भोर (पुणे) येथील गणेशोत्सवाला ‘शिवकालीन’ ३०० वर्षांची परंपरा !
भोर (पुणे) – येथील शिवापुरी आळीतील फडणीस वाड्यामध्ये ‘शिवकालीन’ काळापासून ‘गणेशजन्म सोहळ्या’ची परंपरा आजही राखली जाते. सुमारे ३०० वर्षांपूर्वीची ही परंपरा फडणीसांची १८ वी पिढी पारंपरिक पद्धतीने साजरी करते. हा ‘गणेश जन्मोत्सव सोहळा’ १६ ते २० सप्टेंबर या काळात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून व्यंकोजी फडणीस आणि चिंतामणी फडणीस यांनी भाद्रपद शुक्ल प्रतिपदा ते भाद्रपद शुक्ल पंचमी हे ५ दिवस अष्टविनायक गणपति उत्सवाप्रमाणे उत्सव साजरा केला जातो. श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी फडणीस घराण्यातील वंशज अरुणकाका जोशी यांच्या घरून श्री गणेशमूर्ती सजवलेल्या पालखीतून वाजतगाजत फडणीस वाड्यात आणली जाते. श्री गणपतीला प्रतिदिन १ सहस्र दूर्वा वाहिल्या जातात. दुपारी ११ ते १२.३० या वेळेत कीर्तन आणि नंतर गणेशाला पाळण्यात ठेवून पाळण्याची दोरी ओढून गणेशोत्सव साजरा केला जातो.
याचप्रमाणे पुणे येथील शनिवारवाड्यात पेशवे, मुजुमदार वाड्यात मुजुमदार मागील ३०० वर्षांपासून हा उत्सव साजरा करत आहेत, असे व्यंकटेश फडणीस, नितीन फडणीस आणि प्रमोद फडणीस यांनी सांगितले.