Ganeshotsav : सार्वजनिक गणेशोत्सवाचे पालटते स्वरूप आणि योग्य दिशा !
श्री गणेशाच्या आगमनाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पहातो. आता गणरायाचे आगमन झाले आहे. निरनिराळ्या प्रकारचे देखावे उभारण्यात आले आहेत. गणेशोत्सव म्हणजे आनंद आणि चैतन्य यांचा उत्सव असतो, उत्साहही असतो. (Ganeshotsav, Ganesh, Ganpati)
१. गणेशोत्सवाच्या उद्देशाचा विसर !
महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा प्रारंभ पेशव्यांच्या काळात झाला. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून दशमीपर्यंत ७ दिवस हा उत्सव होत असे. गणेशोत्सवाला सामाजिक आणि सार्वजनिक स्वरूप वर्ष १८९४ पासून मिळाले. त्या वेळी लोकजागृतीचे एक मुख्य साधन म्हणून या उत्सवाला प्रबोधनाचे स्वरूप दिले. लोकमान्य टिळक यांनी ‘समाजात ऐक्याची भावना वाढावी’, या हेतूने गणेशोत्सवाची त्यासाठी निवड केली. त्या वेळी हा उत्सव श्री गणेशचतुर्थीपासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत असा १० दिवस चालू करण्यात आला. त्या वेळच्या परिस्थितीत सर्व समाजाला एकत्र करावे आणि राष्ट्रीय अस्मिता जागृत करावी, हा त्यामागचा मोठा उद्देश होता. अर्थातच स्वातंत्र्याच्या आंदोलनात सार्वजनिक गणेशोत्सवात जे लोकजागृती कार्य केले, ते उल्लेखनीय आहे. या गणेशोत्सवाला १२९ वर्षे झाली आहेत; मात्र ज्या उद्देशाने हा उत्सव चालू करण्यात आला, त्याचा समाजाला विसर पडलेला आहे.
२. उत्सवाचे राजकीयीकरण
गेल्या काही वर्षांत उत्सव साजरे करण्यात राजकीय व्यक्तींचा प्रवेश, त्यांचे पाठबळ यांमुळे उत्सवांना वेगळेच स्वरूप प्राप्त होत आहे, हे सत्य नाकारता येणार नाही; कारण राजकीय व्यक्तींकडून आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी अशा मंडळांना मोठमोठ्या देणग्या देऊन आकृष्ट केले जाते. परिणामी हा पैसा योग्य कामी व्यय न होता केवळ ‘डीजे’ संगीत, रोषणाई, मोठमोठ्या मूर्ती आणि इतर अनेक कारणे यांसाठी व्यय होतो. अल्प मंडळांकडून विधायक कामे होतात. गणेशोत्सव मंडळात असणारी बहुसंख्य मंडळी ही तरुणच असतात. अशा वेळी त्या मंडळांकडून होणार्या कार्यक्रमाला विधायक स्वरूप कसे प्राप्त होईल ? सामाजिक ऐक्य कसे टिकून राहील ? पर्यावरणाचा विचार कसा केला जाईल ? किंवा प्रदूषण निर्माण होणार नाही, याची नोंद घ्यायला हवी.
