स्थलांतरित भारतीय !
संपादकीय
एका देशातून अन्य देशांत नागरिकांनी जाऊन स्थायिक होणे, ही नवीन घटना नाही. वर्षानुवर्षे, शतकानुशतके आणि मागील युगांमध्येही अशा घटना घडलेल्या आहेत अन् पुढेही घडत रहाणार आहेत. याला रोखता येणार नाही. याला अनेक कारणे आहेत. पालट हा प्रत्येक प्राणीमात्राच्या जीवनाचा एक भाग आहे. यात वेगवेगळे पालट आहेत; कारण ‘परिवर्तन हा सृष्टीचा एक नियमच आहे’, असे म्हटले जाते. प्रत्येकाला जीवनात काळानुसार, आवश्यकतेनुसार आणि अन्य कारणांमुळे पालट हवा असतो. काही जणांना परिस्थितीमुळे पालट करावे लागतात, तर काहीजण आनंदासाठी पालट करतात. या पालटांपैकी एक पालट म्हणजे विस्थापन करणे अथवा स्थलांतरित होणे ! भारतातील बंजारा समाज हा नेहमीच एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी स्थलांतरित होत असतो. मागील द्वापरयुगात भगवान श्रीकृष्णाने जरासंधाच्या आक्रमणामुळे मथुरेतील नागरिकांना स्थलांतरित करून द्वारका येथे नेऊन वसवले होते. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदी कारणांमुळे काही जण एका शहरातून दुसर्या शहरात, एका राज्यातून दुसर्या राज्यात किंवा एका देशातून दुसर्या देशात स्थलांतरित होत असतात. सध्या प्रतिवर्षी देशातील दीड लाख नागरिक नोकरी, व्यवसाय आदींमुळे भारताचे नागरिकत्व सोडून विदेशात स्थायिक होत आहेत, अशी आकडेवारी आहे. यात मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय ते श्रीमंतांपर्यंतच्या लोकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी भारतातून कोट्यधीश असणार्या ७ सहस्र नागरिकांनी देश सोडून अन्य देशांचे नागरिकत्व पत्करले आहे, तर यावर्षी साडेसहा सहस्र कोट्यधीश नागरिक देश सोडण्याची शक्यता आहे, असे म्हटले जात आहे. गेल्या वर्षी संसदेत सरकारने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले होते, ‘भारत सोडून अन्य देशांचे नागरिकत्व घेणारे त्यांच्या ‘वैयक्तिक कारणांमुळे’, असा निर्णय घेत आहेत.’ काही अपवाद वगळता जर मोठ्या संख्येने लोक प्रतिवर्षी देश सोडून जात असतील, तर याचा सरकारने आणि जनतेनेही विचार करणे आवश्यक आहे. भारत आज जगातील पाचवी अर्थव्यवस्था झाली आहे आणि पुढील काही वर्षांत तिला तिसरी अर्थव्यवस्था करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जगभरात कोरोना महामारीनंतर मंदीची स्थिती असतांना भारताची आर्थिक स्थिती अधिक चांगली आहे, तरीही लोक देश सोडून जात असतील, तर याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. भारताच्या शेजारील पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढासळली असतांनाही भारतातून प्रतिवर्षी ४० हून अधिक लोक पाकचे नागरिकत्व स्वीकारत आहेत. आज जर भारताने पाकच्या नागरिकांना नागरिकत्व देण्यास अनुमती दिली, तर सहस्रोंच्या संख्येने पाकिस्तानी भारतात येतील, हेही एक चित्र आहे. भारताचे नागरिकत्व सोडू नये, यासाठी देशातील नागरिकांना उत्तम सुविधा देण्याची आवश्यकता आहे. नोकरी आणि व्यवसाय यांसाठी संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. हे गेल्या ७५ वर्षांत न झाल्याने आजची ही स्थिती निर्माण झाली आहे.
भारताला विश्वगुरु बनवा !
