५ ते १६ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांना कोणता आहार द्यावा ?
आपण मागच्या लेखामध्ये लहान बाळांपासून ते ४ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आहाराविषयी जाणून घेतले. आजच्या लेखात आपण ५ ते १६ वर्ष या वयोगटातील मुलांच्या आहाराविषयीची सूत्रे जाणून घेणार आहोत. मुलांच्या वाढीच्या वयात योग्य तो सकस आहार त्यांना मिळाल्यास शरीर सुदृढ होऊन त्यांचे विविध आजारांपासून रक्षण होते. म्हणून वाढणार्या वयातच मुलांचे योग्य पोषण होणे फार महत्त्वाचे असते.
वाढीच्या वयात दिवसातून ३ ते ४ वेळा आहार घ्यायला हवा. मुलांच्या आहारात सर्व घटक समाविष्ट आहेत ना, याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. आहारातील घटक म्हणजे प्रथिने, जीवनसत्त्वे, क्षार, पिष्टमय पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ; परंतु सध्याच्या मुलांच्या आहारात पिष्टमय आणि स्निग्ध पदार्थ यांचे प्रमाण अधिक आढळते, म्हणजेच बेकरीचे पदार्थ, बिस्किटे इत्यादी. आज आपण आहारातील प्रत्येक घटक कसा महत्त्वाचा असतो, ते समजून घेणार आहोत.
१. प्रथिने (प्रोटीन)
प्रथिने आपल्या आहारद्रव्यांमधील सर्वश्रेष्ठ आहेत. शरिरामध्ये पेशींची वाढ होण्यासाठी, तसेच पेशींचे पोषण होऊन शरिराची झालेली झीज भरून काढण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. प्रथिने आपल्या शरिरात ‘अँटिबॉडीज’, हिमोग्लोबिन, ‘हार्मोन (संप्रेरक)’, असे विविध घटक निर्माण करण्यास साहाय्य करतात. व्याधीक्षमत्व निर्माण करण्यात प्रथिनांचा महत्त्वाचा वाटा असतो. लहान मुले, गर्भवती स्त्रिया आणि बाळंतिणी यांना प्रथिनांची अधिक मात्रा आवश्यक असते.
१ अ. प्रथिनांचे विविध स्रोत : ज्वारी, बाजरी, मका, गहू, तूर, मूग, उडीद, शेंगदाणे, चणाडाळ, काजू, बदाम, गायीचे दूध, हिरव्या पालेभाज्या यांमध्ये प्रथिनांची उत्तम मात्रा आढळून येते. याखेरीज अंडी, मासे, मांस यांमध्येही प्रथिने असतात; परंतु ते पचायला जड असल्यामुळे आणि आताच्या मुलांची पचनक्षमता अल्प असल्याने त्यांनी शाकाहारी पदार्थांपासून मिळणारी प्रथिने घेतल्यास उत्तम ! मुलांनी वरण, भात, पोळी, भाजी असा संपूर्ण आहार घेतल्यास त्यांना योग्य प्रमाणात प्रथिने मिळतात. त्यांना आठवड्यातून एकदा भिजलेली कडधान्य शिजवून केलेली उसळ द्यावी. कडधान्यांना मोड आणू नये. मिश्र डाळींचे वरण, भाजणीचे थालीपीठ किंवा धिरडे हे मुलांच्या आहारात प्रथिनांची पूर्तता करतात. काजू, बदाम द्यायचे झाल्यास ते दिवसातून एकदा ३ ते ४ अशा संख्येत खाण्यास द्यावेत. पुष्कळ पौष्टिक म्हणून मुलांवर सुकामेव्याचा भडिमार केला जातो. ते योग्य नाही. प्रतिदिनचे संपूर्ण जेवण करण्यास प्राधान्य द्यावे. २ जेवणाच्या वेळा सोडून इतर वेळी भूक लागल्यास हे इतर पदार्थ प्रमाणात द्यावेत.
२. स्निग्ध पदार्थ
आहारातील महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक म्हणजे स्नेह. शरिरात ऊर्जा पुरवण्याची कामगिरी हे स्निग्ध पदार्थ बजावतात. विविध जीवनसत्त्वे विरघळण्यासाठी या स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. योग्य प्रमाणात हे स्निग्ध पदार्थ आपल्या शरिरात असल्यास आपली त्वचा उत्तम, स्निग्ध आणि निरोगी रहाते. अतीप्रमाणात स्निग्ध पदार्थ आपल्या शरिरात गेल्यास स्थूलता, हृदयरोग, मधुमेह, अतीरक्तदाब, कर्करोग यांसारखे आजार होतात.
शेंगदाणे, करडई, नारळ, तीळ, सोयाबीन इत्यादींमध्ये तेल साठवलेले असते. याखेरीज बदाम, अक्रोड यांमध्येही अल्प मात्रेत स्निग्ध पदार्थ असतो. हे झाले वनस्पतींमध्ये मिळणारे स्निग्ध पदार्थ ! दूध, लोणी, तूप हे प्राण्यांपासून मिळणारे स्निग्ध पदार्थ होय. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांविषयीची माहिती आपण यापूर्वी २ ऑगस्ट २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या लेखामध्ये वाचलेली आहे. अशा स्निग्ध पदार्थांचा समावेश आपल्या मुलांच्या आहारात होतो ना, हे बघायला हवे.
