‘वेद एज्युकेशन’ संस्थेकडून सनातन शास्त्रांवर आधारित ऑनलाईन पुस्तकालयाच्या निर्मितीसाठी प्रयत्न !
जगातील सर्वांत मोठे पुस्तकालय निर्माण करण्याचा प्रयत्न !
मुंबई – गुजरात राज्यातील ‘वेद एज्युकेशन’ नावाची संस्था सनातन शास्त्रांच्या जगातील सर्वांत मोठ्या ऑनलाईन पुस्तकालयाच्या निर्माणासाठी प्रयत्न करत आहे. संस्थेचे प्रमुख श्री. प्रतीक प्रजापती यांनी सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी केलेल्या संभाषणात सांगितले की, आज इंटरनेटवर सहस्रो प्रकारची शास्त्रे उपलब्ध आहेत. पुस्तकांच्या दुकानात गेलो, तरी तेथेसुद्धा भगवद़्गीता, रामायण, महाभारत आदींवर आधारित शेकडो प्रकारची पुस्तके असतात. प्रत्येक जण स्वत:ची आवृत्ती काढत असतो; परंतु त्यांतील योग्य पुस्तक कोणते ?, हे आपल्याला कळू शकत नाही. आम्ही यासंदर्भात ‘वेद एज्युकेशन लायब्ररी अॅप’ हे अॅप बनवत आहोत.
धर्मप्रसारार्थ सध्या युरोपच्या दौर्यावर असलेले प्रजापती पुढे म्हणाले की, मी गेल्या ८ मासांपासून या अॅपसाठी प्रयत्नशील आहे. आम्ही निर्माण करत असलेले अॅप हे जगातील सर्वांत विस्तृत आणि सुसंघटित ऑनलाईन सनातन लायब्ररी (पुस्तकालय) असणार आहे. या अॅपमध्ये सनातन धर्मातील ४ वेद, गीता, रामायण, पुराणे, उप पुराणे, उपनिषदे, स्मृति, नीति, संहिता, सूत्र, आगम, निगम, आयुर्वेद, ज्योतिष, वास्तु, योग आदींचा समावेश असणार आहे.
‘या अॅपच्या निर्मितीसाठी मला धनाची आवश्यकता असून त्यासाठी हिंदू त्यांच्या परीने दान देऊ शकतात’, असे आवाहन प्रजापती यांनी केले आहे. यासह ‘माझ्या कार्याची माहिती जाणून घेण्यासाठी ‘veducation.world/links’ या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ८६९०९ ३३७६९ या क्रमांकावर संपर्क करावा’, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
प्रतीक प्रजापती यांचा संक्षिप्त परिचय !श्री. प्रतीक प्रजापती हे गेल्या ८ वर्षांपासून सनातन शास्त्रांचे अध्ययन आणि त्यावर संशोधन करत आहेत. ते युवकांना सनातन धर्माचे ज्ञान देऊन अध्यात्माच्या साहाय्याने जीवनात कशा प्रकारे पालट घडवून आणू शकतो ?, यासंदर्भात मार्गदर्शन करतात. त्यांची ‘सनातन संस्कृति का मूलज्ञान’ आणि ‘वैदिक दिनचर्या’ नावाची दोन पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. अॅमेझॉनवर ती युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. ‘ब्रह्मचर्य’ नावाचे त्यांचे आगामी पुस्तक पुढील मासात प्रकाशित होणार आहे. त्यामध्ये युवकांनी हस्तमैथुन, अश्लील व्हिडिओ पहाणे, अमली पदार्थांचे सेवन, जुगार यांसारख्या वाईट सवयी कशा दूर कराव्यात ?, तसेच नैराश्यासारख्या समस्या यांवर उपाय सांगण्यात येणार आहेत. |