श्री गणेशाची आध्यात्मिक माहिती Ganesh
(Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)
श्री गणेश आणि २१ संख्या
‘श्री गणेशाची भक्ती करतांना २१ दूर्वा, २१ लाल फुले, २१ मोदक असे अर्पण केले जाते. हे कशाचे प्रतीक आहे ? गणेश ही पराक्रमाची देवता असून तो प्रत्येक देव-दानवांच्या युद्धामध्ये सेनापती होता आणि त्याची सैन्यरचना २० सैनिक अन् त्यावर २१ वा नेता अशी होती. त्या पराक्रमाचे प्रतीक म्हणूनच २१ या संख्येत त्याला वस्तू समर्पण केल्या जातात.
श्री गणेशाला पहिला नमस्कार का ?
कोणत्याही शुभकार्याला प्रारंभ करतांना आपण ‘श्री गणेशाय नमः ।’, असे म्हणत गणपतीचे स्मरण करतो. स्वर्गातील देवीदेवता स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या म्हणण्यानुसार पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा करण्यास निघाले. गणपतीने आपल्या युक्तीचातुर्याने शास्त्राप्रमाणे आपल्या मातापित्यांना ७ प्रदक्षिणा घालून सर्वप्रथम पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि अग्रपूजेचा मान मिळवला. तेव्हापासून पहिली पूजा आणि पहिला नमस्कार गणपतीला करतात.
अंगारकीचे विशेष महत्त्व
पूर्वी उज्जयिनी नगरात भारद्वाज नावाचे एक वेदशास्त्रसंपन्न ऋषि रहात होते. ते अग्निहोत्री होते. भारद्वाज ऋषींनी एका ‘मंगल’ नावाच्या लाल रंगाच्या मुलास गजाननाचे अनुष्ठान करण्यास सांगितले. तेव्हा त्या मुलाने नर्मदा तीरावर राहून गजाननाचे अनुष्ठान आणि घोर तपश्चर्या केली. त्यामुळे श्री गणेश प्रसन्न झाला आणि त्याने त्या मुलाला वर मागण्यास सांगितले. त्या वेळी मंगलाने अमृत प्राशनाची इच्छा करून ‘आपले नाव विख्यात व्हावे’, असा वर मागितला. तो दिवस चतुर्थीचा होता. त्यावर श्री गणेशाने आशीर्वाद देतांना सांगितले, ‘‘मंगळवारी चतुर्थी आली की, तिला विशेष महत्त्व प्राप्त होऊन ती ‘अंगारकी चतुर्थी’ असेल. तू लाल आहेस, तेव्हा ‘मंगल’ म्हणून प्रसिद्ध होशील. या मंगलाने तेथेच देवालय बांधले (आज हे मंदिर ‘मंगलनाथ’ या नावाने प्रसिद्ध आहे.) आणि त्या मूर्तीस ‘मंगलमूर्ती’ असे नाव दिले.’
(साभार : मासिक ‘सदाचार आणि संस्कृति’, सप्टेंबर २०१४)