सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवातील ध्वजपथकात पथसंचलनाची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी मला ध्वजपथकात सहभागी होण्याची संधी मिळाली. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर या आम्हा सर्व साधकांचा गट करून ‘ध्वजपथकामध्ये आपल्याला कशा प्रकारे पथसंचलन करायचे आहे ?’, हे शिकवत होत्या. तिच्या समवेत कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) आणि कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) या दोघीही आमचा सराव घेऊ लागल्या. ही सेवा मिळाल्यापासून देवाने मला अनेक गोष्टी शिकवल्या. त्या कृतज्ञताभावाने त्याच्या सुकोमल चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करते.
१. कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) आणि कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
अ. कु. अपाला औंधकर आणि कु. शर्वरी कानस्कर वयाने लहान असूनही आम्हा सर्व साधकांना शिकवतांना मला त्यांच्यात जरासुद्धा अहं जाणवला नाही.
आ. अत्यंत नम्रपणे, प्रेमाने आणि वात्सल्यभाव ठेवून त्या आम्हाला शिकवत होत्या.
इ. आमच्या चेहर्यावरील ताण पाहून कु. अपाला आम्हाला सतत भावाच्या स्तरावर रहाण्याची आठवण करून देत होती. त्यामुळेही आम्हा सर्वांना भावाच्या स्तरावरील प्रयत्न वाढवायला साहाय्य झाले.
ई. दोघीही ‘आम्हा सर्व साधकांची स्थिती समजून घेऊन ‘आम्हाला कशा प्रकारे पथसंचलन करणे सोपे जाईल ? आणि ते लक्षात ठेवायला कठीण जाणार नाही’, असा संपूर्ण विचार करून आमचे मत घेऊन प्रकार बसवत होत्या.
उ. प्रत्यक्षात त्या दोघींनाही नृत्याविषयी बरेच ज्ञान आहे. त्या आमच्यासारख्या याविषयी काहीच ज्ञान नसलेल्या साधकांचे मत घेऊन त्यानुसार आचरण करत होत्या. यातून त्यांचा अहं अल्प असल्याचे मला जाणवले.
२. सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
अ. तीव्र तळमळ असल्यामुळे सौ. सावित्रीताई सेवा परिपूर्ण होण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करत होती.
आ. कधी कधी आम्ही तिला काही पालट सुचवायचो. तेव्हा ती तो पालट अगदी सहजतेने स्वीकारत होती आणि त्यानुसार पालटही करत होती.
इ. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी आम्हा सर्वांचे पथसंचलन एकसारखे होत नव्हते; परंतु तरीही हताश न होता ताई शेवटपर्यंत आम्हा सर्वांचा सराव चिकाटीने घेत होती.
ई. ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळी देवाच्या चरणी ही सेवा अर्पण झाल्यानंतर अनेक संतांनी पथसंचलनाचे कौतुक केले. संतांचे हे कौतुकाचे बोल सौ. सावित्रीताई आणि दायित्व असलेली साधिका सौ. मनीषा पानसरे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे) यांनी आम्हाला ‘व्हॉट्सअॅप’द्वारे लिहून पाठवले, जेणेकरून आम्हा सर्व साधकांना प्रेरणा मिळावी.
३. संतांनी, तसेच प्रसारातील साधकांनी केलेले हे कौतुक पाहून ‘देव भावाचा भुकेला असतो’ आणि ‘देवाला भावाच्या स्तरावरच प्रयत्न करणे अपेक्षित आहे’, याची देवाने पुन्हा एकदा जाणीव करून दिली.
४. शेवटच्या क्षणी निर्माण झालेली स्थिती पाहून ‘देवाला शरणागतभाव अपेक्षित असून बुद्धीपेक्षा भावाच्या स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे’, असे लक्षात येणे
कार्यक्रमाच्या आदल्या दिवसापर्यंत ‘आम्हा सर्वांचे पथसंचलन एकसारखे व्हावे’, यासाठी आम्ही सराव करत होतो; परंतु काही कारणांमुळे थोड्या थोड्या वेळाने त्यामध्ये काही पालट होत होते. त्यामुळे ठरलेले पालट पुन्हा सर्वांनी एकसारखे करण्यामध्ये वेळ जात होता आणि अधिक सराव करावा लागत होता. यामध्ये सर्वांची शारीरिक स्थिती खालावली होती. ‘आता उद्यावर कार्यक्रम आला आहे आणि आज आपले पथसंचलन एकसारखे होत नाही, तर कसे होणार ?’, याची काळजी वाटत होती; परंतु सर्वांच्याच मनात एक श्रद्धा होती, ‘गुरुदेवांचा कार्यक्रम आहे आणि तेच आपल्याकडून करून घेणार आहेत. आपण केवळ माध्यम आहोत. कठपुतलीप्रमाणे आपण यात सहभागी व्हायचे आहे.’ देवाला संपूर्ण शरण जाऊन आम्ही पुन्हा एकदा सराव चालू केला. तेव्हा आमच्या गटाचे दायित्व असणार्या साधिका सौ. मनीषा पानसरे यांनी ‘आता सर्व देवावर सोपवूया’, असे आम्हाला सांगितले.
