काँग्रेस आणि शहरी नक्षलवादी !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील भाजपच्यामेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करतांना ‘काँग्रेसमध्ये आता ‘शहरी नक्षलवाद्यां’चे चालते’, असा आरोप केला. अनेक अर्थांनी हा आरोप अतिशय गंभीर आहे. याचे अंतर्गत संदर्भ काँग्रेसच्या आतापर्यंतच्या इतिहासापासून ते जे.एन्.यू.पर्यंत आणि आतंकवादापासून ते पार खलिस्तानवाद्यांपर्यंत आहेत, असेही म्हणण्यास वाव रहातो.
वर्ष २०१८ मध्ये नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एन्.एस्.यू.आय.) या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांची नावे असलेली एक डायरी प्रसारित करण्यात आली होती. त्यात स्पष्टपणे म्हटले होते, ‘डाव्या संघटना ‘शहरी नक्षलवादा’च्या ‘प्रवर्तक’ आणि सर्व फुटीरतावादी समूहांच्या समर्थक आहेत.’ त्या ‘शहरी नक्षलवाद’ आणि ‘शहरी जातीवाद’ यांचा पुरस्कार करतात आणि ‘कँपस’मधील (विद्यापिठाच्या परिसरामध्ये) रक्तपात’ यावर लक्ष केंद्रित करतात.’ एन्.एस्.यू.आय. ही स्वतः एक डावी संघटना आहे. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे या डायरीत म्हटले होते की, डावे हे भारतीय क्रांतीकारक मंगल पांडे यांना ‘ड्रग अॅडिक्ट’ (अमली पदार्थ्यांच्या आहारी गेलेला) म्हणतात. यावरून काँग्रेसचा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा क्रांतीकारकांकडे पहाण्याचा दृष्टीकोन किती खालच्या स्तराचा, चुकीचा आणि देशविघातक आहे, हेही लक्षात येते. तत्कालीन विद्यापिठाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही डायरी प्रसारित केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, तेव्हा राहुल गांधी यांनी त्यांच्या पक्षाच्या या विद्यार्थी संघटनेची बाजू घेऊन ‘या देशात संघाविना कोणतीही अशासकीय संघटना (‘एन्.जी.ओ.’) नाही. अन्य सर्व एन्.जी.ओं. चा आवाज ते बंद करून त्यांना कारागृहात टाकले जाते’, असे उपरोधिक अर्थाचे ट्वीटही केले होते. यानंतर काँग्रेसच्या या विद्यार्थी संघटनेने सारवासारव करणारे स्पष्टीकरणही दिले होते.
काँग्रेस डाव्या किंवा साम्यवादी विचारसरणीचा किती मोठ्या प्रमाणात पुरस्कार करते, याची ही ढळढळीत उदाहरणे आहेत आणि यातून पंतप्रधानांच्या विधानांचा संदर्भ लागत जाईल. नेहरूंच्या काळापासूनच त्यांचे चीनप्रेम जगजाहीर होते. ‘काँग्रेस आरंभीच्या काळात स्वतःला समाजवादी म्हणत असली, तरी तिच्या पदराआडून साम्यवादच जोपासत होती’, असे म्हटले तर चूक नव्हे. त्यामुळे आजही मार्क्सवादी विचारसरणीशी काँग्रेसची उघड उघड जवळीक पदोपदी दिसून येते. वर्ष १९६९ मध्ये इंदिरा गांधींच्या काँग्रेस सरकारला डाव्यांनी पाठिंबा देऊन वाचवले आणि तेव्हापासूनच साम्यवाद्यांचे ‘ऋण’ म्हणून कि काय साम्यवादी जे काही म्हणतील, ते काँग्रेसने केले. पुढे १९७० च्या दशकात मालमत्तेवरील मूलभूत अधिकार काढला, अधिकोषांचे राष्ट्रीयीकरण आणि उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले अन् अंतिमतः राज्यघटनेत सर्वधर्मसमभाव शब्दही घुसडला. ‘इंडियन काऊन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’, ‘इंडियन काऊन्सिल ऑफ सायन्टिफिक रिसर्च’, ‘इंडियन काऊन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च’, अशा सर्व महत्त्वाच्या संस्थांमध्ये डाव्यांनी त्यांचे हातपाय पसरले. तसेच जे.एन्.यू.ची निर्मिती करून विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची तिथे नेमणूक करण्यात आली. तेथे पहिली पत्रकारितेची पदवी चालू केली. प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, पत्रकार सारे काही होण्यासाठी तिथे जाणे जणू अपरिहार्य ठरले. हे सारे काँग्रेसच्या सहकार्यानेच साम्यवाद्यांनी केले. मधल्या काळात राहुल गांधी चीनमध्ये जाऊन तेथील पंतप्रधानांना भेटून आले. राहुल गांधी गेली काही वर्षेे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात मुद्दामहून विधाने करत असतात. तीही त्यांची विकृत साम्यवादी मानसिकताच दर्शवते.
