Ganesh : श्री गणेशाची प्रमुख १२ नावे, त्यांचा अर्थ आणि उपासना
वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । अर्थ : कुमार्गाने जाणार्यांना सरळ मार्गावर आणणार्या, प्रचंड शरीर असलेल्या अन् कोटी सूर्यांचे तेज असलेल्या हे गणपतिदेवा, माझ्या कार्यातील विघ्ने तू सदोदित दूर कर. कार्यारंभी गणपतीची पूजा करण्याची पद्धत वेदपूर्व कालापासून भारतात चालू आहे. अशा या श्री गणेशाची १२ नावे, त्याची उपासना यांविषयीची माहिती येथे देत आहोत. |
(Ganesh, Ganpati)
१. गणपतीची प्रमुख १२ नावे आणि त्यांचा अर्थ
‘गणपतीच्या प्रमुख १२ नावांचा समावेश असलेला एक श्लोक येथे दिला आहे.
सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः ।
लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ॥
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः ।
द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ॥
विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ।
सङ्ग्रामे सङ्कटेचैव विघ्नस्तस्य न जायते ॥
अर्थ : सुमुख (सुंदर मुख असलेला), एकदंत (एक दात असलेला), कपिल (फिकट करडा रंग असलेला), गजकर्णक (हत्तीप्रमाणे कान असलेला), लंबोदर (विशाल पोट असलेला), विकट (दुष्ट प्रवृत्तींच्या नाशासाठी़ विक्राळ रूप धारण केलेला), विघ्ननाश (संकटांचा नाश करणारा), गणाधिप (गणांचा नायक), धूम्रकेतु (धुरकट रंगाचा), गणाध्यक्ष (गणांचा प्रमुख), भालचंद्र (मस्तकावर चंद्र धारण करणारा) आणि गजानन (हत्तीप्रमाणे तोंड असलेला) अशा या गणपतीच्या १२ नावांचे विवाहाच्या वेळी, विद्याभ्यासाला आरंभ करतांना, (घरात) प्रवेश करतांना अथवा (घरातून) बाहेर पडतांना, युद्धावर जातांना किंवा संकटकाळी जो पठण किंवा ही नावे श्रवण करील, त्याच्या कार्यात विघ्ने येणार नाहीत.
या श्लोकातून श्री गणपतीचे व्यक्तीरूपक स्पष्ट होते, ते येथे दिले आहे.
अ. सुमुख : यातून त्याचे मुख सुंदर असून ते इंद्रियांमध्ये मुख्य आहे.
आ. एकदंत : एकात्मता (एकपणा) दाखवणारा आणि दुजा भाव न ठेवणारा असा.
इ. कपिल : कपि अर्थात वानररूप. चंचल मनाला नियंत्रण करणारा.
ई. गजकर्ण : गुपित गोष्टीही समजून घेणारा.
उ. लंबोदर : आपल्या उदरात सर्वांना सामावून घेणारा.
ऊ. विकट : शक्ती, बुद्धी आणि गुण यांनी प्रचंड असणारा, तसेच त्याच्यापुढे सर्वच जण नतमस्तक होतात असा.
ए. विघ्नविनाशक : भक्तांच्या संकटांचा नाश करणारा.
ऐ. गणाधिप : योग्य नायक. नेतृत्व करणारा.
ओ. धुम्रकेतू : सर्व धूसर भ्रम, कल्पना आणि संशय नष्ट करणारा.
औ. गणाध्यक्ष : सर्व इंद्रियांचा आणि देवांचा प्रमुख असणारा.
क. भालचंद्र : मस्तकावर चंद्र धारण करणारा, म्हणजेच ज्याचे मस्तक शांत आणि थंड आहे असा.
ख. गजानन : ज्याचे मस्तक हत्तीचे आहे, म्हणजेच हत्तीसारखा शांत, सूक्ष्म आणि दूरदृष्टी असणारा.
२. गणेश उपासना कशी करावी ?
गणेश उपासना विविध प्रकाराने केली जाते. साधकांची उपासना जसजशी वाढत जाईल, तसतशी त्याला प्रचिती येऊ लागते आणि पुढच्या पुढच्या अनुभूती येतात.
संकटनाशासाठी कुणी श्री गणेशोपासनेची कास धरतो, कुणी मनोकामना पूर्तीसाठी, तर काही मनःशांतीसाठी किंवा विशिष्ट हेतू किंवा इप्सित साध्य करण्यासाठी गणेशाची साधना करतात; मात्र साधकामध्ये चिकाटी, संयम, श्रद्धा आणि निष्ठा या गुणांची आवश्यकता असते.
२ अ. श्री गणेशासंबंधी काही उपासना :
अ. सलग २१ दिवस गणपति मंदिरात जाऊन मनोभावे श्री गणरायाचे श्रद्धा आणि भक्तीपूर्वक दर्शन घेणे.
आ. नियमित गणपति मंदिरात जाऊन श्री गणपतीला २१ प्रदक्षिणा घालणे.