सराव चालू असतांनाही आमचा केवळ बौद्धिक स्तरावरच विचार होत होता, ‘कोणत्या प्रकारे पथसंचलन केले, तर आपले नीट होईल ?’; पण शेवटच्या क्षणापर्यंत निर्माण झालेली स्थिती पाहून देवाला आम्हाला ‘त्याला शरणागतभाव अपेक्षित आहे. बुद्धीपेक्षा भावाच्या स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे’, हे शिकवायचे होते’, असे आमच्या लक्षात आले.
५. कार्यक्रमाच्या वेळी आलेल्या अनुभूती
५ अ. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी पथसंचलन एकसारखे न होणे आणि दुसर्या दिवशी ब्रह्मोत्सवाच्या वेळी गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर सर्व साधकांचे पथसंचलन एकसारखे होणे : ७ दिवसांमध्ये पथसंचलनातील अनेक बारकावे शिकूनही ‘केवळ दोनच प्रकार करायचे’, असे ठरल्यानंतर ते दोन प्रकारही आमच्याकडून एकसारखे होत नव्हते. शेवटी सर्वांनी ‘आता आपण देवावरच सोपवूया’, असा विचार करून सराव थांबवला.
दुसर्या दिवशी ब्रह्मोत्सव होता. सकाळपासून सर्वांची ‘गुरुदेव, तुम्हाला अपेक्षित अशी ही सेवा तुम्हीच आमच्याकडून करून घ्या’, अशी आर्तभावाने प्रार्थना चालू होती. प्रत्यक्ष ब्रह्मोत्सवाच्या वेळी जणूकाही चमत्कार व्हावा, त्याप्रमाणे आम्हा सर्व साधकांचे पथसंचलन एकसारखे होत होते. सर्व साधक भावाच्या स्थितीत होते.
५ आ. कृतज्ञताभावात असल्याने देहभान विसरणे : ‘गुरूंच्या या अपार कृपेमुळे आपल्याला पथसंचलनात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे’, या कृतज्ञताभावात ‘आम्ही काय करत होतो ?’, याचे आमचे जणू भानच हरपले होते. २ मिनिटे अशी स्थिती झाली की, ‘भावाच्या त्या स्थितीत कोणता प्रकार करायचा ?’, हेच मला कळत नव्हते. सर्वकाही स्तब्ध झाल्यासारखे झाले होते.
५ इ. ब्रह्मोत्सवासाठी आलेल्या साधकांचा अपार भाव पाहून ‘गुरुदेव आम्हा सर्वांचा उत्साह आणि कृतज्ञताभाव वाढवत आहेत अन् आम्ही उच्च लोकातील वातावरण अनुभवत आहोत’, असे मला जाणवत होते.
५ ई. कार्यक्रमाच्या आधी २ दिवस खोकला चालू होणे आणि कार्यक्रमाच्या वेळी देवाच्या कृपेने खोकल्याचा त्रास न होणे : कार्यक्रमाच्या आधी २ दिवस अकस्मात् मला खोकला चालू झाला आणि तो एकदा चालू झाला की, बराच वेळ चालू रहात होता. त्यामुळे १ – २ वेळा माझ्या मनात विचार आला, ‘प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी जर मला खोकला आला, तर कसे होणार ?’; परंतु देवाच्या कृपेमुळेच कार्यक्रम चालू होण्याआधी ५ मिनिटे मला खोकल्याचा त्रास झाला. त्यानंतर कार्यक्रम संपल्यावर ५ मिनिटांनी मला तो त्रास झाला. ‘संपूर्ण कार्यक्रमामध्ये अर्धा घंटा देवाने हा त्रास होऊ दिला नाही’, ही एक अनुभूतीच होती.
६. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘हे गुरुदेवा, या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली आणि ‘याची देही याची डोळा’ मला त्याचे दर्शन घडवले’, याबद्दल आपल्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘हे गुरुदेवा, प्रत्येक सेवेतून आमचा भाव वृद्धींगत होऊ दे आणि ‘केवळ जन्मोत्सवच नव्हे, तर प्रत्येकच सेवा ही गुरूंच्या कृपेमुळे स्वतःच्या उद्धारासाठी मिळालेली सेवा आहे’, या भावाने आमच्याकडून ती परिपूर्ण अन् भावपूर्ण करून घे’, अशी आपल्या सुकोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– कु. श्रद्धा लोंढे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |