बुद्धीभेद, निखालस खोटे आरोप अन् हिंदूंमध्ये दुफळी निर्माण करण्याचे कारस्थान !
दैनिक ‘लोकसत्ता’ने १६ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या ‘सनातन (धर्म) संकट’ या अग्रलेखावर वैद्य परीक्षित शेवडे यांचा सडेतोड प्रतिवाद !
‘दैनिक ‘लोकसत्ता’ने १६ सप्टेंबर या दिवशी ‘सनातन (धर्म) संकट’ याविषयीचा अग्रलेख प्रसिद्ध केला. डाव्यांची (साम्यवाद्यांची) बुद्धीभेदाची ठराविक (टिपिकल) पद्धत आहे, ज्यामध्ये ‘असंबद्ध गोष्टी एकत्र आणायच्या, त्यांची एकमेकांशी सांगड घालायची, त्याविषयी असंबद्ध प्रश्न निर्माण करायचे, त्या प्रश्नांची जंत्री करून समोरच्याला त्याची उत्तरे देण्याच्या कामाला लावायचे.’ तरीही जे लोक कुंपणावर बसलेले असतात, साम्यवाद्यांच्या अशा लिखाणाने त्यांचा बुद्धीभेद होऊ शकतो. त्यांच्याकरता काही सूत्रे येथे देत आहे. २२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध लेखात आपण ‘संपादकांनी लेखात दिलेले चुकीचे संदर्भ, हिंदु धर्माला आधुनिक तंत्रज्ञानाचे वावडे नसणे आणि, साम्यवाद्यांनी ‘ऑर्थोडॉक्स’चे मराठी भाषांतर ‘सनातनी’ असे चुकीचे करून तो रुजवणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(उत्तरार्ध)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/721683.html
७. स्त्रियांचे शिक्षण नाकारणे किंवा स्त्रियांनी सती जाणे, याविषयी केलेली टीका चुकीची !
‘स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य ही आधुनिक समाजाची अपरिहार्य तत्त्वे आहेत; ती सनातन धर्माला मान्य होतील का ?’, अशा आशयाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पण सनातन धर्माने स्त्रियांचे शिक्षण कधी नाकारले ? असे असते, तर आमच्याकडे ज्या महिला विदुषींची (विद्वानांची) नावे दिसतात, त्यात गार्गी, मैत्रेयी या ऋषि पत्नींची नावे दिसली नसती. आम्हाला ‘खेलराजाची पत्नी वीरवनिता विश्पलासारखी राणी ही रणांगणात लढत होती; म्हणून तिचा पाय कापला गेला’, हे वर्णन दिसले नसते. आम्हाला सत्यभामा रणांगणात लढतांना दिसली नसती. ‘युद्धात दशरथाचे प्राण वाचवले; म्हणून दशरथाने कैकयीला वर दिला’, हा संदर्भ दिसला नसता. याचा अर्थ स्त्रियांचे दमन करणार्या प्रथा आमच्याकडे कधीच पूर्वापार नव्हत्या. कालओघात त्या त्या काळात काही अनिष्ट गोष्टी घडल्या असतील, तर अशा गोष्टी घडू नयेत, यासाठी प्रयत्न हिंदु धर्मातील लोकांनीच कार्य केले आहे. त्यासाठी बाहेरून कुणी येण्याची आवश्यकता आम्हाला लागली नाही. आमचा काही एका पुस्तकावर चालणारा आणि आपल्या श्रद्धांना न मानणार्या व्यक्तींना जगण्याचा अधिकार नसल्याचे प्रतिपादन करणारा पंथ नाही. त्यामुळे अग्रलेख म्हणतो तसे ‘सनातन धर्माचा पुरस्कार करणार्यांनी आधुनिक तत्त्वांचे काय करायचे ?’, असे होऊ शकत नाही; कारण ‘सनातन’ या शब्दाचा अर्थच मुळात ‘नित्य नूतन’ आहे. जे सतत वहातच जाणारे आहे. त्यामुळे हा मुद्दाच आम्हाला लागू होत नाही.
८. वैचारिक गोंधळाचे पडसाद साम्यवाद्यांमध्येच !
