कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांचे गर्वहरण आवश्‍यक !

कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो जी भारतविरोधी पावले उचलत आहेत, त्‍यातून त्‍यांची राजकीय अपरिपक्‍वता दिसून येत आहे. यामुळे भारताची नव्‍हे, तर कॅनडाची अधिक हानी होईल. त्‍यामुळे ट्रुडो यांनी गर्वाप्रमाणे न वागलेले बरे. अन्‍यथा त्‍यांचे गर्वहरण करण्‍यास भारताला वेळ लागणार नाही.

संकलक : श्री. सचिन कौलकर, प्रतिनिधी, ‘सनातन प्रभात’, मिरज. (२०.९.२०२३)

खलिस्‍तानी समर्थक कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो

१. पूर्वीपासून कॅनडा खलिस्‍तानी समर्थक !

ट्रुडो यांची भेट यापूर्वीही वादात सापडली होती. वर्ष २०१८ मध्‍ये मोदी पंतप्रधान असतांना जस्‍टिन ट्रूडो प्रथम भारत दौर्‍यावर आले होते, तेव्‍हाही बराच वाद झाला होता. वर्ष २०१८ मध्‍ये जस्‍टिन ट्रूडो यांच्‍या मंत्रीमंडळात ३ शीख मंत्री होते. या मंत्र्यांमध्‍ये संरक्षणमंत्री हरजीत सज्‍जन यांचाही समावेश होता. सज्‍जन अजूनही ट्रुडो यांच्‍या मंत्रीमंडळात असून त्‍यांनी ट्रुडो यांनी निज्‍जर याच्‍या हत्‍येमागे भारतीय यंत्रणेचा हात असल्‍याच्‍या विधानाचे समर्थन केले आहे. हरजीत सज्‍जन यांचे वडील जागतिक शीख संघटनेचे सदस्‍य होते. वर्ष २०१७ मध्‍ये पंजाबचे तत्‍कालीन मुख्‍यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सज्‍जन यांना ‘खलिस्‍तान समर्थक’ म्‍हटले होते. कॅनडा येथील ‘खलिस्‍तान समर्थकांनी’ स्‍वतंत्र पंजाबसाठी सार्वमत घेण्‍याची भूमिका कायमच घेतली आहे. वर्ष २०१८ मध्‍ये भारत दौर्‍यावर आलेले जस्‍टिन ट्रुडो यांच्‍या कार्यक्रमाला खलिस्‍तानी आतंकवादी जसपाल अटवाल याला निमंत्रण दिल्‍यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्‍यानंतर कॅनडाचे खासदार रणदीप एस्. सराय यांनी जसपाल अटवाल याला निमंत्रित केल्‍याचे मान्‍य करून क्षमा मागितली होती.

श्री. सचिन कौलकर

२. कॅनडात घुसून खलिस्‍तान्‍यांचा बीमोड आवश्‍यक !

