व्यवसाय करत साधनेत संतपद प्राप्त करणारे कतरास, झारखंड येथील यशस्वी उद्योजक आणि सनातनचे ७३ वे (समष्टी संत) पू. प्रदीप खेमका (वय ६४ वर्षे) !
कतरास, झारखंड येथील यशस्वी उद्योजक आणि सनातन संस्थेचे ७३ वे (समष्टी संत) पू. प्रदीप खेमका यांच्याशी त्यांच्या साधनेसंबंधी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी केलेला सुसंवाद आणि त्यातून त्यांचा उलगडलेला साधनाप्रवास पुढे दिला आहे. २० आणि २१ सप्टेंबरला आपण याविषयीची काही सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/721488.html
३. साधना केल्यामुळे आस्थापनाच्या (प्रतिष्ठानच्या) कर्मचार्यांना झालेले लाभ !
सुश्री (कु.) तेजल पात्रीकर : तुमच्या साधनेचा तुमच्या कर्मचार्यांना कसा लाभ झाला, त्याविषयी थोडे सांगा.
पू. खेमका : आमच्या आस्थापनाचे जे सदस्य आहेत, ते साधकच आहेत. मी साधना चालू केल्यापासून त्यांनीही साधना चालू केली.
३ अ. गुरुदेवांच्या मुखातून निघालेला मंत्र, एक शक्तीच आहे, याची एका कर्मचार्याला आलेली अनुभूती !
पू. खेमका : मी वर्ष २००० मध्ये साधना चालू केली आणि आस्थापनाच्या सदस्यांनाही नामजप करायला सांगितला. तेव्हा त्यांच्या जीवनातही परिवर्तन आले. आमच्याकडील एक कामगार मला म्हणाला, ‘‘माझी रक्तातील साखर ५५०-६०० mg/dL (डेसीलिटर) असते (निरोगी व्यक्तीच्या रक्तातील साखरेची सर्वसाधारण पातळी ९० ते १०० मिलीग्रॅम प्रती डेसीलिटर, एवढी असते.) आणि एवढ्या वेतनात माझे भागत नाही. सर्व वेतन माझ्या औषधपाण्यातच खर्च होतो.’’ मी त्याला म्हटले, ‘‘तू एक काम कर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ हे जप कर. त्याने ते दोन्ही नामजप केले आणि त्याच्या रक्तातील साखर एका मासाच्या आत १५० mg/dL वर आली. रक्तातील साखर न्यून झाल्याने त्याच्या औषधावर होणारा व्यय वाचला आणि त्याचे व्यावहारिक जीवन चांगल्या प्रकारे चालू लागले. तो म्हणाला, ‘‘भैय्या, या नामजपात शक्ती आहे. माझे पुष्कळ चांगले झाले.’’
३ आ. आस्थापनात सर्वांची साधना आरंभ झाल्यावर संपूर्ण आस्थापनाचा एक परिवार होणे, सर्व जण समाधानी असणे आणि त्यामुळे स्वतःच्या साधनेसाठी पुष्कळ वेळ मिळू लागणे
पू. खेमका : माझ्या आस्थापनात जे कामगार होते, त्यांनी एकाच वेळी साधना चालू केली. साधनेला आरंभ करण्यापूर्वी कामगार त्यांची संघटना (‘युनियनबाजी’) उभारण्याच्या विचारात होते. त्यामुळे त्यांच्या मनात संघर्ष होता. तेव्हा त्यांना पुष्कळ समजवावे लागत होते. साधनेशी जोडल्यानंतर कधीही संघर्षाची परिस्थिती आली नाही; कारण सर्व जण साधक झाले होते. सर्वांना प.पू. गुरुदेवांनी सांभाळून घेतले होते.
त्यांचे सर्व पालनपोषण गुरुदेवांनी स्वतःवर घेतले होते. त्यांना जेवढे काही मिळत होते, त्यात त्यांचे पालनपोषण होऊन जात होते. त्यामुळे ते समाधानी होते. त्यांच्यासाठी पैसे महत्त्वाचे नव्हते. त्यांचे जीवन, म्हणजे त्यांचे समाधान आणि आनंद असून ती त्यांची साधना होती.
कु. तेजल : आता तर त्यांना एक संतच मार्गदर्शन करायला मिळाले आहेत, तर ते आनंद अनुभवत असतील ना पू. भैय्या !
पू. खेमका : मला ठाऊक नाही; परंतु त्या सर्वांची गुरुदेवांवर अतूट श्रद्धा आहे.
