निरोगी रहाण्यासाठी शरीर, अवयव आणि इंद्रिये यांच्याप्रती कृतज्ञ रहाण्याचे महत्त्व !
‘आपण आपल्याला प्राप्त होणारी प्रत्येक गोष्ट, सुविधा आणि आरोग्य यांविषयी कृतज्ञ रहायला हवे. आपण अनेक गोष्टी गृहीत धरून वावरतो. अनेकदा जेवतांनाही अन्नाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे राहून जाते. केवळ अन्नाप्रतीच असे नव्हे, तर प्रत्येक वेळी पाणी पितांना किंवा कोणताही पदार्थ अगदी औषध घेतांनाही त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे.
१. शरिराविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे निरोगी रहाण्यामागील रहस्य !
आपल्याला लाभलेल्या शरिराविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे निरोगी रहाण्यामागील रहस्य आहे. आपले पंचज्ञानेंद्रिय मेंदूमध्ये स्थित असून त्यांचे कार्य त्यांच्या अधिष्ठानांद्वारे (कानांद्वारे एकणे, त्वचेद्वारे स्पर्शज्ञान होणे, डोळ्यांद्वारे पहाणे, जीभेद्वारे चव कळणे आणि नाकाद्वारे गंधज्ञान होणे) योग्य प्रकारे होत असल्याने आपल्याला अनेक गोष्टी अनुभवता येतात. अशा पंचज्ञानेंद्रियांविषयी सदैव कृतज्ञ रहावे. केवळ पंचज्ञानेंद्रियच नव्हे, तर पंचकर्मेंद्रिये आणि एकूणच आपले नखशिखांत शरीर अन् त्यामध्ये असणारे अंग, अवयव, तसेच इंद्रिये या सर्वांप्रती कृतज्ञ रहावे.
२. शरिराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे तत्त्व प्राचीन काळापासून !
एखाद्या दिवशी काही कामानिमित्त जर पुष्कळ धावपळ होऊन आपल्या पायांवर अतिरिक्त ताण आला असेल, तर त्यांच्याप्रती आपण क्षमाप्रार्थी असायला हवे. तसेच त्यांनी केलेल्या अथक श्रमांमुळे स्वतःचे काम झाले आहे, याची जाणीव आपल्याला हवी. त्यामुळे नंतर त्यांना आवश्यक तेवढी विश्रांती देणे, म्हणजे एक प्रकारे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणेच आहे. सध्याच्या काळात याला ‘ग्रॅटीट्यूड प्रॅक्टिस’ आणि ‘अॅफिरमेशन मेडिटेशन’ (Affirmation Meditation) असे म्हटले जाते. याविषयी पाश्चात्त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ती पुस्तके वाचतांना असे लक्षात येते की, हे तत्त्वज्ञान आपल्याला पाश्चात्त्यांकडून शिकण्याची आवश्यकता नाही; कारण ते आपल्याकडे प्राचीन काळापासून चालत आले आहे.
३. विविध देवतांच्या स्तोत्रांमध्ये अवयवांच्या रक्षणासाठी प्रार्थना !
‘श्रीरामरक्षा स्तोत्रा’मध्ये ‘शिरो मे राघवः पातु…’, अशा प्रकारे ‘डोक्यापासून सर्व अंग-अवयवांचा उल्लेख असून शेवटी पायांपर्यंत संपूर्ण शरिराचे रक्षण श्रीरामाने करावे’, अशी आर्त प्रार्थना केलेली आहे. ‘श्रीरामाच्या विविध नावांचे स्मरण आणि त्याचे स्वरूप संबंधित अवयवामध्ये वास करत असून साक्षात् प्रभु श्रीरामच त्या अवयवाचे रक्षण करत आहेत अन् करणार आहेत’, असा कृतज्ञताभाव दिसून येतो.
दुर्गासप्तशती किंवा विविध स्तोत्रे यांमध्ये वेगवेगळे न्यास (हाताच्या बोटांची विशिष्ट मुद्रा शरिराच्या संबंधित अवयवांपुढे धरणे) सांगितलेले आहेत. ते न्यास करतांनासुद्धा ‘देवतेचे अस्तित्व प्रत्येक अवयवामध्ये आहे’, असा भाव ठेवून त्या देवतेचे ध्यान करत अवयवांच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्यास सांगितली आहे.
त्यामुळे आपल्या महान भारतीय संस्कृतीमधील अशा विविध स्तोत्रांचे अर्थ जाणून घेऊन त्यांचे श्रवण किंवा पठण करणे, हे आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य रक्षणासाठी अत्यंत लाभदायक ठरते. आपले शरीर आणि अवयव यांविषयीचे ज्ञान जाणून स्वतःचे आरोग्य चांगले रहाण्याच्या दृष्टीने कृतज्ञताभावात रहाणे अत्यावश्यक आहे. हा साधा-सोपा उपाय अवश्य करून त्याचा होणारा लाभ अनुभवा !’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (१७.३.२०२३)
(संपर्क इ-मेल : drsameerparanjape@gmail.com)