वर्ष २०१९ च्‍या निवडणुकीत जस्‍टिन ट्रूडो बहुमतापासून दूर गेले. जस्‍टिन ट्रुडो यांना पुन्‍हा पंतप्रधान होण्‍यासाठी पाठिंब्‍याची आवश्‍यकता होती आणि तो जगमीत सिंग यांच्‍याकडून मिळण्‍याची अपेक्षा होती. जगमीत सिंग यांच्‍या नेतृत्‍वाखालील न्‍यू डेमोक्रॅटिक पक्षाला २४ जागा मिळाल्‍या होत्‍या आणि त्‍यांच्‍या पक्षाची मतांची टक्‍केवारी १५.९ टक्‍के इतकी होती. ‘वॉशिंग्‍टन पोस्‍ट’च्‍या वृत्तानुसार जगमीत सिंग पक्षाचे नेते बनण्‍यापूर्वी खलिस्‍तानी आंदोलनात सहभागी होत असत. मुळात ‘कॅनडा सरकारने भारतात आतंकवादी कारवाया करणारा खलिस्‍तानी आतंकवादी हरदीप सिंग निज्‍जर याच्‍यासारख्‍या आतंकवाद्यांवर का कारवाई करत नाही ?’, हा प्रश्‍न आहे. जर कॅनडा सरकार आतंकवाद्यांचा बीमोड करणार नसेल, तर भारताला कॅनडा देशात घुसून आतंकवाद्यांचा बीमोड करावा लागेल, हे जस्‍टिन ट्रूडो यांनी लक्षात ठेवावे. ‘भारतात आतंकवादी कारवाया करणार्‍या आतंकवाद्यांना कॅनडा सरकार आश्रय देत असेल, तर अशा आतंकवाद्यांना कॅनडा देशात जाऊन ठार मारणे चुकीचे आहे’, असे भारतियांना वाटत नाही. आतापर्यंत कोणताही देश (चीन आणि पाकिस्‍तान सोडून) आतंकवादी कारवायांचे समर्थन कधीच करत नाही. अमेरिकेने पाकिस्‍तानात जाऊन आतंकवादी ओसामा बिन लादेन याला ठार करून, हे सिद्ध केले आहे. त्‍यामुळे हरदीप सिंह निज्‍जर याची भारताच्‍या विरोधातील धोकादायक कारस्‍थाने ओळखून ट्रुडो यांनी त्‍याच्‍यावर कारवाई केली असती, तर आज दोन्‍ही देशातील संबंध बिघडण्‍याइतपत वेळ आली नसती.

३. पाकिस्‍तानसारखी कॅनडाची दुर्देशा होऊ नये !

आतापर्यंत पाकिस्‍तानने अनेक आतंकवादी संघटनांना आश्रय आणि सुविधा देऊन त्‍यांचे लाड केले. त्‍यातून तालिबानची निर्मिती झाली. पाकिस्‍तानने तालिबानला भरपूर साहाय्‍य केले. आता हाच तालिबान पाकिस्‍तानच्‍या जिवावर उठला आहे. पाकिस्‍तानात भरमसाठ महागाई, दंगली आणि बाँबस्‍फोट प्रतिदिन सर्रास होत आहेत. यामध्‍ये तेथील आतंकवादी संघटना आणि तालिबान यांचा हात आहे. याचाच अर्थ आतंकवाद्यांना पोसल्‍याचे कटू फळ पाकिस्‍तानला मिळत आहे. यातून कॅनडाने बोध घेऊन तेथील फुटीरतावादी कारवाया रोखण्‍यासाठी पावले उचलली पाहिजेत. ‘खलिस्‍तानी आतंकवाद्यांना पोसायचे ? कि त्‍यांच्‍यावर कारवाई करायची ?’, हे त्‍याला ठरवावे लागेल. अन्‍यथा कॅनडाची पाकिस्‍तानसारखी अवस्‍था होण्‍यास वेळ लागणार नाही. कॅनडाने खलिस्‍तानी आतंकवाद्यांना पोसले, तर हेच खलिस्‍तानी उद्या कॅनडा देश कह्यात घेण्‍यास मागे पुढे पहाणार नाहीत, तसेच भारतालाही ‘खलिस्‍तानीप्रेमी’ कॅनडाला धडा शिकवण्‍याविना अन्‍य पर्याय रहाणार नाही. त्‍यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, यातून कॅनडाने बोध घेऊन खलिस्‍तानी आतंकवाद्यांना कॅनडा येथे थारा देऊ नये.

– श्री. सचिन कौलकर, प्रतिनिधी, ‘सनातन प्रभात’, मिरज.

संपादकीय भूमिका

कॅनडा सरकार खलिस्‍तान्‍यांवर कारवाई करणार नसेल, तर भारताने कॅनडामध्‍ये घुसून त्‍यांचा बीमोड करावा, ही अपेक्षा !