सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या आईला जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
वामन जयंती (२६.९.२०२३) या दिवशी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांचा ५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्याविषयी त्यांच्या आई सौ. मानसी राजंदेकर यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूणे सूत्रे येथे दिली आहेत.
पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्या चरणी ५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी पू. वामन राजंदेकर यांनी स्वतः निवडून घातलेल्या सदर्याचा रंग आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वस्त्रांचा रंग समान असणे
‘पू. वामन राजंदेकर यांना अन्य वेळी पुष्कळच उष्णता जाणवत असल्याने त्यांना सतत थंड हवेत (वातानुकूलित खोलीत) रहावे लागते. असे असूनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी जातांना त्यांनी स्वत: निवडलेला सदरा आणि त्यावर ‘जॅकेट’ घातले होते. त्यांच्या सदर्याचा रंग आणि प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) वस्त्रांचा रंग समान होता. त्या वेळी ‘पू. वामन यांनी त्याच रंगाचा सदरा का निवडला असेल ?’, हे माझ्या लक्षात आले.
२. मैदानात गेल्यावर ‘पुष्कळ ऊन असल्याने पू. वामन यांना त्रास होईल’, असे वाटणे; परंतु पू. वामन यांना जराही त्रास न होणे आणि त्यांचा चेहरा शांत अन् तेजस्वी दिसणे
आम्ही ब्रह्मोत्सव साजरा होणार्या मैदानात गेल्यावर तेथे पुष्कळ ऊन असल्याने उष्णताही जाणवत होती. मला वाटले, ‘पू. वामन यांना पुष्कळ घाम येऊन त्रास होईल’; मात्र आश्चर्य म्हणजे पू. वामन यांना उष्णतेचा जराही त्रास झाला नाही आणि त्यांना घामही आला नाही. ते दुपारी ३.३० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत आसंदीत शांतपणे बसून होते. त्यांनी ‘मला उकडत आहे किंवा वारा लागत नाही’, असे एकदाही मला सांगितले नाही. त्यांचा चेहरा शांत आणि तेजस्वी दिसत होता. (नंतर पुढील अनुभूतीमध्ये यामागचे कारण स्पष्ट झाले.)
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी संबंधित कोणताही कार्यक्रम किंवा याग असेल, तर पू. वामन यांनी अन्न ग्रहण न करणे आणि त्यांनी ‘उपवास असून मला भूक लागत नाही’, असे सांगणे
अ. प.पू. गुरुदेवांशी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी) संबंधित कोणताही सोहळा असेल, तसेच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात याग असेल, त्या दिवशी पू. वामन अन्न ग्रहण करत नाहीत. ते सोहळा किंवा याग आदी पूर्ण झाल्यानंतरच अन्न ग्रहण करतात. असे त्यांचे लहानपणापासूनच आहे. (ते म्हणतात, ‘‘प.पू. गुरुदेवांचा सोहळा असतांना माझा उपवास असतो. त्या दिवशी मला भूक लागत नाही.’’)
आ. ब्रह्मोत्सवाच्या दिवशीही दिवसभर त्यांनी काहीच खाल्ले नाही. ते दुपारी जेवलेही नाहीत. सोहळा चालू असतांना ते मधून मधून केवळ थोडे पाणी पित होते. त्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये; म्हणून दोन बिस्किटे खायला सांगितल्यावर त्यांनी बिस्किटे खाल्ली. आम्ही त्या दिवशी रात्री ९.३० वाजता घरी गेल्यावर ते म्हणाले, ‘‘नारायणांचा (‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पू. वामन ‘नारायण’, असे संबोधतात.’ – संकलक) ब्रह्मोत्सव किती सुंदर झाला ना ! आता मला जेवायला दे.’’
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव पहातांना पू. वामन राजंदेकर यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी केलेले त्यांचे वर्णन !
अ. नारायण (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ रथात बसून मैदानात आले. त्या वेळी ते रथात बसलेले नसून ‘गुलाबी रंगाच्या कमळांत बसले आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसत होते. ते तिघेही वेगवेगळ्या कमळांत बसले होते. नारायणांचे कमळ पुष्कळ मोठे होते.
आ. ‘आरंभी मी सूक्ष्मातून नारायणांच्या जवळ एका कमळात बसलो आहे’, असे मला दिसत होते. यामुळेच मला उष्णता जाणवली नाही आणि घामही आला नाही; कारण मी मैदानात नव्हतो. मी तर नारायणांसमवेत होतो ना ! नंतर मला दिसले, ‘मी नारायणांच्या चरणांशी झोपलो आहे.’ मला त्यांच्या चरणांचा स्पर्श जाणवला.
इ. नारायणांच्या पुढे ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदामावशी आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू या बसल्या आहेत’, असे मला दिसले.
ई. ते मैदान नव्हतेच, तर तो क्षीरसागर म्हणजे समुद्र होता. त्यात नारायण श्री महालक्ष्मी देवीसह होते.
उ. तेथे हीना अत्तराचा पुष्कळ सुगंध येत होता.
ऊ. नारायणांकडून (सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांकडून) गुलाबी रंग आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदामावशी अन् श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्याकडून पांढरा रंग सगळीकडे जात होता.
५. पू. वामन यांचा सनातनच्या तिन्ही गुरूंप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या प्रती) असलेला भाव लक्षात येणे
पू. वामन यांनी ‘ब्रह्मोत्सव सोहळा कसा अनुभवला’, याविषयी सांगितले. त्यांच्या अनुभूती ऐकल्यावर त्यांचा तिन्ही गुरूंप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ) असलेला भाव आणि त्यांचे तिन्ही गुरूंशी असलेले अनुसंधान लक्षात येते. पू. वामन यांचे वय केवळ चार वर्षे आहे; मात्र ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेने पू. वामन यांचे आध्यात्मिक सामर्थ्य किती आहे !’, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
६. ‘आलेली अनुभूती आध्यात्मिक स्तरावर अल्प शब्दांत अचूक सांगणे’, हे पू. वामन यांचे वैशिष्ट्य असल्याचे गुरुकृपेने लक्षात येणे
पू. वामन यांना आलेल्या अनुभूती जितक्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत, तितकेच त्यांनी या वयात केलेले अनुभूतींचे विश्लेषणही वैशिष्ट्यपूर्ण आहे. बर्याच वेळा आपण आध्यात्मिक स्तरावर काहीतरी अनुभवतो; परंतु ते आपल्याला योग्य शब्दात मांडता येतेच, असे नाही. ‘आलेली अनुभूती आध्यात्मिक स्तरावर अल्प शब्दांत अचूक सांगणे’, हेही पू. वामन यांचे वैशिष्ट्यच असल्याचे गुरुकृपेने माझ्या लक्षात आले.
७. कृतज्ञता आणि प्रार्थना !
‘प.पू. गुरुदेव, ‘केवळ आपल्याच कृपेने पू. वामन यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती अनुभवायला मिळत आहेत. त्यांना आलेल्या अनुभूतींचे भावार्थ आणि वर्णन आता तेच करत आहेत. यात ‘लिखाण करतांना मला साहाय्य व्हावे’, असा त्यांचा विचार असतो. ‘पू. वामन यांच्याकडून मला अधिकाधिक शिकता येऊ दे आणि त्यातून तुम्हाला अपेक्षित अशी माझी साधना होऊ दे’, हीच आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांची आई, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ३९ वर्षे), फोंडा, गोवा. (१९.५.२०२३)
‘नारायणाच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) मांडीवर झोपल्यावर अहं वाढत असल्याने नारायणाच्या चरणांजवळ झोपलो आहोत’, असा भाव ठेवण्यास सांगणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) !‘२१.२.२०२३ या दिवशी रात्री ११.४० वाजता झोपतांना माझी मुलगी कु. श्रिया (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ११ वर्षे) म्हणाली, ‘‘वामन, आपण नारायणाच्या मांडीवर झोपलो आहोत’, असा भाव ठेवूया.’’ तेव्हा पू. वामन म्हणाले, ‘‘आपण त्यांच्या मांडीवर नको, तर त्यांच्या चरणांजवळ झोपलो आहोत’, असा भाव ठेवूया.’’ त्यानंतर पू. वामन आणि माझ्यामध्ये पुढील संभाषण झाले. मी : नारायणाच्या मांडीवर झोपणे आणि चरणांजवळ झोपणे यांत काय भेद आहे ? पू. वामन : मांडीवर झोपलो, तर आवरण येते आणि चरणांजवळ झोपलो, तर कधीच आवरण येत नाही. मी : ‘आवरण म्हणजे अहंकार’, असे आहे का ? पू. वामन : हो. अचूक आहे. (आवरण म्हणजे अहं असतो.) यावरून पू. वामन यांना सांगायचे होते, ‘नारायणाच्या चरणांजवळ झोपल्यावर कधीच आवरण येत नाही. नारायणाच्या मांडीवर बसलो किंवा झोपलो, तर आवरण म्हणजेच अहंकार येतो. आपल्याला आपलेच कौतुक वाटते. तसे चांगले नसते. आपली साधना होत नाही. आपण नारायणाजवळ असलो, तरी दूर जातो. नारायणामध्ये साधकांची मुक्ती असते. ती त्यांच्या चरणांजवळ राहिलो, तरच मिळते; नाहीतर मिळत नाही.’ – सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांच्या आई, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ३९ वर्षे), फोंडा, गोवा. (२१.३.२०२३) |
|