स्वबोध, मित्रबोध नि शत्रूबोध
‘पोप आणि ख्रिस्ती म्हणतात, ‘जगात येशूचे राज्य आले पाहिजे. जगावर बायबलची, म्हणजे ख्रिस्त्यांची सत्ता यायला हवी.’ १६ व्या शतकापासून विश्वात, तसेच भारतात प्रारंभ झालेले ख्रिस्ती मिशनर्यांचे धर्मांतर अभियान आणि त्यांना राजाश्रय देऊन दोन तृतीयांश जगाला गुलामीच्या खाईत लोटणार्या युरोपियन देशांचा साम्राज्यवादी इतिहास याची साक्ष देतो.
आजही एकीकडे विश्वाला ख्रिस्तमय बनवण्याचे मोठे अभियान जगभर चालू आहे आणि दुसरीकडे ‘गझवा-ए-हिंद’ (भारताचे इस्लामीस्तान), ‘खुरासान’ (उत्तर पूर्वी इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उजबेकिस्तान या देशांचा भूप्रदेश), दार उल इस्लाम (जेथे इस्लामचे शासन चालते, असा प्रदेश) आदी विविध योजनांतर्गत भारताला, तसेच विश्वाला इस्लाममय करण्यासाठी जिहादी मानसिकतेचे अरब देश पैशाच्या बळावर प्रयत्न करत आहेत. त्या समवेत आतंकवाद्यांचे माहेरघर झालेल्या पाकिस्तानसह अल्-कायदा, इसिस आदी आतंकवादी संघटना जिहादी कारवायांद्वारे संपूर्ण जगात मुसलमानेतर जनतेच्या मनात भयाचे वातावरण निर्माण करत आहेत.
याच धरतीवर भारतातील त्यांचे काही अनुयायी ‘भारतात शरियत लागू करा किंवा शरियत बँकिंग सेवा चालू करा, तसेच लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद यांद्वारे कार्यरत आहेत’, हे दिसून येते. आश्चर्य म्हणजे जे इस्लामला जिहाद किंवा आतंकवादी कारवायांशी जोडू इच्छित नाहीत, ते तटस्थ मुसलमान यांच्या विरोधात ‘ब्र’ही काढत नाहीत, ही शोकांतिका आहे; परंतु ‘गुन्ह्याचा मूकसंमतीदार शेवटी गुन्हेगारच ठरतो’, हे न्यायव्यवस्था सांगते.
या जागतिक परिस्थितीमध्ये सध्या हिंदू विचारक, अभ्यासक आज स्वबोध आणि शत्रूबोध या संज्ञाच्या प्रचलनांद्वारे हिंदु समाजामध्ये जनजागृतीचे अभियान चालवत आहेत; परंतु या संज्ञा अन् अभियानाची व्याप्ती वाढवली पाहिजे. स्वबोध, मित्रबोध, शत्रूबोध आणि उभयबोध या संज्ञांसह विकृत स्वबोध अन् विकृत शत्रूबोध या संज्ञाही योग्य अर्थासह वापरल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी हा लेखप्रपंच आहे.
१. स्वबोध (स्वतःची शाश्वत ओळख करून देणे)
सनातन हिंदु धर्मीय व्यक्तीला जीवनात धर्मानुकूल योग्य स्वबोध जाणून घेणे आवश्यक असते. स्वबोध व्यक्तीला तिची शाश्वत ओळख करून देत असतांना स्वधर्म (स्वकर्तव्यही) सांगते. ‘स्वधर्म जाणून धर्मरक्षण आणि राष्ट्र्ररक्षण करणे’, हीच खरी व्यक्तीच्या अंतरातील धर्मसंस्थापना आहे’, हे ध्यानात घेतले पाहिजे. जेव्हा असे करणार्या व्यक्ती समाजात निर्माण होतात, तेव्हा ती समष्टी धर्मसंस्थापना होते. यांसाठी धर्मसंस्थापनेचे अवतारी कार्य करणार्यांचे मार्गदर्शन सतत घेणे क्रमप्राप्त ठरते.
