पुणे येथे यावर्षीच्या श्री गणेशाच्या मूर्तींचा पुनर्वापर करून त्यापासून साकारणार पुढच्या वर्षीचे गणराय !
‘नैसर्गिक मातीचा पुनर्वापर करूया’, असे म्हणत मागील ३ वर्षांपासून गणेशभक्तांची घोर फसवणूक !
पुणे – प्रतिवर्षी शाडूची किंवा मातीची मूर्ती सिद्ध करायची असेल, तर त्यासाठी नवीन ठिकाणांहून माती आणली जाते; परंतु हे होऊ द्यायचे नसेल, तर ‘पुनरावर्तन मोहिमे’त पुणेकरांनी सहभागी व्हावे. त्यामुळे प्रतिवर्षी माती आणायची आवश्यकता पडणार नाही आणि यंदा दिलेल्या मूर्तींपासूनच पुढील वर्षी बाप्पा सिद्ध केले जातील. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही आणि शाश्वत उपक्रमही चालू राहील. ही मोहीम ३ वर्षांपासून चालू झाली आहे. गेल्या वर्षी २०२२ साली पुनरावर्तन मोहिमेद्वारे २३ सहस्र किलो शाडू माती नागरिकांकडून गोळा करून मूर्तीकारांना पुनर्वापरासाठी दिली गेली. शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर ही माती पुणे शहरातील नागरिकांना आवाहन करून त्यांच्याकडून ५० ठिकाणी गोळा केली गेली, अशी माहिती ‘इको एक्झिस्ट फाऊंडेशन’कडून देण्यात आली. (मुळात वहात्या पाण्यात विसर्जन करणे, हा श्री गणेशपूजनातील शेवटचा विधी आहे. असे असतांना प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्ती विसर्जन न करता त्यांचा पुनर्वापर करणे हे अक्षम्य आहे. त्यामुळे हा धर्मद्रोही उपक्रम त्वरित थांबवावा आणि पुनर्वापरासाठी घेतलेल्या श्री गणेशमूर्तींची विक्री करण्याची अनुमती देणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी असेच भाविकांना वाटते ! – संपादक) जेव्हा ‘इको एक्झिस्ट फाऊंडेशन’ने २०२० मध्ये पुनरावर्तन मोहिमेचा प्रारंभ केला, तेव्हा त्यांनी शाडू मातीचा पुनर्वापर करण्याच्या क्षमतेवर प्रयोग करण्यास आरंभ केला. शहरातील २० हून अधिक संस्थांनी वर्ष २०२२ मध्ये १५० सोसायट्या आणि २०० हून अधिक स्वयंसेवक यांना मोहिमेत सहभागी करून घेत, ही मोहीम वाढवली.