कु. तेजल : आपणच त्याचे कारण आहात. आपण जसे एका परिवाराला जोडून ठेवतो, तसे तुम्ही त्या सर्वांना समष्टीशी जोडून ठेवले आहे.
३ इ. केवळ गुरुकृपेमुळेच कोरोना महामारीच्या कठीण काळात सर्व साधकांद्वारे आस्थापनाचे काम चालू ठेवणे आणि ते कोरोनापासून सुरक्षित रहाणे
पू. खेमका : कोरोनाच्या कठीण काळात कोळशाच्या खाणीचा व्यवसाय पूर्णपणे चालू होता. ताई, यासाठी कृतज्ञतेची पराकाष्ठा व्हायला पाहिजे. कठीण अशा त्या कोरोना महामारीच्या काळात कोरोना महामारीने उच्चांक गाठला होता. त्या वेळी प्रत्येक दिवशी ५००-६०० लोक घरून कामाला येत होते. आमच्या आस्थापनाचे संपूर्ण काम चालू होते. पेट्रोल पंपाचेही पूर्ण काम चालू होते. तेथील खाणीचे सर्व कामकाज (मायनिंग अॅक्टीव्हिटीस) चालू होते. त्यांना ‘कोरोना महामारीचे संकट आलेच नाही’, असे वाटत होते.
कु. तेजल : हे किती विशेष आहे ना !
पू. खेमका : इतके विशेष आहे ना की, आपण म्हणतो ना ‘साधना केल्यामुळे कवच निर्माण होते’, ते मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. ज्या वेळी संपूर्ण जग त्या कोरोनाच्या विळख्यात होते, त्या वेळी आमचे कार्य चालू होते. सर्व लोक कार्य करत होते. ‘क्लिनर, ड्रायव्हर, ऑपरेटर्स, स्टाफ इत्यादी सर्व लोक कार्य करत होते. त्यांनाही मोठे आश्चर्य वाटत होते की, अरे कोरोना काय आहे ?
प.पू. गुरुदेव किती करतात आणि ते नाही करणार, तर कोण करणार ? असे वाटते की, तेच माझे सर्वस्व आहेत.
४. साधकांना संदेश – प्रत्येक कृती गुरुदेवांचे स्मरण करत पूर्ण क्षमतेने करावी !
कु. तेजल : पू. भैय्या आता आपण समष्टीसाठी सांगा की, त्यांनी या काळात टिकून रहाण्यासाठी कशा प्रकारे साधनेचे प्रयत्न केले पाहिजेत ?
पू. खेमका : सर्व साधकांच्या साधनेसाठी माझ्या मनात प्रार्थनाच असते आणि त्यांचे रक्षण करण्यासाठीही प्रार्थना असते. त्यांच्यासाठी माझी इच्छा असते. जसा येथे रामनाथी आश्रम आहे आणि देवद आश्रम आहे, तेथे सर्व संत आहेत. प.पू. गुरुदेव स्वतः येथे आहेत. ते भगवंत तेथे आहेत, ते आपणा लोकांना, बालसाधकांना, दैवी बालकांना किंवा मोठ्या साधकांना पहातात. तेव्हा असे वाटते की, किती चांगले प्रारब्ध आणि किती चांगले भाग्य घेऊन आपण सर्व जण आला आहात. त्यांच्याकडून प्रत्यक्ष जणू जे काही होत आहे, ते तुम्हा सर्वांना मिळते. अशी प्रभावळ (आभा) जे आम्ही दूर आहोत, जे साधक दूर रहातात, त्यांच्याशी आमची प्रत्यक्ष भेट होऊ शकत नाही, तरीही त्यांचे रक्षण करून त्यांच्यावरही अशीच कृपा रहावी आणि त्यांनीही प्रत्येक क्षणी गुरुदेवांना आपल्या समवेत ठेवावे.
त्यांचे चरण घट्ट पकडून ठेवा. त्यांच्यासाठी तुम्ही काय विचार करू शकता ? विचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जा आणि नंतर तशी कृती करा. ज्या गृहिणी आहेत, साधक आहेत, जे घरी रहातात, त्यांना सांगा की, तुम्ही प्रत्येक क्षणी गुरुदेवांना स्वतःसह ठेवा. स्वयंपाक करतांना, लादी पुसतांना, कपडे धुतांना, घरातील सेवा करतांना, घरात सर्वांची सेवा करतांना त्या प्रत्येकामध्ये गुरूंचे रूप बघा.
(समाप्त)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |