बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्‍या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील शास्‍त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन 

प.पू. कलावतीआई

‘ज्ञानप्राप्‍तीसाठी एक जिज्ञासा आणि दुसरा त्‍याग, हे दोन मुख्‍य आहेत.’ ‘जिज्ञासा’ म्‍हणजे भवसागरातून पार होण्‍याची तळमळ आणि ‘त्‍याग’ म्‍हणजे काम, क्रोध, लोभ, मोह अन् मत्‍सरादिकांच्‍या संगतीपासून सुटणे होय.’
– प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’)

२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन

पू. किरण फाटक

२ अ. जिज्ञासा

२ अ १. प्रत्‍येकात गुरुतत्त्व लपलेले असल्‍याने ‘स्‍वतःच स्‍वतःला प्रश्‍न विचारून ज्ञान प्राप्‍त करणे’, म्‍हणजे स्‍वतःच स्‍वतःचे गुरु होणे : ‘आपला जन्‍म कशासाठी झाला ? आपण या जगात कशासाठी आलो ? या जगात येऊन आपण कोणते कार्य केले पाहिजे ?’, याचे ज्ञान असावे’, असे मला वाटते. सर्व संत सांगतात, ‘आत्‍म्‍याचे ज्ञान म्‍हणजे खरे ज्ञान’; परंतु ‘आत्‍मा’ ही गोष्‍ट अजून कुणीही पाहिलेली नाही; म्‍हणूनच ‘आत्‍म्‍याचे ज्ञान’ यावर लोकांचा फारसा विश्‍वास बसेलच, असे नाही. ‘स्‍वतःची ओळख स्‍वतःच पटवून घेणे, ‘स्‍वतःमध्‍ये कोणते गुण आहेत ?’, हे ओळखून त्‍याप्रमाणे आपले व्‍यक्‍तीमत्त्व घडवणे’, म्‍हणजेच स्‍वतः स्‍वतःचे गुरु होणे. गुरुतत्त्व हे प्रत्‍येक माणसामध्‍ये लपलेले असते. काहींना ते लहान वयातच कळून येते, तर काहींना ते वयाने पुष्‍कळ मोठे झाल्‍यावर कळून येते. ‘स्‍वतःला प्रश्‍न विचारणे, त्‍यांची उत्तरे शोधणे आणि त्‍यांतून ज्ञान प्राप्‍त करणे’, हे प्रत्‍येकाच्‍या हातात असते.

२ आ. त्‍याग

२ आ १. मानसिक शांती आणि समाधी यांच्‍या आड येणार्‍या सहा रिपूंचा क्रमाक्रमाने त्‍याग करून मन निर्मळ करणे, म्‍हणजे ज्ञान ! : शेवटी ‘ज्ञान म्‍हणजे काय ?’, हा प्रश्‍न उरतोच. माझ्‍या मते ज्ञान म्‍हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्‍सर यांचा क्रमाक्रमाने त्‍याग करत मन स्‍वच्‍छ पाण्‍यासारखे नितळ करणे. संत आणि विद्वान मनाच्‍या या सहा विकारांना ‘सहा रिपू’, असेही संबोधतात. ‘हे रिपू मृत्‍यूनंतर वैश्‍विक शक्‍तीशी आपले मीलन होण्‍याआड येतात’, असे म्‍हणतात. रिपू म्‍हणजे शत्रू. हे शत्रू आपल्‍याला मानसिक शांती आणि समाधी-अवस्‍था मिळू देत नाहीत. ते सतत आपल्‍याला पीडा देत रहातात. आधीच आपले मन चंचल आहे आणि त्‍यात भर म्‍हणून कि काय, हे शत्रू वेगवेगळी प्रलोभने आपल्‍या ज्ञानेंद्रियांसमोर ठेवून आपले मन कलुषित करत असतात.

२ इ. सुख-दुःख आणि संतांच्‍या सत्‍संगामुळे मिळणारा आनंद !

