कोकणातील गणेशोत्सवासाठी ९१७ बस पाठवल्याने मराठवाड्यातील प्रवाशांचे हाल !
छत्रपती संभाजीनगर – राज्य परिवहन महामंडळाने मराठवाड्यातून एकूण ९१७ बस कोकणासाठी सोडल्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील लांब पल्ल्याच्या आणि जिल्हाअंतर्गत बस सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी अनेकांची गैरसोय झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८ आगारांच्या २०० बस कोकणाकडे वळवल्या आहेत, तर वैजापुरात एस्.टी. आगाराकडून ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत ७ सहस्र किलोमीटर प्रवास कपातीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. हिंगोलीसह वसमत, वकळमनुरी आगारांतून १२ बस कोकणासाठी पाठवल्या आहेत. परभणी, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, रिसोड, नांदेड या मार्गावरील बस फेर्या रहित करण्यात आल्या. यामध्ये लांब पल्ल्याची छत्रपती संभाजीनगर ही बस फेरी रहित केल्याने प्रवाशांची अडचण निर्माण झाली. लातूर विभागातून १८५ बस ठाण्याला पाठवल्या असून त्यातील ५० बस परत येणार असल्याचे सांगण्यात आले. बीड जिल्ह्यातील ८ आगारांतून १९५ बस, धाराशिव आगारातून १७०, जालना आगारातून ८५, परभणी विभागातून कोकणात अष्टविनायक दर्शनासाठी ७० बस सोडल्या आहेत. कोकणात बस सोडल्या, तरी पर्यायी बसची व्यवस्था न केल्याने या सर्व शहरांतील प्रवाशांचे हाल होत आहेत.
संपादकीय भूमिकाएका भागासाठी बसगाड्यांचे नियोजन करतांना अन्य भागांचा विचार झाला नाही का ? |