विदेशातील श्री गणेशाची देवस्थाने आणि त्यांची वैशिष्ट्ये !
सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने…
भारताप्रमाणेच जगातील अन्य काही देशांमध्ये श्री गणेशाची उपासना केली जात असून तेथेही गणेश मंदिरे अस्तित्वात आहेत.
१. नेपाळ
नेपाळमध्ये नटराज नृत्यमुद्रेत, तर काही गणेशमूर्तींवर नागाने फणा उभारल्याच्या मूर्ती आहेत. काही गणेशमूर्तींच्या मस्तकी किरीट आणि चंद्रकोरही आहे. बौद्धमठांच्या प्रवेशद्वारी द्वारपाल गणेशाची आणि तिच्या उजवीकडे महाकालाची मूर्ती असते. शंकू या लहानशा गावी सिद्धिविनायकाचे मंदिर आहे.
भक्तपूर जिल्ह्याच्या उत्तरेकडील एका लघुपर्वतावरील मंदिरात गणेशमूर्ती आहे. ‘नेपाळमध्ये गणपति स्वयंभू असून तो सूर्यकिरणांतून प्रकट झाला’, असे मानतात. त्यामुळे त्याला ‘सूर्यविनायक’ असे नाव पडले. ही मूर्ती ४ मस्तक आणि ४ हात यांची आहे. एका हाती परशू, दुसर्या हाती मोदकपात्र, तिसरा हात आशीर्वाद देणारा आणि चौथ्या हाती जपमाळ असून तो मूषकावर उभा आहे. मंदिरासमोरील स्तुपावर कमळाची आकृती असून त्यावर मूषकाची मूर्ती आहे. काठमांडूमध्ये गणपतीच्या दोन अगदी भिन्न प्रकारच्या पाषाणमूर्ती आहेत. त्यांच्या प्रत्येक पायाखाली उंदीर आहे.
२. चीन
चीनमध्ये गणेशाच्या दोन प्राचीन मूर्ती आढळतात. एक तुनहाँग येथील लेण्यांमध्ये भिंतीवर कोरलेली आहे, तर दुसरी कुंग-हिर वेन येथे खडक फोडून बनवलेल्या मंदिरातील शिला प्रतिमा. ‘या प्रतिमा सहाव्या शतकातील असाव्यात’, असा अंदाज आहे. चीनमध्ये ‘नवायतनात’ (नऊ देवांच्या समुदायात) गणपति आढळतो. चिनी तुर्कस्तानातील एंदेर येथील गणेशचित्र आणि तुनहाँग येथील भित्तीचित्र यांत बरेच साम्य आहे. तुनहाँग येथील गणपतीच्या डाव्या हातात छातीला समांतर असा गजदंत धरलेला आहे, तर एंदेर येथील गणपतीची सोंड डावीकडे वळलेली आहे. इतका दोन्ही गणेशमूर्तींमध्ये भेद आहे.
३. म्यानमार
म्यानमार येथे नदीमुखाजवळ असंख्य लहान गणेशमूर्ती सापडल्या आहेत. त्यावरून ‘तेथे गणेशोपासना होत होती’, असे समजते. येथील गणेशमूर्ती ओबड-धोबड; परंतु हिंदु पद्धतीच्या आहेत. पागान येथे एका भग्न वैदिक मंदिरातील मूर्ती मात्र खास प्रकारची आहे. उच्चासनास्थित गणपति असून त्याचे शरीर ताठ आहे. त्याचा कमरेपर्यंतचा भाग उघडा आहे. त्याने सर्पाचे यज्ञोपवित धारण केले आहे. पंचधातूची ही मूर्ती आहे.