वर्ष २०१८ मध्येही पंतप्रधान मोदी यांनी ‘छत्तीसगडमधील वाढत्या नक्षलवादाला उत्तरदायी असणार्या शहरी नक्षलवादाला काँग्रेस साहाय्य करत आहे’, असा आरोप केला होता; कारण पत्रकाराची हत्या करणार्या नक्षलवाद्यांना काँग्रेस ‘क्रांतीकारक’ म्हणत होती. १० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसने नक्षलग्रस्त छत्तीसगडचा विकास होऊ दिला नाही. तेथील आदिवासींचा योग्य तो विकास करण्याऐवजी त्यांना तसेच ठेवून उलट त्यांच्या हातात बंदुका देण्याची सोय काँग्रेसने केली. ही छत्तीसगडमधील आदिवासी किंवा जंगलात रहाणार्या समाजाची क्रूर चेष्टाच म्हणावी लागेल.
साम्यवादी काँग्रेसवर कारवाई करा !
‘समानता’ हे साम्यवाद्यांचे केवळ वैचारिक वादासाठी निर्माण केलेले नाटक आहे’, हे साम्यवाद्यांनी जगभर केलेल्या क्रूर हत्यांचा इतिहास जेव्हा समोर येतो, तेव्हा लक्षात येते. केवळ ‘धर्मद्वेष’ हेच साम्यवाद्यांचे मूळ आहे आणि त्यासाठी आदिवासी समाजाचा लाभ उठवून त्यांच्यासमोर भांडवलशाहीचे नाटक उभे करून त्यांना शासनाच्या विरोधात भडकावणे आणि शहरी पातळीवर प्राध्यापक, लेखक, कलाकार आदींच्या माध्यमातून याची सूत्रे हालवली जाणे, हे त्यांचे सध्याचे भारतातील स्वरूप आहे. त्यांना विदेशातून पैसाही येतो. ‘इतकी वर्षे काँग्रेस हे सर्व चालवून घेत होती आणि त्याला एकप्रकारे पाठिंबाही देत होती’, असे चित्र पुढे येते. केरळ, बंगाल, त्रिपुरा यांसारख्या साम्यवादी राज्यांची आज काय स्थिती आहे ? येथे विकास तर झालेलाच नाही; उलट हिंदूंवर प्रचंड आघात चालू आहेत. साम्यवाद्यांनी काँग्रेसचे साहाय्य घेऊन नक्षलवाद वाढवण्यास चालना दिली. आरंभीच्या काळात गरिबांच्या शोषणाच्या विरोधात म्हणून चालू केलेली ही चळवळ आता विदेशातून देशाला खिळखिळे करण्यासाठी येत असलेल्या पैशांमुळे अक्षरशः एक धंदा झाली आहे.
विश्वातील साम्यवाद धुळीला मिळत असूनही भारतात मात्र केरळसारखी राज्ये, जे.एन्.यू.सारखी विद्यापिठे, काही प्रसारमाध्यमे आणि कथित विचारवंत यांच्यामध्ये अजून तो शिल्लक आहे. पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसही सध्या शहरी नक्षलवाद चालवत असेल, तर देशाला तिच्यापासून फार मोठा धोका आहे, हे तर उघडच आहे. त्यामुळे सरकार नक्षलवाद्यांसाठी जे धोरण अवलंबते, तेच त्यांनी काँग्रेससाठीही राबवणे अपरिहार्य ठरते; म्हणूनच शहरी नक्षलवादी चालवत असलेल्या काँग्रेसवर आता शासनाने लवकरात लवकर बंदीची कारवाई करावी !
शहरी नक्षलवाद चालवत असलेल्या काँग्रेसवर शासन काय कारवाई करणार ? |