सिंधुदुर्ग किल्ल्यावर २७ सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिन साजरा होणार
मालवण – २७ सप्टेंबर या ‘जागतिक पर्यटन दिन’ सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णु मोंडकर यांनी दिली आहे.
भारत सरकार पर्यटन विभाग, पर्यटन व्यावसायिक महासंघ, तारकर्ली पर्यटन विकास संस्था, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेला ‘युवा टुरिझम् क्लब’, ग्राम पर्यटन समिती अध्यक्ष आणि समिती सदस्य यांच्या माध्यमातून हा दिन साजरा केला जाणार आहे.
‘पर्यटन आणि हरित गुंतवणूक’ ही ‘जागतिक पर्यटन वर्ष २०२३’ ची जागतिक संकल्पना (थीम) असून त्यानुसार हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी ९ वाजता स.का. पाटील महाविद्यालय, मालवण येथे होणार आहे.
त्यानंतर सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची विधीवत् पूजा करण्यात येणार आहे. या वेळी उपस्थितांना सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती देण्यात येणार आहे, तसेच किल्ला परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. या वेळी भारतीय पर्यटन विभाग नवी देहली येथील अधिकारी सौ. भावना शिंदे, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती मोंडकर यांनी दिली.