाठी आश्रमात आल्या होत्या. तेव्हाही त्यांची छायाचित्रे काढण्याची सेवा माझ्याकडे होती. छायाचित्रे काढण्याची सेवा झाल्यावर मी परत जातांना त्यांनी मला आणि माझ्या पत्नीसाठीही प्रसाद दिला. त्या म्हणाल्या, ‘‘प्रसाद ग्रहण करून तुम्हा दोघांनाही सेवा करण्यासाठी शक्ती मिळेल.’’
५ आ. अल्प अहं
५ आ १. सद़्गुरु आपटेआजी आणि यजमान सोमयाजी श्री. प्रकाश आपटे सांगतील, त्याप्रमाणेे सेवा करणार्या सौ. प्रणिता आपटे ! : ऑगस्ट २०२३ मध्ये सद़्गुरु आपटेआजी, प्रणिताकाकू आणि त्यांचे यजमान सोमयाजी श्री. प्रकाश आपटे गुरुदेवांना भेटण्यासाठी आश्रमात आले होते. त्या सर्वांशी बोलणे झाल्यावर गुरुदेवांनी ‘प्रणिताकाकूंच्या चेहर्याकडे पाहून छान वाटते’, असे म्हणून त्यांना ‘‘साधनेचे काय प्रयत्न करता ?’’, असे विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी सद़्गुरु आजी सांगतील, तशी त्यांची सेवा करते. त्या सांगतील त्यावर काही विचार न करता त्यांना अपेक्षित अशी प्रत्येक गोष्ट करते. त्याप्रमाणे यजमानांनाही अपेक्षित अशी प्रत्येक गोष्ट ते सांगतील, तशी करते. त्या दोघांच्याही सांगण्याप्रमाणे वागत मी माझी कामे करते.’’
यावरून ‘त्यांच्यात अहं पुष्कळ अल्प असून स्वतःच्या मनाप्रमाणे न वागता परेच्छेने वागल्यामुळे त्यांचा पूर्ण मनोलय झाला आहे’, असे माझ्या लक्षात आले.
५ आ २. दिवसभर अखंड सेवा करूनही त्याचा कर्तेपणा नसणे, ‘सर्व सेवा देव अग्निनारायण आणि सद़्गुरु आजी यांच्यामुळे होते’, असे सौ. प्रणिताकाकूंनी सांगणे : त्यांच्या घरी पाहुण्यांची सतत ये-जा चालू असते. श्रावण मासात ते प्रमाण अधिक असते. घरी येणार्या प्रत्येकासाठी ‘चहा-अल्पाहार-स्वयंपाक करणे’, अशी त्यांची सेवा सतत चालू असते. त्याविषयी मनात काही न आणता त्या दिवसभर सेवा करत असतात. त्यांना ‘तुम्ही किती करता ?’, असे म्हटल्यावर त्या लगेच म्हणतात, ‘‘मी कुठे काही करते ? माझ्याकडून जी काही सेवा घडते, ती देव अग्निनारायण करून घेतो, तसेच ती सद़्गुरु आजींमुळे होते.’’ त्यांच्या बोलण्यातून कधीच ‘मी करते, मला करावे लागते,’ असे कधीच येत नाही; उलट त्या नेहमी म्हणतात, ‘‘आश्रमातील साधकांच्या तुलनेत मी काहीच करत नाही. तुम्हीच पुष्कळ सेवा करता. ’’ त्यांच्या बोलण्यात किंचितही कर्तेपणा किंवा अहं जाणवत नाही.’
६. सौ. वर्धिनी गोरल (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय २७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
६ अ. दिवसभर सेवा करत असूनही सतत आनंदी असणे : ‘सौ. प्रणिताकाकू पहाटेपासून रात्रीपर्यंत अखंड सेवा करत असतात आणि इतकी सेवा करूनही त्यांच्या तोंडावर कधीही ताण नसतो. त्या सतत आनंदी असतात. ‘सर्व काही देव करून घेतो’, असा त्यांचा भाव असतो.
६ आ. जवळीक साधणे
१. त्या घरी येणार्या अतिथींशी प्रेमाने आणि मिळून-मिसळून वागतात.
२. त्या रामनाथी आश्रमात काही घंट्यांसाठीच येतात; पण तरी त्यांची आश्रमातील साधकांशी जवळीक आहे. आश्रमात आल्यावर त्या साधकांशी बोलून त्यांची विचारपूस करतात आणि त्यांना आपलेसे करतात.
६ इ. सहजता : त्या सर्वांशी सहजतेने आणि उत्स्फूर्तपणे बोलतात. त्यांचे बोलणे ऐकतांनाही त्यांच्या माध्यमातून ‘देवच बोलत आहे’, असे मला जाणवते.
६ ई. ‘आई-मुलगी’, याच्याही पलीकडचे प्रेमळ नाते असणार्या सासू-सून ! : सद़्गुरु आपटेआजी आणि प्रणिताकाकू यांचे नाते ‘सासू-सून’, असे असले, तरी प्रत्यक्षात ते ‘आई-मुलगी’, यांच्याही पलीकडचे वाटते. इतक्या प्रेमाने प्रणिताकाकू सद़्गुरु आजींची भावपूर्ण सेवा करतात. सद़्गुरु आजीही तितक्याच प्रेमाने त्यांची काळजी घेतात.
६ उ. भाव : त्यांची सेवेची गती पुष्कळ आहे. ती पाहून ‘त्यांच्यातील भावामुळे देवच त्यांना प्रत्येक गोष्टीत साहाय्य करतो’, असे मला वाटते.’
७. कु. कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
७ अ. प्रेमळ : ‘सौ. प्रणिता आपटेकाकू पुष्कळ प्रेमळ आहेत. त्यांनी प्रेमानेच सर्वांची मने जिंकली आहेत.
७ आ. परेच्छेने वागणे : सद़्गुरु आपटेआजी आणि त्यांची सून सौ. प्रणिता यांचे वागणे पाहून आदर्श ‘सासू-सूनेचे नाते कसे असायला हवे ?’, हे लक्षात येते. असे जीवन जगून त्या दोघींनीही सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. आता प्रत्येक घरात सासू-सुनेची केवळ भांडणेच पहायला मिळतात. ‘सद़्गुरु आपटेआजींनी प्रणिताकाकूंना जी साधना करायला सांगितली, ती त्यांनी मनापासून स्वीकारून केली.’ त्यामुळे ‘त्या सद़्गुरु आपटेआजींशी एकरूप झाल्या आहेत’, असे मला जाणवले.
७ इ. हिंदु धर्मानुसार आचरण करणे : सौ. प्रणिताकाकू हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण करतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘स्त्री’ तत्त्वाची स्पंदने जाणवतात. त्यांच्याकडे पाहून मनाला पुष्कळ समाधान मिळते.
७ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा
१. सौ. प्रणिताकाकूंमध्ये भोळाभाव आहे. त्याही सद़्गुरु आपटेआजींप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना गुरु मानून सर्व सेवा भावपूर्ण करतात.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सद़्गुरु आपटेआजी यांना संत म्हणून घोषित केल्यापासून आतापर्यंत प्रणिताकाकूंनी सद़्गुरु आजींची सेवा ‘संतसेवा’, या भावानेच केली आहे. त्यामुळेच काकूंची आध्यात्मिक प्रगती झाली आहे.’ (समाप्त)
(सर्व सूत्रांचा दिनांक ३.९.२०२३)