४. जावा (इंडोनेशिया)
जावाला संस्कृतमध्ये ‘यवद्वीप’ म्हणतात. चंताल येथे इ.स. ७३२ मधील एक शिलालेख सापडला असून त्यावर एका शिवलिंग स्थापनेचा उल्लेख, तसेच शिव, ब्रह्मा आणि विष्णु ही नावेही आहेत. त्रिशूलपाणी भगवंताची मंदिरे येथे आहेत, म्हणजेच प्राचीन काळी येथे शिवपूजन प्रचलित होते; मात्र येथे स्वतंत्र अशी गणेश मंदिरे नाहीत; पण शिवमंदिर आवारात गणेशमूर्ती सापडतात.
जावामधील दिआंग पठारावर आढळलेली गणेशाची पाषाणमूर्ती तेथील फार प्राचीन मूर्ती मानली जाते. मूर्ती बसलेली असून चतुर्भूज आहे. पुढचे दोन हात गुडघ्यावर ठेवले असून त्यापैकी उजव्या हातात तुटका दात, तर डाव्या हातात पात्र आहे. मागच्या दोन हातांपैकी एकात परशू, तर दुसर्यात जपमाळ आहे. सरळ खाली लोंबती सोंड असून ती हातातील पात्राजवळ वळलेली अशी आहे. अंगावर आभूषणे आहेत; मात्र मुकुट किंवा किरीट नाही. याच पठारावर तिजंडी परिक्षित येथे आढळलेली गणेशमूर्ती कमलासनारूढ त्याला खालून दोन पक्ष्यांनी आपल्या हातांचा आधार दिला आहे. या मूर्तीच्या कपाळावर त्रिनेत्र आहे आणि मस्तकी मुकुट किरीटाऐवजी कमलपुष्प आहे.
पश्चिम जावामधील एका नदीकाठी करंग केट्स येथे आढळलेली गणेशमूर्ती उभी आहे. मूर्तीची रुंदी उंचीपेक्षा अधिक आहे. मूर्ती चतुर्भूज असून वरच्या दोन हातात परशू आणि जपमाळ आहे, तर खालच्या दोन्ही हातात एक एक पात्र आहे.
८ व्या शतकापूर्वी बाली या निसर्गरम्य बेटात शिव, दुर्गा, विष्णु, सूर्य आणि गणेश या पंचायतनाची उपासना केली जात असे. बाली येथे सापडलेली आणि सध्या लंडनमधील एका इन्स्टिट्यूटमध्ये असलेली पंचरसी धातूची गणेशमूर्ती आठव्या शतकातील असावी, असा अंदाज आहे. ही मूर्ती पुष्कळच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मूर्तीला ४ भुजा होत्या; मात्र आता त्यातील एकच भुजा उरली आहे. ही मूर्ती मांडी घातलेली आहे.
५. थायलंड
थायलंडचे लोक मंगोलवंशीय आहेत आणि त्यांची संस्कृती आर्यसंस्कृतीयुक्त आहे. प्राचीन काळी तेथील राजधर्म हा वैदिक धर्मच होता; मात्र आज तेथे बौद्ध धर्म असूनही राज्याभिषेक आणि अन्य बरेच धार्मिक कृत्ये वैदिक पद्धतीनुसारच केली जातात. तेथे अनेक लहानसर गणेशमूर्ती आहेत. बँकॉकमधील हिंदु मंदिरात गणपतीची पंचारसी धातूची वैशिष्ट्यपूर्ण अशी मूर्ती आहे. हा गणपति मांडी घालून बसलेला आहे. त्याने सर्पाचे यज्ञोपवित धारण केले आहे. हात मांडीवर आहेत. उजव्या हाती मोडका दात आहे.
बाझाक्लिकमधील लेण्यांमध्ये भिंतीवर अनेक कोरीव चित्रे त्यात एक गणेशाचेही चित्र आहे. या चित्रातील गणपति बसलेला असून त्याने सूर्य, चंद्र, पताका आणि मोदक धारक केले आहेत. अंग रत्नजडित असून डोक्यामागे तेजोवलय आहे.
