छत्रपती संभाजीनगर येथे गणेशोत्सव मंडळांचा धार्मिक देखाव्यांवर भर !
अयोध्येचे श्रीराममंदिर, केदारनाथचा आदियोगी, अष्टविनायक, चंद्रयान यांचे आकर्षण !
छत्रपती संभाजीनगर – गेल्या अनेक वर्षांपासून देखाव्यांची परंपरा जपणार्या शहरातील जुन्या गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी धार्मिक देखाव्यांवर भर दिला आहे. मंडळांनी अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर, केदारनाथचा आदियोगी, चंद्रयान, शिवराज्याभिषेकाचे देखावे सिद्ध केले आहेत. शनिवार आणि रविवार असल्यामुळे देखावे पहाण्यासाठी गर्दी होणार आहे, हे लक्षात घेऊन प्रशासनाने जय्यत सिद्धता केली आहे.
शहरातील चिकलठाणा येथील श्री संत सावता गणेशोत्सव मंडळाने ‘केदारनाथ’चा देखावा केला आहे, तर रांजणगावात श्री संत सावता नवतरुण गणेशोत्सव मंडळाने अयोध्येतील श्रीराम मंदिराचा देखावा सिद्ध केला आहे. एन्-६ येथील कुलस्वामिनी गणेशोत्सव मंडळाने ‘शिवराज्याभिषेक सोहळ्या’चा देखावा केला आहे. खडकेश्वर मंदिराजवळ श्री माहेश्वरी गणेशोत्सव मंडळाने अष्टविनायकाचा देखावा, ८ फुटांच्या रुद्राक्षावर श्री गणेशमूर्ती सिद्ध केली आहे. खडकेश्वरला बजाज कामगार गणेशोत्सव मंडळाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा देखावा साकारला आहे.
राजाबाजारात यादगार गणेश मंडळाने संजीवनी जडीबुटी पर्वतासह आणण्याचा देखावा सिद्ध केला आहे. शहागंज गांधी पुतळ्याजवळील श्री नवसार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रामायणाचा देखावा सिद्ध केला आहे. बजाजनगरातील स्वा. सावरकर गणेशोत्सव मंडळाने उद्योगातील टाकाऊपासून ग्रीन एनर्जीवर चालणारी मुंबई-रत्नागिरी वन्दे मातरम् एक्सप्रेस रेल्वेचा देखावा साकारला आहे. शिवाजीनगर येथील जिजामाता गणेशोत्सव मित्रमंडळाने यंदा ६० फूट रुंद आणि ४० फूट उंचीचा भव्यदिव्य सोनेरी राजवाडा उभारला आहे. कोकणातील पेण येथून आणलेली साडेदहा फुटांची सुंदर श्री गणेशमूर्ती या राजवाड्यात स्थापन केली आहे.
साध्या वेशातही पोलीस तैनात असतील. ‘नागरिकांना संशयित व्यक्ती, वस्तू आढळल्यास तात्काळ ११२ क्रमांकावर दूरभाष करून माहिती द्यावी’, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशिष्ट ठिकाणी वाहनतळ करण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. ठरवून दिलेल्या वाहनतळामध्येच वाहने उभी करावीत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांनी सांगितले.