विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सातारा येथील ६१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई !
सातारा, २६ सप्टेंबर (वार्ता.) – श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्याच्या सीमेतील ६१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्या ६१ जणांना २७ ते २९ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत सातारा तालुक्यात थांबण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी माहिती शहर पोलिसांनी दिली.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील ६१ सराईत गुन्हेगारांवर कलम १४४ प्रमाणे कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी उपविभागीय दंडाधिकारी यांना सादर केला होता. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिकार्यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.