१ अ. व्यष्टी स्वबोध (व्यक्तीगत स्तरावरील धर्म जाणणे) : जसे ‘मी कोण ? माझे शाश्वत स्वरूप काय ? माझ्या मनुष्यजन्माचे ध्येय काय ? माझ्या मनुष्यजन्माचे सार्थक होण्यासाठी माझा धर्म मला काय दृष्टी देतो, म्हणजेच ‘जीवन जगण्यासाठी माझा धर्म मला काय दिशादर्शन देतो ?’, इत्यादी जाणणे हे हिंदु व्यक्तीचे व्यष्टी, म्हणजे व्यक्तीगत स्तरावरील धर्म जाणणे होय. याद्वारे ‘अनादि, अनंत आणि विराट परमात्म्याचा मी एक परिपूर्ण अंश आहे’, याचा बोध होतो. येथे जाणणे (किंवा जाणण्याचा प्रयत्न करणे), म्हणजे यांविषयी जी काही तात्त्विक माहिती मिळाली, तिची अनुभूती घेणे (किंवा अनुभूती घेण्याचा प्रयत्न करणे), असे लक्षात घ्यायला हवे.
१ आ. समष्टी स्वबोध (स्वधर्म जाणून धर्मरक्षण अन् राष्ट्र्ररक्षण यात योगदान देणे) : महाभारतात भगवंताने आपल्या विराट रूपात अर्जुनाला संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन घडवून ‘सर्व सृष्टी त्याचाच अंश आहे’, हे दाखवले, तसेच ‘मी व्यक्ती म्हणून या हिंदु धर्माचा, सनातन धर्माचा, अर्थात् परमात्म्याचा सर्वांत छोटा अंश असून स्वधर्म आणि स्वराष्ट्र्र यांच्या रक्षणासाठी सज्जन, धर्मपरायण, तसेच राष्ट्र्र्रभक्त व्यक्तींचे संघटन करून रक्षण करण्याची प्रेरणा होणे’, हा समष्टी स्वबोध होय. हे साध्य करण्यासाठी व्यक्तीने आपल्या चित्तावरील स्वभावदोषरूपी अंतर्गत राक्षसांचा आणि अहंकाररूपी अंतर्गत रावणाचा नाश करणे अपेक्षित असते. एका अर्थाने समष्टी स्वबोध होण्यासाठी व्यक्तीने स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करणे, हे प्राधान्य असते. व्यष्टी आणि समष्टी स्वबोधाच्या स्तरानुसार व्यक्तीचे धर्मरक्षण अन् राष्ट्र्ररक्षण यात योगदान होते. स्वबोध नसलेली व्यक्ती राष्ट्र आणि धर्म यांवर प्रेम करत असली, तरी तिच्या हातून जाणते अजाणतेपणी राष्ट्र अन् धर्म यांची हानी होत रहाते. ‘स्वधर्म न जाणता झालेले अन्य सर्व बोध हेसुद्धा हिंदू आणि हिंदु धर्म यांवरील मोठे संकट आहे’, हे लक्षात घेतले पाहिजे.
१ आ १. योग्य स्वबोधाचे पांडव हे उत्तम उदाहरण ! : महाभारताचे उदाहरण पहाता येथे पांडव हे योग्य स्वबोधाचे उत्तम उदाहरण होय. पांडव धर्माचरणी होते. ते धर्मपरायण होते. त्यांनी साधना केली होती. त्यांच्या आचरणात नीतीमत्ता आणि नम्रता होती. त्यांना सत्ता किंवा राज्य यांची लालसा नव्हती. ते कौरवांविषयी द्वेष आणि ईर्ष्या ग्रस्त नव्हते. त्यांनी धर्ममर्यादांचे पालन केले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाची महती जाणली होती. त्यांच्याजवळ त्यागाची भावना होती. या सर्वांमुळे पांडव हे योग्य स्वबोधाचे उदाहरण ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभे रहाणारे, तसेच महाराणा प्रतापच्या पाठीशी उभे रहाणारे राजे, सरदार या सदरात मोडतात.