इ. नियमित ‘श्री गणेश अथर्वशीर्षाची’ २१ आवर्तने करणे. आवर्तने करतांनाच श्री गणेशमूर्तीवर सोवळ्याने अभिषेक करणे.
ई. श्री गणेशाला दूर्वा अर्पण केल्याविना अन्न ग्रहण न करणे.
उ. नियमित नारदकृत ‘संकष्टनाशन स्तोत्राचा’ पाठ करणे
ऊ. ‘गणेश गीता’ याचा नियमित एक पाठ करणे
ए. नियमित पार्थिव गणेशाची पूजा करणे
ऐ. २१, ४८ आणि १२१ दिवस गजाननाचा विशिष्ट जप करणे. श्री गणेशाचा जप केल्याने ग्रहपीडा किंवा ग्रहदोष दूर होतो.
ओ. ‘ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा ।’, हा संकटनिवारण मंत्र म्हणावा.
औ. मांदार वृक्षाची २१ वर्षे पूजा केल्यास मांदार वृक्षात आपोेआपच श्री गणेशाची मूर्ती प्रकटते.
क. संकट निवारणार्थ ४२ मंगळवारांचे व्रत करावे. दिवसभर उपवास करावा. श्री गणेशाला तांबूस फळ, गूळ, तांबडे फूल, तांब्याचे पैसे, मसुराची डाळ, तांबडी सुपारी आणि नारळ इत्यादी वस्तू वहाव्यात. गोडाचा शिरा खाऊन उपवास सोडावा. इतर काहीही खाऊ नये. ४२ मंगळवार पूर्ण झाल्यावर ‘सत्यविनायक’ करावा.’
(साभार : मासिक ‘हरि-विजय’, दीपोत्सव २००८)
तमिळनाडूमधील ‘नाडी गणपति’ मूर्तीची नाडी प्राणप्रतिष्ठापनेच्या नंतर चालू असल्याचे ब्रिटीश डॉक्टर आणि नास्तिकतावादी यांना आढळणेतमिळनाडूमधील श्री सिद्धेश्वरी पीठम्मध्ये ‘नाडी गणपति’ नावाचे मंदिर आहे. ते ‘नाडी गणपति’ म्हणून ओळखले जाण्यामागील कारणही तसेच आहे. पू. मौनस्वामी यांना सिद्धिविनायकाची मोठी मूर्ती स्थापित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी त्यांना आवश्यक विधी आणि अभिषेक करावा लागणार होता. पू. मौनस्वामी यांनी प्राणप्रतिष्ठापनेचे मंत्र चालू केले, तेव्हा काही नास्तिकतावाद्यांनी ‘दगडाच्या मूर्तीत जीव कसा आणता येईल ?’, असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली. त्यानंतर पू. मौनस्वामी यांनी त्यांना मूर्तीची नाडी पडताळण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यास सांगितले. सर आर्कबाल्ड एडवर्ड हे त्या वेळच्या प्रांताचे ब्रिटीश गव्हर्नर ‘अतीमहनीय अतिथी’ म्हणून कार्यक्रमाला आले होते आणि तेही हे सर्व ऐकत अन् पहात होते. त्या नास्तिकतावाद्यांनी पुतळ्याची नाडी पडताळण्यासाठी ब्रिटीश डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी मूर्तीची नाडी पडताळली असता ती आढळली नाही. तेव्हा पू. मौनस्वामी म्हणाले, ‘‘आता मी प्राणप्रतिष्ठा करीन आणि मग तुम्ही पुन्हा पडताळू शकता.’’ प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर आरतीच्या वेळी मूर्तीच्या हालचालीही दिसत असल्याचे भाविकांच्या लक्षात आले. याखेरीज मूर्तीच्या नाडीसह हृदयाचे ठोकेही मनुष्याप्रमाणेच स्पष्टपणे जाणवले. ब्रिटीश डॉक्टर आणि अगदी नास्तिकतावादी यांनीही कसून पडताळणी केली अन् त्यांच्या ‘स्टेथस्कोप’द्वारे (नाडी पडताळण्याचा उपकरणाद्वारे) नाडीचे ठोके स्पष्टपणे जाणवले. हे ऐकून उपस्थित असलेल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिरुनेलवेली जिल्ह्यातील भूवैज्ञानिकांनी मूर्तीचे परीक्षण केले आणि या घटनेची पुष्टी केली. ही नाडी काही घंटे चालू राहिली आणि नंतर पू. मौनस्वामींनी सांगितले, ‘‘नाडी आता थांबेल आणि ती थांबली.’’ मूर्तीचे परीक्षण करणारे डॉक्टर किंवा नास्तिकतावादी कुणीही याचे स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत, ते ‘विज्ञानाच्या पलीकडचे आहे’, हे त्यांनी मान्य केले. (यावरून हिंदु धर्मातील मंत्रांचे सामर्थ्य किती अफाट आहे, हे लक्षात येते ! – संपादक) (साभार : ‘श्री सिद्धेश्वरी पीठम्’चे संकेतस्थळ) |