प्रदूषणाच्या नावाखाली श्री गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करणार्यांचे कुंभारांशी साटेलोटे ?
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – जयसिंगपूर येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी आलेल्या भाविकांना प्रदूषणाच्या नावाखाली मूर्तीदान करण्याचे आवाहन केले होते. नदीच्या किनारी दान घेतलेल्या या श्री गणेशमूर्ती या ‘आयशर टेंपो’मधून कोल्हापूर, सांगली येथील कुंभारांना अगोदरच विकल्याची चर्चा जनमानसात आहे.
१. या संदर्भात श्री गणेशमूर्ती घेऊन जाणार्या संबंधित वाहनचालकास सकल हिंदु समाजाचे श्री. सुनील ताडे, श्री. भीमराव हडपद, धर्मप्रेमी श्री. स्वप्नील संजीव बन्ने, श्री. संकेत संजीव बन्ने यांनी याविषयी वारंवार विचारणा केल्यास प्रारंभी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
२. या मूर्ती कुंभारांना दान देता येणार नाहीत आणि त्याचे विधीवत् नदीत विसर्जन झाले पाहिजे, असा आग्रह श्री. सुनील ताडे यांनी धरला आणि त्या संदर्भात ते पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेले.
३. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी ‘प्रशासनाने मूर्तीदान करण्याचे आवाहन केले असल्याने या संदर्भातील तक्रार करता येणार नाही. तुम्ही लोकांचे प्रबोधन करू शकता. भाविकांवर मूर्तीदान करण्याची कुणीही सक्ती केलेली नाही’, असे तेथील पोलीस निरीक्षकांनी सांगून हिंदुत्वनिष्ठांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे हे उपस्थित होते.