३. पिष्टमय पदार्थ
आहारातील तिसरा आणि महत्त्वाचा पदार्थ, म्हणजे पिष्टमय पदार्थ. ऊर्जेचा मुख्य स्रोत, म्हणजे पिष्टमय पदार्थ. शरिराचे पोषण करणे, त्याची वाढ करणे, प्रथिनांची कमतरता असेल, तर पिष्टमय पदार्थांद्वारे प्रथिनांची सुरक्षा केली जाते. याचे स्रोत, म्हणजे ऊस आणि फळांमध्ये असलेली साखर, मध, साबुदाणा, बाजरी, ज्वारी, गहू, नाचणी, बटाटे, रताळी इत्यादी. ऊर्जेचा स्रोत शरिरात अल्प असेल, तर शारीरिक विकासाला बाधा येते, वजन कमी होते. तसेच अधिक प्रमाणात असेल, तर स्थूलता, मधुमेह, आहाराचे नीट पचन न होणे, अशा तक्रारी निर्माण होतात.
४. जीवनसत्त्व
आपल्या शरिराला जीवनसत्त्वांची अत्यल्प मात्र आवश्यकता असते. जीवनसत्त्वे आपल्या शरिरात ऊर्जा उत्पादनाचे कार्य करत नाहीत; परंतु त्यांचे अस्तित्व आपल्या शरिरात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ही जीवनसत्त्वे विविध जंतूसंसर्गांपासून आपल्या शरिराचे रक्षण करतात. हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, ‘सॅलड’ स्वरूपात खाण्यात येणार्या सर्व भाज्या, कडधान्ये यांमधून आपल्याला जीवनसत्त्व मिळत असते. जीवनसत्त्वाचा स्रोत हे आहाराचे पदार्थ आहेत. त्यामुळे या सर्वांचा समावेश आपल्या आहारात युक्तीने केल्यास जीवनसत्त्वांची कमतरता भासत नाही. सध्या बाजारामध्ये कृत्रिमरित्या बनवलेले जीवनसत्त्वाचे औषध सहजरित्या उपलब्ध होते. बरेच जण आवश्यकता नसतांनाही अशी जीवनसत्त्वे असलेली औषधे वरचेवर घेत असतात. त्याचे दुष्परिणाम शरिरावर होऊ शकतात, ही गोष्ट लक्षात घेतली जात नाही. जीवनसत्त्वांची पुष्कळ कमतरता असल्यास अशी औषधे घेण्यास हरकत नसते; परंतु शरिरास आवश्यकता नसतांना सुद्धा बरेच पालक आपल्या मुलांना अशी औषधे मनानेच देत असतात; पण नैसर्गिकरित्या या जीवनसत्त्वांचा स्रोत असलेले अन्नपदार्थ देण्यावर मात्र लक्ष देत नाहीत, हे येथे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
५. खनिजे अथवा क्षार
आपल्या शरिरामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, आयोडिन अशी विविध प्रकारची खनिजे महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. महत्त्वाचे खनिज म्हणजे कॅल्शियम. हाडे आणि दात यांच्या निर्मितीसाठी, मांसपेशींचे आकुंचन आणि लहान मुलांची वाढ यांसाठी हे खनिज अत्यावश्यक असते. दूध आणि दुधाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, हरभरा, कुळीथ, शेवग्याची पाने, माठ, गाजर, कढीपत्ता हे कॅल्शियमचे मुख्य स्रोत आहेत. दुसरे आणि महत्त्वाचे खनिज म्हणजे लोह. शरिरातील सर्व पेशींना प्राणवायूचा पुरवठा करण्याचे कार्य लोह करत असते. मेंदूचा विकास आणि त्याचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी अन् मांस पेशीचे कार्य सुरळीत होण्यासाठी लोह महत्त्वाची कामगिरी बजावत असते. मुलांच्या वाढीच्या वयात या खनिजाची पूर्तता होणे आवश्यक असते. वयात येणार्या मुलींना मासिक पाळीच्या वेळी होणार्या रक्तस्त्रावामुळे लोहाची कमतरता भासू शकते. म्हणून गुळ, शेंगदाणे, काळ्या मनुका, अंजिर, खारीक, खजूर इत्यादी पदार्थांचा समावेश आहारामध्ये करायला हवा.
६. महत्त्वाचे
आपल्या पाल्याचा वयोगट काय आहे ? त्याची दिनचर्या कशी आहे ? तो कोणत्या स्वरूपाचे खेळ खेळतो ? त्याची प्रकृती काय आहे ? यावर त्याचा आहार निश्चित केला जातो. उदा. एखादे मूल मैदानी खेळ खेळत नसतांना त्याला भरपूर प्रथिनेयुक्त आहार दिल्यास त्याचे पचन होणार नाही. याउलट भरपूर शारीरिक श्रम होत असतांना वरीलप्रमाणे विविध आहारांचे घटक पाल्याला मिळाले नाहीत, तर त्याच्या शरिराचे नीट पोषण होणार नाही. आहार तज्ञ किंवा वैद्य आपल्या मुलांना ‘दिवसाला किती उष्मांकाची आवश्यकता आहे, त्यानुसार त्यांनी किती प्रमाणात आहार घ्यायचा असतो ?’, याविषयी आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. सर्वसामान्य व्यक्तीला हे उष्मांकाचे गणित समजणे अवघड आहे; परंतु मुलाला दिवसातून किती वेळा भूक लागते ? वरील आहाराचे घटक त्याच्या प्रत्येक खाण्यात येत आहेत ना ? त्याचे पचन नीट होत आहे ना ? आपला पाल्य उत्साही, आनंदी, काटक आहे ना ? त्याचे वजन, उंची योग्य प्रमाणात वाढत आहे ना ? यांकडे पालकांनी कटाक्षाने लक्ष दिल्यास मुलांच्या पोषणाविषयी वेळीच पावले उचलता येतात.
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे. (२६.९.२०२३)