ब्रह्मोत्सवाच्या वेळी ध्वजपथकातील साधकांच्या चलनृत्याच्या पथसंचलनाचा सराव घेणार्‍या कु. अपाला औंधकर आणि कु. शर्वरी कानस्कर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी मला ध्वजपथकात सहभागी होण्याची संधी मिळाली. तेव्हा ‘पथकात नुसते चालण्यापेक्षा काही सात्त्विक गाण्यांच्या संगीतावर (धुनीवर) चलनृत्याचे पथसंचलन केले, तर चांगले दिसेल’, असे ठरले. ‘हे पथसंचलन आम्हाला महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) आणि कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) शिकवणार’, असे ठरले. त्यांनी एकूण ८ गाण्यांसाठी आमच्याकडून चलनृत्याचे पथसंचलन करून घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्या आमचा प्रतिदिन १ ते दीड घंटा सराव घेऊ लागल्या.

कु. अपाला औंधकर

१. आमच्या गटातील जवळपास आम्हा सर्वच साधकांना नृत्याचा गंध नव्हता आणि त्या दोघी मात्र नृत्यप्रवीण आहेत. त्या आमच्यापेक्षा वयाने पुष्कळ लहानही आहेत. असे असूनही त्या आम्हाला समजून घ्यायच्या. आमच्या स्थितीला येऊन त्या आम्हाला सोप्या पद्धतीने पथसंचलन शिकवायच्या.

२. बर्‍याच वेळा पथसंचलनातील बारकावे लक्षात ठेवण्यात आमचा गोंधळ होत होता. आमची ही अडचण लक्षात घेऊन त्या लगेच ‘आम्हाला ‘पथसंचलन’ करणे सोपे कसे होईल ?’, हे विचारून त्यानुसार त्यात  सहजतेने पालट करत होत्या.

कु. शर्वरी कानस्कर

३. ‘आम्ही दमलो असू’, असा विचार करून त्या आम्हाला बसायला सांगायच्या आणि स्वतः मात्र पुढील पथसंचलन करून दाखवायच्या. ‘त्या स्वतः बसल्या आहेत’, असे होत नसे. आम्ही कितीही वेळा त्यांना पथसंचलन करायला सांगितले, तरी त्या कधीच त्याविषयी गार्‍हाणे करत नसत.

४. सरावाच्या वेळी त्या प्रथम आम्हाला गाण्याचे बोल ऐकवायच्या. नंतर त्यावर त्यांनी बसवलेल्या चलनृत्यातील पथसंचलन करून दाखवायच्या आणि त्यानंतर आम्ही त्यांच्या पाठोपाठ तसे करायचो. आम्हाला त्यांच्याप्रमाणे पथसंचलन करणे जमेपर्यंत त्या आमच्या समवेतच पथसंचलन करायच्या.

५. खरेतर त्या दोघींना आमच्या गटाप्रमाणेच अन्य गटांचा सराव घेणे, त्यांच्या स्वतःच्या नृत्याचा सराव करणे इत्यादी सर्व करावे लागत होते; पण त्यांनी आम्हाला ‘आम्ही दमलो आहोत. तुम्ही करा. आम्ही परत दाखवणार नाही’, असे कधीच म्हटले नाही; उलट त्या तितक्याच उत्साहाने आम्हाला शिकवायच्या आणि पुनःपुन्हा पथसंचलन करून दाखवायच्या.

६. आम्ही कधी पथसंचलनातील बारकावे विसरलो, तर त्यांनी कधी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

७. त्या नेहमी हसतमुख आणि आनंदी असायच्या.

८. आम्ही कधी ‘आम्हाला जमत नाही’, असे म्हणालो, तर त्या आम्हाला भावाच्या स्तरावर नेत आणि ठामपणे म्हणत, ‘‘गुरुदेवांनी आपल्याला ही सेवा दिली आहे, तर तेच आपल्याकडून ती करूनही घेणार आहेत.’’

कृतज्ञता आणि प्रार्थना

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला त्यांच्या या दोन गोड अनमोल साधकरत्नांचा सहवास देऊन त्यांच्याकडून शिकण्याची संधी दिली’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते आणि ‘माझ्यातही त्यांच्यासारखा भाव निर्माण होऊ दे’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.’

– कु. मैथिली जोशी, ढवळी, फोंडा, गोवा. (१८.५.२०२३)

साधकांकडून पथसंचलनाचा सराव करून घेण्याची सेवा भावपूर्ण करून इतरांचीही भावजागृती करणारी कु. शर्वरी कानस्कर !

१. ‘एकदा आम्हाला पथसंचलनातील बारकावे जमत नव्हते. थोड्या वेळाने शर्वरी सराव घ्यायला आली. तिला आमची अडचण सांगितल्यावर तिने सहजतेने ‘मी करून दाखवते’, असे म्हणून गाणे लावले आणि पथसंचलन दाखवू लागली. त्या वेळी तिने संचलन करायला आरंभ केल्यावर तिच्या चेहर्‍यावरचे भाव पालटले. तेव्हा ‘ती परात्पर गुरु डॉक्टरांच्या समोरच संचलन सादर करत आहे’, असे मला जाणवले.

२. तेव्हा केवळ तिला पाहूनच ‘भाव कसा असावा ?’, हे माझ्या लक्षात आले आणि माझी भावजागृती झाली. ती आम्हाला शिकवत होती, त्या प्रत्येक वेळी तिच्या चेहर्‍यावरील भाव आणि तिची भावपूर्ण कृती पाहूनच आमची भावजागृती होत होती.

३. तिच्यातील भावामुळे ही सेवा करतांना मला भावजागृतीचे वेगळे प्रयत्न करावे लागले नाहीत. केवळ तिला पाहूनच मला परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण व्हायचे आणि माझा ‘आपण केवळ त्यांच्यासाठी हे करायचे आहे’, असा भाव आपोआप निर्माण व्हायचा.

४. आताही तिचे लक्षात आलेले वरील वैशिष्ट्य टंकलिखित करतांना तिच्या चेहर्‍यावरील भाव आठवून माझी भावजागृती झाली.’

– कु. मैथिली जोशी  (१८.५.२०२३)