कॅनडाला ‘धोकादायक देश’ म्हणून घोषित करणे आवश्यक !
१. भारत आणि कॅनडा यांच्या संबंधांमध्ये तणाव
‘कॅनडाने भारताच्या राजदूताला देशाबाहेर जायला सांगितले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही कॅनडाच्या दुतावासातील वरिष्ठ अधिकार्याला ५ दिवसांत भारत सोडण्यास सांगितले आहे. कॅनडामधील खलिस्तानी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यास कॅनडा सरकार सिद्ध नाही. याविषयी भारताचे पंतप्रधान मोदी यांनी त्यांना चेतावणी दिली होती; पण ते ऐकण्यास सिद्ध नाही. उलट तेथील ‘खलिस्तानी समर्थक हरदीप सिंह निज्जर याची हत्या करण्याचे काम भारताने केले आहे’, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केला आहे.
२. सत्ता टिकवण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांचे खलिस्तानी आतंकवादाकडे दुर्लक्ष
‘कॅनडामध्ये खलिस्तानी कारवाया चालू असतात. त्यांना नियंत्रित न करता कॅनडा त्यांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करतो आणि त्यांना वाटेल त्या कारवाया करू देतो. खलिस्तान्यांनी तेथील भारतीय दुतावासातील कर्मचार्यांना धमकी दिली, ‘‘तुम्ही बाहेर आलात, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू.’’ अलीकडेच त्यांनी कॅनडामध्ये ‘खलिस्तान सार्वमत २०२३’ घेण्यात आलेे. त्या अंतर्गत त्यांनी ‘शीख समाजाला भारतात रहायचे आहे कि नाही ?’, असे विचारले. याखेरीज भारतात कुठेही हिंसाचार होत असेल, तर त्याला खलिस्तानी आतंकवादी साहाय्य करतात. एवढेच नाही, तर अनेक मूळ भारतीय निवासींवर त्यांच्याकडून आक्रमणे होत असतात. या विरोधात कॅनडा सरकार काहीही करायला सिद्ध नाही.
याला मतपेटीचे राजकारण कारणीभूत आहे. तेथे शीख लोकसंख्या ३ लाखांच्या आसपास आहे; पण तेथील जगमीत सिंह यांच्या पक्षाने २१ जागा जिंकल्या आहेत. ते ट्रुडो यांना सत्तेत रहाण्यासाठी साहाय्य करतात. त्यामुळे या खलिस्तानवाद्यांचा या ट्रुडोवर अतिशय प्रभाव आहे. या प्रभावामुळे भारत आणि कॅनडा यांच्यात होणारा ‘मुक्त व्यापार करार’ थांबवण्यात आला आहे.
३. भारत-कॅनडा यांच्यातील संबंध रसातळाला !
आता भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध रसातळाला पोचले आहेत. ज्याप्रमाणे भारतात मतपेटीचे राजकारण केले जाते, तसे ते कॅनडातही केले जाते. खलिस्तान्यांच्या विरोधात सर्व देश कारवाई करत आहेत; मात्र कॅनडाचे सरकार त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास अजिबात सिद्ध नाही. त्यामुळे कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध सुधारणे कठीण आहे. ‘खलिस्तानवादी आतंकवाद्यांना साहाय्य करून कॅनडा हा भारतविरोधी कारवाई करत आहे’, हे भारताने कॅनडाला सांगितले आहे; पण त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. यापुढे भारताने कॅनडाला एक ‘धोकादायक देश’ म्हणून घोषित करायला पाहिजे. त्यामुळे भारतातील पर्यटकही कॅनडामध्ये जाणार नाहीत.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.