अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त !
मुंबई – खाद्यतेल, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई यांच्या विक्रेत्यांकडील अन्नपदार्थांची पडताळणी केल्यावर भेसळ आढळून आलेल्या भेसळखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले आहेत. (मंत्री महोदयांना आदेश का द्यावे लागतात ? अन्न आणि औषधी विभागातील अधिकारी स्वतःहून कारवाई का करत नाहीत? – संपादक ) आतापर्यंत सुमारे १० कोटींपेक्षा अधिक किमतीचे अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित अन्नपदार्थ कह्यात घेतले असून नाशवंत अन्नपदार्थांचा साठा घटनास्थळी नष्ट करण्यात आलेला आहे.
मागील मासांत एकूण ८३ कारवायांमध्ये २ लाख ४२ सहस्र ३५२ किलो इतका अन्नपदार्थांचा साठा कह्यात घेण्यात आला. त्याचे मूल्य ४ कोटी रुपयांहून अधिक आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांवर ४६ कारवाया करण्यात आल्या असून एकूण ३ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा, पान मसाला, सुगंधित
तंबाखू इत्यादींचा साठा कह्यात घेऊन संबंधितांवर गुन्हे नोंद करण्यात आले. या कारवायांसह जनतेत जनजागृतीचे कार्यक्रम व्यापक स्तरावर घेण्यात येतील, असे या विभागाने स्पष्ट केले आहे.
अन्न पदार्थांमधील भेसळीच्या तक्रारी किंवा माहिती द्यायची असल्यास अन्न आणि औषध प्रशासनाने १८००२२२३६५ हा टोल फ्री क्रमांक दिला आहे.
संपादकीय भूमिकाजनतेच्या आरोग्याशी खेळणार्यांवर केवळ गुन्हे नोंदवून त्यांची दुकाने कायमस्वरूपी बंद करावीत, असेच सर्वसामान्य जनतेला वाटते ! |