२ इ १. ‘आनंद’ हा मनात असूनही माणूस त्‍याच्‍या शोधात धडपडत असणे : ‘मला काहीतरी हवे आहे. मला अमुक गोष्‍ट मिळाली, तर माझे भले होईल. मला सुख लाभेल. आनंद मिळेल’, असे माणसाला मरेपर्यंत वाटत रहाते. सुख आणि आनंद यांसाठी तो जन्‍मभर जंग जंग पछाडतो; पण त्‍याच्‍या हाती ते सुख काही येत नाही; कारण सर्व संत म्‍हणतात, ‘सुख हे मानण्‍यावर आहे आणि आनंद हा आपल्‍या मनातच आहे.’ आपण जर आनंदी रहायचे ठरवले, तर निश्‍चित आनंदी राहू शकतो. ‘आनंद म्‍हणजे नक्‍की काय ?’, हे कुणाला सांगता येणार नाही. ‘न होता मनासारिखे दुःख मोठे ।’, असे समर्थ रामदासस्‍वामी म्‍हणतात. जेव्‍हा आपल्‍या मनासारखे काही होत नाही, तेव्‍हा आपले मन दुःखी होते; परंतु ‘आपल्‍या मनासारखे झाल्‍यावर जी काही मनाची अवस्‍था होते, त्‍याला ‘आनंद’ म्‍हणत असावेत’, असे मला वाटते. ‘आनंद’ ही मनाची एक अवस्‍था आहे.

२ इ २. सतत मनाविरुद्ध घटना घडल्‍यावर माणूस निराश होणे आणि तत्‍कालीन परिस्‍थितीचा त्‍याला राग येऊ लागणे : आयुष्‍यात जे घडायचे असते, ते घडतच रहाते; परंतु त्‍या घटनांमुळे आपले मन कधी कधी उद्विग्‍न होते, कंटाळते, दुःखी होते, तर काही घटनांमुळे आपले मन सुखावते आणि आनंदी होते. वेगवेगळ्‍या घटनांचा मनावर विपरीत किंवा चांगला परिणाम होत रहातो. आपले मन खंबीर नसले, तर मात्र माणूस सतत अस्‍वस्‍थ रहातो. तो या घटनांमध्‍ये ‘सुख देणार्‍या घटना’ आणि ‘दुःख देणार्‍या घटना’, असा फरक करत रहातो. घटना ही घटना असते; परंतु तिचा परिणाम माणसाच्‍या मनावर होत रहातो आणि तो ‘अनुभव’ म्‍हणून माणसाच्‍या मनावर कोरला जाऊन त्‍याप्रमाणे माणूस आपले पुढील वर्तन करू लागतो. आयुष्‍यातील चांगल्‍या-वाईट घटनांमुळे माणसाचा मूळ स्‍वभाव पालटत जातो. कुठलाही माणूस जन्‍माला येतो, तेव्‍हा वाईट स्‍वभावाचा नसतो; परंतु चांगल्‍या-वाईट परिस्‍थितीमुळे त्‍याचा स्‍वभाव पालटत जातो. शेवटी असे म्‍हणण्‍याची वेळ येते, ‘कोण होतास तू । काय झालास तू ॥’ ज्‍या वेळी सतत मनाविरुद्ध घटना घडत जातात, त्‍या वेळी माणूस निराश होतो. त्‍याचे मन खट्टू होते आणि समाजातील तत्‍कालीन परिस्‍थितीचा त्‍याला राग येऊ लागतो.

२ इ ३. माणसाने संतांच्‍या उपदेशाप्रमाणे आचरण केल्‍यास त्‍याचे सहा रिपू शांत होणे आणि तो शांत अन् समाधी अवस्‍थेला पोचणे : सर्व संत सांगतात, ‘सम आणि विषम परिस्‍थितीत आपले मन शांत ठेवून परिस्‍थितीशी दोन हात करत राहिले पाहिजे.’ यालाच ‘यशस्‍वी जगणे’, असे म्‍हणतात. ‘मन शांत ठेवणे’, हे अभ्‍यासाने आणि स्‍वसंवादातून जमू शकते. यासाठी माणसाला एक चांगला आध्‍यात्‍मिक गुरु भेटावा लागतो. त्‍यांच्‍या सहवासात रहावे लागते आणि त्‍यांचा उपदेश ग्रहण करून त्‍याप्रमाणे आचरण करावे लागते. त्‍यामुळे हळूहळू काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्‍सर, हे सहा शत्रू हळूहळू शांत होतात. माणसाला नंतर कसलीही आसक्‍ती उरत नाही. मला ‘हे हवे, ते हवे’, असे वाटत नाही; कारण ‘सुख आणि दुःख या मनाच्‍या अवस्‍था आहेत’, हे त्‍याला कळून येते. ‘जे वाट्याला येते, त्‍याचा आनंदाने स्‍वीकार करणे आणि जे येत नाही, त्‍याबद्दल विचार न करणे’, असे त्‍याचे वर्तन होऊन जाते. अशा प्रकारे माणूस आशा-निराशेच्‍या वाईट चक्रातून सुटतो आणि एका वेगळ्‍याच शांत अन् समाधी अवस्‍थेला पोचतो.’

– (पू.) किरण फाटक, डोंबिवली, जिल्‍हा ठाणे. (७.८.२०२३)