३. मूर्तीसाठी शाडूऐवजी अशास्त्रीय घटक वापरणे
‘उत्सवात पूजेसाठी मातीची मूर्ती असावी’, असे उल्लेख आहेत. अनेक लोक चांदीच्या मूर्तीची स्थापना करतात; परंतु ‘ते शास्त्रसंमत नाही’, असेही म्हटले जाते. ‘भक्तीभावाने केलेली उपासना देवाला मान्य असते’, असे आपण वाचतो, मानतो; परंतु याचा अर्थ नवनवीन पर्याय शोधून काढणे, असा नाही. ज्या मूर्तीचे विसर्जन करता येईल, तीच मूर्ती पूजेसाठी घ्यावी. मातीच्या मूर्ती पुष्कळ महाग मिळतात. त्यामुळे त्या घेण्याकडे कल नसतो. पर्यावरणप्रेमींकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना विरोध केला जातो. परिणामी उत्सवानंतर या मूर्तींची स्थिती कशी होते ? हेसुद्धा आपण दूरचित्रवाणीवरून बघतो.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आदी अनेक ठिकाणी महापालिकांनी ‘पीओपी’च्या श्री गणेशमूर्तीवर बंदी आणलेली आहे. काही ठिकाणी मूर्तीही जप्त करण्यात आलेल्या आहेत. प्रदूषण महामंडळाने याविषयी आदेश दिलेले आहेत. त्यामुळे योग्य त्या किंमतीत शाडूच्या मातीच्या मूर्ती बाजारात मिळायला हव्यात, त्या उपलब्ध करून देता येईल, हे बघायला हवे. याविषयी समाजात प्रबोधन व्हायला हवे.
४. उत्सवांत धार्मिकतेला महत्त्व हवे !
केवळ मोठ्या प्रमाणात केलेली रोषणाई, मूर्तीची उंची, सजावटीतील भडकपणा यावरून भक्तीभाव किंवा मंडळाची प्रतिष्ठाही ठरत नाही. खरे म्हणजे अशा उत्सवांमधून काहीतरी प्रबोधन, लोकशिक्षण, जनजागृती होईल, हाच विचार करायला हवा. लोकमान्य टिळक यांचा विचार साध्य होईल, अशा रितीने प्रत्येक मंडळाने काही कार्यक्रम आयोजित करायला हवेत. सध्याच्या परिस्थितीत गणेशोत्सवाचे स्वरूप पालटलेले आहे. धार्मिकतेपेक्षा इतर गोष्टींना महत्त्व दिले जाते. मोठ्या मूर्ती, देखावे झगमगाट, रोषणाई, ‘डीजे’च्या तालावर कर्कश गाणी हे प्रमाण वाढले आहे. अगदीच तुरळक मंडळांमध्ये गणपति अथर्वशीर्षाचे पठण होते. पुण्यात सहस्रोंच्या संख्येने महिला ऋषिपंचमीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्षाचे पठण करतात. काही वर्षांपूर्वी गणेश व्याख्यानमालेसारखे उपक्रम केले जात होते; पण असे काहीच ठिकाणी घडते.
‘डी.जे.च्या कर्कश तालावर जी गाणी लावली जातात, तो प्रकार कुठेतरी थांबवावा’, असे वाटते. उत्सव साजरा करण्यातूनच आनंद, समाधान मिळायला हवे; पण त्यापासून कुणाला त्रास होणार नाही, हा विचारही मनात हवा. उत्सवामागील उद्देशांचा विसर पडायला नको.
५. गणेशोत्सव हिंदु संस्कृतीचा ठेवा !
लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाच्या सार्वजनिकतेत जो सांस्कृतिक वैभवाचा ठेवा दिला, त्या निमित्ताने या उत्सवात सर्व जाती-धर्मांच्या लोकांनी एकत्र यावे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे व्हावेत, स्पर्धा व्हाव्यात, एकमेकांत बंधूभाव, देशप्रेम निर्माण व्हावे आणि गणेशोत्सवाचे पावित्र्य कायम ठेवून लोकसंस्कार व्हायला हवेत. तसे झाल्यासच गणेशोत्सव साजरा करण्याचा हेतू साध्य होईल. आपल्या संस्कृतीला शोभतील, अशाच स्वरूपात उत्सव साजरे करायला हवेत. कुठलेही अपप्रकार घडणार नाहीत किंवा अपप्रवृत्तींचा शिरकाव होणार नाही, याचे भान ठेवायला हवे. सण, उत्सव हे सर्वच आपल्या हिंदु संस्कृतीचा ठेवा आहेत.
– श्री. दिलीप देशपांडे, जामनेर, जळगाव.