१ इ. विकृत (धर्मप्रतिकूल) स्वबोध : जेव्हा अज्ञानापोटी, चुकीच्या संस्कारांपोटी किंवा द्वेष आणि ईर्ष्या यांपोटी एखाद्या व्यक्तीला होणारा स्वबोध धर्मानुकूल न होता धर्मप्रतिकूल स्वबोध होतो, तेव्हा तो ‘विकृत स्वबोध’ असतोे.
१. व्यष्टीचा स्वबोध विकृत झाल्याने तिला समष्टी स्वबोध होणे शक्य होत नाही.
२. विकृत स्वबोधाचा परिणाम असा असतो की, ते स्वधर्म आणि स्वधर्मीय यांच्या विरुद्ध उभे ठाकतात. ते स्वधर्मियांच्या विरोधात वैचारिक, बौद्धिक, तसेच शारीरिक संघर्ष करतात.
३. तथाकथित साम्यवादी, पंथनिरपेक्षतावादी, प्रगतीवादी आणि नास्तिक लोक हे सर्व या संज्ञेमध्ये मोडतात.
१ इ १. कौरव हे विकृत स्वबोधाचे उत्तम उदाहरण असणे : महाभारतातील कौरव हे विकृत स्वबोधाचे उत्तम उदाहरण होय. त्यांना ना धर्माचरणाचे महत्त्व लक्षात आले, ना भक्तीभावाचे महत्त्व लक्षात आले, ना साधनेचे, ना धर्मपरायणतेचे महत्त्व लक्षात आले. त्यांना भगवान श्रीकृष्णाचेही महत्त्व ध्यानात आले नाही. त्यांना केवळ सत्ता, धन, स्त्री आदींची लालसा होती. पांडवांविषयी द्वेष आणि ईर्ष्या होती. द्रौपदी ही कुरुवंशाच्या राजवंशाची सून आहे. ती आपल्या चुलत भावाची पत्नी आहे, याचेही त्यांना भान नव्हते. त्यांना द्युत खेळतांना धर्मपरायणता नव्हे, तर नीतीमत्तासुद्धा नव्हती. त्यांच्याकडे केवळ कपट आणि धूर्तता होती. हे सर्व स्वार्थपूर्ती, सत्ता आणि स्वेच्छापूर्तीसाठी होते; म्हणून हा ‘विकृत स्वबोध’ म्हणू शकतो.
इतिहासातील ज्या राजांनी परकीय सत्तेशी हात मिळवून आपल्या स्थानिक शत्रूचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला, ते सर्व या सदरात मोडतात. अपवाद वगळता अन्य पंथ जे धर्म संकल्पना मानत नाहीत किंबहुना धर्म संकल्पनेला विरोध करतात, ते अज्ञानीही एक प्रकारे या प्रकारात मोडतात.
२. हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता
अनेक हिंदूंना प्रश्न पडतो, ‘हिंदु धर्माला हिंदूच विरोध का करतात ?’ त्याचे कारण हिंदूंना धर्मशिक्षण न मिळणे, त्यांना योग्य वेळी योग्य संस्कार न मिळणे, व्यक्तीच्या चित्तशुद्धीसाठी समाजाची किंवा शासकीय व्यवस्था नसणे, व्यक्ती स्वभावदोष आणि अहंकार यांनी ग्रस्त असणे आदी मूलभूत कारणांमुळे ही स्थिती उद्भवते. यांवरून ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित होणे किती आवश्यक आहे’, ते लक्षात येते. ‘शालेय अभ्यासक्रम, देवालये आणि गुरुकुले यांतून धर्मशिक्षण अन् धर्मसंस्कार देणे किती आवश्यक आहे’, ते लक्षात येते. धर्माविषयी धर्मविरोधकांनी केलेला अपप्रचार खोडून काढणे, किती आवश्यक आहे, ते लक्षात येते. (क्रमशः पुढच्या रविवारी)
संकलक : (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२०.५.२०२३)