खोतानपासून सुमारे १२० कि.मी. दूरवर खाडलिक या गावी एक चित्र भिंतीवर आणि दुसरे लाकडावर चितारलेले सापडले आहे. तपकिरी किनारीच्या फिक्कट हिरव्या लंबवर्तुळातील चित्र अर्धवट आहे. गळ्यात माळा आणि ३ हात स्पष्ट दिसतात. त्यापैकी एका हातात मोदकपात्र, दुसर्या हातात अंकुश आणि तिसर्या हातात सुळा आहे. वरचा डावा हात नाहीसा झाला आहे. दुसरे चित्र गादीवर सैल मांडी घालून बसलेल्या गणपतीचे आहे. नीलवर्णी मस्तक, दोन्ही दात सरळ, उजवीकडे वळलेली लहानसर सोंड, खांद्यापर्यंत आलेले कान, निळे धोतर, त्यावर पांढरट रंगाचा पट्टा ही मूर्ती चतुर्भूज आहे.
६. बोर्निओ
बोर्निआमध्ये बैठ्या गणेशमूर्ती सापडल्या असून त्या चतुर्भूज आहेत. पायाचे तळवे जोडलेले आहेत. सोंड सरळ, तर कान पंखाकृती पुष्कळ लांब आहेत. कपाळाच्या वरच्या बाजूस एक अरुंदसा मुकुट अन् त्यामागे केस आणि चंद्रकोरीने विभूषित आहे. कोंम्बेंग येथील एका गुहेत ही मूर्ती आढळली. येथे सामाजिक स्वरूपात गणेशोपासना होते. ‘बोर्निआमध्ये वैदिक धर्म होता’, हे सिद्ध करणारा एक शिलालेख कोटेई येथे सापडला आहे.
७. मेक्सिको
मेक्सिकोमधील (दक्षिण अमेरिका) रेड इंडियन्स हत्तीचे मस्तक आणि मनुष्य देहधारी अशा मूर्तीची आजही पूजा करतात. ‘गणेशाचे पाताळातील रूपांतर’ असा या गणेशमूर्तीचा उल्लेख आढळतो. ‘अॅझटेक’ या मयसंस्कृतीतील पूजनीय देवतेचे गणेशाशी बरेच साम्य दिसून येते. ग्रीक पुराणात ‘जॅनस’ नावाची एक बुद्धदेवता मानली असून ती गजमुखी किंवा द्विमुखी आहे. कोणत्याही मंगलकार्यांच्या प्रारंभी तिची आवर्जून पूजा केली जाते. जानेवारी हा वर्षाच्या प्रारंभीचा मासही याच देवतेच्या नावे आहे. जॅनस आणि गणेश यांमध्ये पुष्कळच साम्य दिसून येते.
८. श्रीलंका
वर्ष १९३४-३५ च्या काळात श्रीलंका (सिलोन) येथील मिहिन्तले भागात केलेल्या उत्खननात एक गजमुख गणेशाची मूर्ती सापडली आहे. हा गणपति एकदंत असून त्याच्या बाजूस अन्य सेवकगण आहेत. त्याला २ हात आहेत. हा गण म्हणजे गणेश शिल्पाचे अतीप्राचीन मूळ रूप असल्याचा संशोधकांचा तर्क आहे.
कदरगाम येथील सुब्रह्मण्यम् (कार्तिकस्वामी) मंदिरातही गणेशमूर्ती असून आजही तिची पूजा वैदिक पद्धतीनेच केली जाते. ही गणेशमूर्ती काळ्या पाषाणाची असून चतुर्भूज आहे. ही मूर्ती अनुमाने ३ फूट उंचीची आहे. या मूर्तीशेजारीच श्वेतमांदाराची अनुमाने ६ इंचाची एक गणेशमूर्ती आहे. सुब्रह्मण्यम् आणि गणेश ही दोन्ही दैवते जागृत आहेत.
– कृष्णाजी कोटी