पुणे विद्यापिठामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनास विद्यापिठाचा विरोध !
अनुमतीच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप !
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे यांचे ‘जाहीर कीर्तन’ या कार्यक्रमास विद्यापीठ प्रशासनाने अनुमती दिलेली नाही. ‘तरीही तुम्ही कार्यक्रम केल्यास तुमच्यावर योग्य ती न्यायालयीन कारवाई केली जाईल’, अशा आशयाचे धमकीवजा पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या सुरक्षा विभागाने ‘विद्यार्थी गणेश उत्सव समिती’ला दिले आहे. कार्यक्रमाचे निमंत्रण सामाजिक माध्यमांवर (व्हॉट्सअॅप) प्रसारित झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला समजल्यानंतर सदरचे पत्र दिले आहे. अनुमतीच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
विद्यापिठात शिकत असणार्या विद्यार्थ्यांनी सांगितले की,
१. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये गेल्या १५ वर्षांपासून श्री गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. ‘विद्यार्थी गणेश उत्सव समिती’च्या वतीने राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे यांचे ‘जाहीर कीर्तन’ २३ सप्टेंबर या दिवशी आयोजित केले होते. त्याला कुलपती डॉ. सुरेश गोसावी यांनी विरोध केला. परिणामी हा कार्यक्रम रहित करावा लागला. (गणेशोत्सवात राष्ट्रीय कीर्तनकाराच्या कीर्तनासारखे कार्यक्रम घ्यायचे नाहीत, तर कोणते कार्यक्रम घ्यावेत ? असे विद्यापीठ प्रशासनाला वाटते ? – संपादक)
२. आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत. तेही चांगल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक पद्धतीने; परंतु कायदा अन् अधिकार यांचा अपलाभ घेत गणपति बाप्पा आणि भारतीय संस्कृती यांचा अवमान कुलगुरु आणि विद्यापीठ प्रशासन यांनी केला आहे.
३. सा. फुले पुणे विद्यापिठात शिकत असणारे विद्यार्थी गणेश उत्सव साजरा करत आहेत, म्हणून कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी हे गुन्हे नोंदवण्याचे आदेश पोलिसांना देत आहेत; परंतु हेच कुलगुरु जेव्हा विद्यापिठाच्या ‘अनिकेत कॅन्टीन’ येथे आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिसच्या) कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वतः भूषवतात तेव्हा मात्र त्यांना आनंद होत असतो. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे महाराज यांच्या कार्यक्रमाला विरोध करणे त्यांना योग्य वाटते. अशा कुलगुरूंचा आम्ही जाहीर निषेध करतो.
संपादकीय भूमिका
|