नवी मुंबईमध्ये ६३ वर्षे ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा कायम राखणारे आग्रोळी गाव ! Ganeshotsav
नवी मुंबई – नवी मुंबईमध्ये मागील ६३ वर्षांपासून सर्व राजकीय आणि कौटुंबिक मतभेद बाजूला ठेवून ‘एक गाव एक गणपति’ ही परंपरा कायम राखणारे प्रमुख गाव म्हणून आग्रोळी गावाचे नाव अग्रक्रमाने घेण्यात येते. सिडकोनिर्मित नवी मुंबई शहर अर्थात् पनवेल, उरण, नवी मुंबई या क्षेत्रातील ९५ गावांपैकी केवळ आग्रोळी गावात ‘एक गाव एक गणपति’ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. (Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)
लोकमान्य टिळक यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी विविध प्रकारे समाजाला संघटित करण्याच्या प्रयत्न केला. त्यामध्ये हिंदु समाजाला संघटित करण्याकरिता घराघरात बसत असलेला गणपति चौकात आणून या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्यातून हिंदूंचे संघटन करून हिंदूंना संघटनशक्तीची क्षमता लक्षात आणून देत स्वातंत्र्यप्राप्तीकरता प्रेरित केले. आग्रोळी गावातही पूर्वीपासून एखाद्याला अडचण आली, तर अख्खे गाव त्याच्या सहाय्यासाठी धावून जात असे. ही एकी कायम ठेवण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या विचारांतून प्रेरणा घेत गावातील काही विचारवंतांनी ‘घरोघरी श्री गणेशमूर्ती न बसवता ती सार्वजनिक ठिकाणी एकत्रीतपणेच बसवावी’, अशी सूचना मांडली.
वर्ष १९६० पूर्वी गावांमधील ५ ते ६ कुटुंबांमध्ये गणेशमूर्ती आणली जात होती. वर्ष १९६१ मध्ये भाऊ सखाराम पाटील, नथू लडक्या म्हात्रे, हाशा माया पाटील, तुकाराम डोंगरे, महादेव वैद्य, लक्ष्मण पाटील, शिमग्या पाटील, शंकर शिवा पाटील आदी ग्रामस्थांनी एकत्र येऊन ‘एक गाव एक गणपति’ करूया अशी संकल्पना मांडली. तेव्हापासून १० दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा चालू झाली. ती आजतागायत कायम आहे. राज्यातील इतर गावांप्रमाणेच याही गावांमध्ये विविध विचारधारांचे, तसेच विविध राजकीय पक्षांचे गटतट आहेत. असे असले, तरी पूर्वजांनी घालून दिलेल्या या एकीचे महत्त्व मागील अनेक पिढ्यांवर आणि आताच्या तरुणांवरही चांगल्या प्रकारे बिंबले आहे. त्यामुळे गेल्या ६३ वर्षांमध्ये इतर गावांप्रमाणे ‘एक गाव अनेक गणपति’ करण्याची दुर्बुद्धी अद्यापपर्यंत कोणालाही झाली नाही. याचा आम्हा सर्व ग्रामस्थांना हेवा वाटत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या या काळामध्ये १० दिवस मंदिरात संपूर्ण गाव एका कुटुंबाप्रमाणे वावरत असते. आजही गावामध्ये ‘एक गाव एक गणपति’प्रमाणे ‘एक गाव एक होळी’, ‘एक गाव एक दहीहंडी’, तसेच अन्य सर्व उत्सव एकत्रपणे साजरे केले जातात. हीच ऐकी पुढे कायम राखत ज्या तारखेला एखाद्या कुटुंबामध्ये लग्न ठरले असेल, तर तीच लग्नाची तारीख दुसरे कुटुंब ठेवत नाही.
(सौजन्य : THE MONA’S VLOG)
आजही कोणतेही अवाढव्य खर्च न करता भक्तिमय वातावरणात हा ‘एक गाव एक गणपति’चा गणेशोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा होत आहे.
पूर्वीपासून गणपतीचे आगमन टाळ- मृदुंगाच्या गजरात केले जाते; ते आजही कायम आहे. या वेळी टाळ मृदुंगासह पारंपरिक फेर्यांची गाणी गात महिला नृत्य करतात. १० दिवसांच्या गणरायाच्या या आराधनेमध्ये पूर्वीपासून भजने सादर केली जात आहेत. यामध्ये केवळ याच गावातील नव्हे, तर नवी मुंबईतील विविध गावांतील भजनी मंडळी आरंभापासून उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. हीच परंपरा आजही कायम टिकून आहे. तसेच महिला आणि लहान मुले यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजने केले जाते. यामध्ये मुलांच्या निबंध आणि चित्रकला स्पर्धा भरवल्या जातात. तसेच गावातील महिला परंपरेनुसार चालत आलेली धार्मिक फेर्यांची गाणी गात, नृत्य करत अत्यंत भक्तीभावाने गणरायाची आराधना करत असतात.
मागील काही वर्षांमध्ये पर्यावरणरक्षण आणि पाणी वाचवणे यासंदर्भात मंडळाच्या वतीने जनजागृतीपर फेर्या पंचक्रोशीत काढण्यात आल्या होत्या. आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे, असे ‘एक गाव एक गणपति’ आग्रोळी गाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार स्वरूप पाटील यांनी सांगितले.