‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’ नामांतराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
मुंबई – औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ या नामांतराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. राज्यशासनाने १५ सप्टेंबर या दिवशी राजपत्र प्रकाशित करून दोन्ही जिल्ह्यांचे नामांतर केले आहे. राज्यशासनाच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. २९ सप्टेंबर या दिवशी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी होणार आहे.
यापूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळी राज्य सरकारकडून नामांतराविषयीच्या आक्षेपांची पडताळणी झाली नसल्याचे सांगितले होते. यावर न्यायालयाने ‘पडताळणी झाली नसतांना नामांतर कसे करण्यात आले ?’, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे सरकारने दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतराला स्थगिती दिली होती. सद्यस्थितीत राज्यशासनाने नामांतराविषयी राजपत्र काढले आहे. त्यामुळे यापुढील सरकारची भूमिका काय असेल ? हे पहावे लागणार आहे.