पुणे येथे विसर्जन घाट बंद केल्याने नाईलाजाने भाविकांना श्री गणेशमूर्ती कृत्रिम हौदात विसर्जित कराव्या लागल्या !
घाटावर मुबलक पाणी असूनही ठिकठिकाणी प्रदूषणाचे कारण देत विसर्जनाला बंदी !
पुणे – नदीच्या प्रदूषणात वाढ होऊ नये, यासाठी नागरिकांनी नदीपात्रात मूर्ती विसर्जन करण्याऐवजी विसर्जन हौदात मूर्ती विसर्जनास प्राधान्य द्यावे, मूर्तीदान करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांची मागणी नसतांना २३ सप्टेंबरपासून घाईगडबडीत जवळपास १ कोटी ४२ लाख रुपये व्यय करून फिरत्या विसर्जन हौदांची व्यवस्था केली; मात्र महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे फिरत्या विसर्जन हौदांना नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. (यातून जनतेच्या पैशांचा अपव्यय होत नाही का ? हे पैसे संबंधित महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्याकडून सव्याज वसूल केले पाहिजेत ! – संपादक) बर्याच ठिकाणी घाट बंद करण्यात आल्याने नाईलाजाने भाविकांना श्री गणेशमूर्ती कृत्रिम हौदात विसर्जित कराव्या लागल्या. या काही प्रातिनिधिक उदाहरणांवरून संपूर्ण पुणे जिल्ह्यात किती गंभीर स्थिती असेल ? याची कल्पना येते.
शासन आणि प्रशासन यांच्या नियोजनाचा बोजवारा !
१. ‘रिव्हर व्ह्यू’ चिंचवड येथील घाटावर मुबलक पाणी असूनही घाट बंद केला आहे, प्रदूषणाचे कारण देत विसर्जनाला बंदी घातली आहे आणि दुसरीकडे मात्र बाराही मास सांडपाण्याची मार्गिका थेट नदीपात्रात सोडलेली आहे. (असे असूनही विविध प्रसिद्धीमाध्यमांवरून मात्र श्री गणेशमूर्तींमुळे होणार्या प्रदूषणाला प्रसिद्धी दिली जाते; मात्र १२ मास होणार्या नदीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाते, याचा भाविकांनी विचार करावा. – संपादक)
२. ‘रिव्हर व्ह्यू घाट’ येथे इलेक्ट्रिक खांबावरील उघडी असणारी ‘कनेक्शन’ (जोडण्या) आणि सांडपाण्याच्या टाकीची झाकणे दिसून येत आहेत, तसेच रिव्हर व्ह्यू, रावेत, वाल्हेकर वाडी येथील संपूर्ण घाट बंद करण्यात आल्याने नाईलाजाने भाविकांना श्री गणेशमूर्ती कृत्रिम हौदात विसर्जित कराव्या लागत होत्या. पालिकेने जे नियोजन केले त्यानुसार कोणतीही चोख व्यवस्था दिसून आली नाही. महापालिकेने ‘संकलन केंद्र प्रत्येक घाटावर करणार’, असे सांगितले होते; पण केवळ लहान आकाराचा ‘बूथ’ या ठिकाणी होता. त्यावर कोणताही फलक नसल्याने त्याचा उपयोग केवळ गणेश पूजा करण्यासाठी भाविक करत होते. गणेश तलाव प्राधिकरण येथे असा ‘बूथ’ केला असून त्यावर पालिकेने फलक लावला होता; परंतु हा बूथ आणि तलाव यामध्ये काही अंतर असल्याने भाविकांनी याचा उपयोग केला नाही.
३. चिंचवड परिसरात फिरते हौद कुठेही दिसले नाहीत. रावेत, वाल्हेकर वाडी येथील घाटसुद्धा बांबू लावून बंद करण्यात आले होते.
४. चिंचवड येथील काकडे पार्क घाटावर संकलित केलेल्या मूर्ती आतापर्यंत त्या ठिकाणीच पडून आहेत.
५. बिजलीनगर चिंचवड भागातही हौदातील मूर्ती आणि निर्माल्य असेच पडलेले आहे.
६. काकडे पार्क, पोतदार शाळेमागील भागात नदीच्या काठावर सर्वत्र राडारोडा कचरा पडलेला आहे.
पुणे येथे काही ठिकाणी श्री गणेशमूर्तींचे धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात आले. मोरया गोसावी मंदिर घाटावर भाविकांनी पाऊस असूनही वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. |
संपादकीय भूमिका :कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या श्री गणेशमूर्तींचे रात्रीच्या वेळी समुद्र, नदी अथवा नैसर्गिक जलस्रोतातच गुपचूप विसर्जन केले जाते, असे अनेकदा उघड झाले आहे. यात कुठल्याही प्रकारे श्री गणेशमूर्तींचे पावित्र्य राखले जात नाही. असे असेल तर कृत्रिम हौदाचा पांढरा हत्ती कशासाठी पोसायचा ? कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या श्री गणेशमूर्तींची मोठ्या प्रमाणावर विटंबना होत आहे. |