शहाड (जिल्हा ठाणे) परिसरात असलेल्या सेंच्युरी रेयॉन आस्थापनात स्फोट
ठाणे, २३ सप्टेंबर (वार्ता.) – उल्हासनगर येथील शहाड परिसरात असलेल्या सेंच्युरी रेयॉन या आस्थापनात नायट्रोजन टँकरचा स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू झाला, तर २ जण हरवले आहेत. तसेच ६ कामगार घायाळ झाले आहेत. घायाळ कामगारांना सेंच्युरी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. २३ सप्टेंबरला सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अग्नीशमनदल आणि पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन साहाय्य केले. हा स्फोट एवढा भीषण होता की, तानाजीनगर, शहाड गावठाण, गुलशननगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरीनगर परिसरातील घरांना स्फोटाचे हादरे बसले. मृत झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य आणि एकाला नोकरी देण्याचा निर्णय आस्थापनाच्या व्यवस्थापनाने घेतल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिली.