ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाईसाठी गोवा शासनाकडून २७ अधिकार्‍यांची सूची प्रसिद्ध 

पणजी, २२ सप्टेंबर (वार्ता.) – पर्यावरण आणि हवामान पालट खात्याने ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी नव्याने सिद्ध केलेली २७ अधिकार्‍यांच्या नावांची सूची प्रसिद्ध केली आहे. या सूचीमध्ये उत्तर आणि दक्षिण गोवा यांचे जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी, सर्व १२ तालुक्यांचे उपजिल्हाधिकारी, उत्तर आणि दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक, ८ पोलीस उपविभागीय कार्यालयाचे प्रमुख आदींचा समावेश आहे.

नागरिकांना ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात तक्रार करण्यास सुलभ व्हावे, यासाठी सरकारने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमध्ये सर्व २७ अधिकार्‍यांचे भ्रमणभाष क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने वर्ष २००६ मध्ये ‘द सिटीझन्स कमिटी ऑफ नॉइज पोल्युशन’ यांनी प्रविष्ट केलेल्या तक्रारीवरून स्वेच्छा याचिका प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरून गोवा सरकारने अधिकार्‍यांची नावे आणि त्यांचे संपर्क भ्रमणभाष क्रमांक यांची सूची प्रसिद्ध केली आहे. गोवा हे पर्यटनस्थळ आहे. गोव्यात रात्रीच्या पार्ट्यांचे आयोजन करून ध्वनीप्रदूषण करून त्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक व्यावसायिक इच्छुक आहेत. हे व्यावसायिक ध्वनीप्रदूषणावरील निर्बंध हटवण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत, तर दुसर्‍या बाजूला जागरूक नागरिकांचा विशेष करून उत्तर गोव्यातील समुद्रकिनार्‍यावरील नागरिकांचा आरोप आहे की, रात्रीच्या वेळी संबंधित अधिकार्‍यांना लाच देऊन पार्ट्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण केले जात आहे.