भारतातून विदेशात जाणार्यांचे पहिले लक्ष्य अमेरिका असते. त्यानंतर कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात आदी देशांचा क्रमांक लागतो. या देशांची लोकसंख्या भारताच्या तुलनेत अल्प असून त्यांनी भौतिक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन हे विकसित देश आहेत अन् भारत विकसनशील देश आहे. अमेरिकेतील मोठ्या आस्थापनांच्या प्रमुखपदी भारतीय वंशांचे लोक आहेत. ‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेतही भारतियांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. पूर्वीपासून भारतीय बुद्धीमत्ता विदेशात जात असल्याचे म्हटले जात आहे. ते अद्यापही भारताला थांबवता आलेले नाही.
भारतीय खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर अमेरिकेत होते आणि ते पुन्हा भारतात परतले, हे एक दुर्मिळ उदाहरण आहे. भारतात दूरसंचार क्रांती घडवून आणणारे सॅम पित्रोदाही अमेरिकेत होते आणि ते नंतर भारतात परतले. भारतातून विदेशात स्थायिक झालेल्या हिंदूंमुळे एक लाभही होत आहे आणि तो म्हणजे ते विदेशात भारतीय संस्कृती टिकवून ठेवत आहेत. यामुळे विदेशी लोकांना ती ज्ञात होत आहे. काही देशांच्या संसदेचा प्रारंभ भारतीय वेदमंत्रांनी केला जात आहे. अनेक देशांत सरकारी स्तरावरून दिवाळी साजरी करण्यासह दिवाळीची सुटीही दिली जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात गेल्यावर तेथील भारतियांची भेट घेत आहेत. याउलट सध्या कॅनडा आणि भारत यांमध्ये तेथील खलिस्तानवाद्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. या खलिस्तानवाद्यांकडून भारतविरोधी कारवाया केल्या जात आहेत. भारतीय दूतावासांवर आक्रमणेही केली जात आहेत. हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य केले जात आहे. भारतात खलिस्तानी कारवाया केल्यानंतर किंवा गुन्हेगारी कृत्य केल्यानंतर शीख तरुण कॅनडामध्ये पळून जाऊन तेथून पंजाबमध्ये गुन्हेगारी कारवाया घडवून आणत आहेत. पंजाबमधून लाखोंच्या संख्येने तरुण कॅनडामध्ये शिकण्यासाठी आणि नोकरीसाठी जातात अन् नंतर अनेक जण कॅनडामध्येच स्थायिक होऊन तेथील नागरिकत्व पत्करतात. यातील काही जण खलिस्तानी आतंकवाद्यांचे समर्थन करत आहेत. केवळ कॅनडाच नव्हे, तर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया या देशांतही खलिस्तानवादी शीख भारतविरोधी कारवाया करत आहेत. भारत सोडणार्यांचा हाही एक तोटा दिसून येत आहे.
एक सहस्र वर्षांपूर्वी जगातून लोक भारतात येत होते आणि येथे शिक्षण घेत होते. ही स्थिती जर भारताला पुन्हा आणायची असेल, तर प्रथम लोकसंख्या नियंत्रण करण्यासह आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे. हिंदूंनी साधना प्रारंभ केल्यास हे साध्य होऊ शकते, कारण आज विदेशात भौतिक सुख मिळत असले, तरी मनःशांती नाही, हे दिसून येत आहे. नैतिकतेचाही र्हास झालेला आहे. या दोन्ही गोष्टी हिंदु धर्मात आहेत. याच्या बळावर भारत जगाला दिशादर्शन करू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. भौतिक सुविधा निर्माण करण्यास भारताला अनेक वर्षे लागू शकतील; मात्र साधनेच्या माध्यमांतून भारत विश्वगुरु होऊ शकतो.
भारतातून स्थलांतरित होणार्यांना रोखण्यासाठी भारताला आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करून विश्वगुरु बनणेच आवश्यक ! |