मुळात अशी विधाने करणार्या उदयनिधी स्टॅलिन यांच्या पक्षाचा इतिहास लक्षात घ्यायला हवा. जयललिता यांचा भर विधानसभेत विनयभंग करण्यात आला होता, हे विसरून चालेल ? अशी विधाने करणार्या व्यक्तींच्या मागे बहुतांशी वेळा साम्यवादी शक्ती असतात. सनातन धर्मावर बोलणार्या त्यांच्यात तरी कुठे एकवाक्यता आहे ? ते कार्ल मार्क्सविषयी बोलत आहेत का ? कि ते ‘दास कॅपिटाल’विषयी (कार्ल मार्क्सने लिहिलेले पुस्तक) बोलत आहेत ? हा साम्यवाद्यांचा वैचारिक गोंधळ आहे. त्यांना साम्यवादी विचारवंत (?) माओ याला ‘फॉलो’ (अनुनय) करायचे आहे, मार्क्सला ‘फॉलो’ करायचे आहे ? कि रशियाचा साम्यवादी क्रांतीनेता व्लादिमिर लेनिनला ‘फॉलो’ करायचे आहे ? अशा या वैचारिक गोंधळाचे पडसाद साम्यवाद्यांमध्येच आहेत. त्यांनी सनातन धर्मात लक्ष घालण्यापेक्षा स्वतःच्या वैचारिक गोंधळाला पहावे. आपलीच विचारसरणी किती पोथीप्रामाण्यवादी झाली आहे, याची चिंता करावी.
९. हिंदूंमध्ये दुफळी माजवण्याचे षड्यंत्र
हिंदु धर्माविषयी अग्रलेख सांगतो; ‘त्या सनातन धर्मातील कोणत्याही १० गोष्टी सांगाव्यात की, त्यांची ते व्याख्या करू शकतील.’ मुळात ‘सनातन धर्म’ आणि ‘हिंदु धर्म’ हे दोन्ही वेगळे नाहीत. यामध्ये भेद दाखवून साम्यवाद्यांना हिंदूंमध्ये दुफळी माजवायची असते; इथेही तीच री ओढली गेल्याचे दिसते. बाकी सर्व बाजूला ठेवून ‘सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयान्न ब्रूयात सत्यम्प्रियम् । प्रियं च नानृतं ब्रूयादेष धर्मः सनातनः ॥’ (अर्थ : सत्य बोला, प्रिय बोला; पण अप्रिय सत्य बोलू नये आणि प्रिय असत्य न बोलणे, ही सनातन धर्माची परंपरा आहे.) ही एक सनातन धर्माची व्याख्या तरी संपादक महाशयांना पाळता येते का ? हे त्यांनी पहावे.
१०. ‘लोकसत्ता’च्या संपादकांचा अपकीर्त इतिहास
हे तेच संपादक आहेत की, ज्यांनी ‘असंताचे संत’ नामक संपादकीय लिहिले आणि नंतर ते मागे घेतले. वृत्तपत्रीय इतिहासात हा पराक्रम अन्य कुणाच्या नावे असेल, असे वाटत नाही ! हे तेच संपादक आहेत की, ज्यांना ‘प्रेस कौन्सिल’ने फटकारून झाले आहे. एका प्रकरणात चुकीची माहिती छापल्याबद्दल याच वृत्तपत्राने माफीनामा प्रकाशित करून झाला आहे. स्वतः संपादक महाशयांनी साहित्य चौर्य (चोरी) केल्याचेही प्रकरण आहे. ज्यांचा स्वत:चा इतिहासच अशा पद्धतीचा राहिला आहे. त्यांनी हे प्रश्न कोणत्या अधिकारात उपस्थित करायचे ? आणि त्याला आम्ही काय म्हणून उत्तरे देत बसायची ?
११. साम्यवाद्यांचे राष्ट्रघातकी धोरण
साम्यवाद्यांनी कधीच लोकशाही मानलेली नाही. त्यामुळे त्यांनी राज्यघटना, लोकशाही याच्या गोष्टी करू नयेत. जगात सर्वाधिक रक्तपात हा त्यांनीच घडवून आणला आहे. बुद्धीभेद कसा करायचा ? याविषयी युरी बेझमेनोव्हने समोर आणलेल्या सबव्हर्जनचा (खोटा इतिहास मांडणे) संदर्भ देता येईल. कशा पद्धतीने लोकांची मते पालटायची आणि त्यांचा बृद्धीभेद करायचा ? यांचे बुद्धीभेद करण्यामागील धोरण ‘संपूर्ण देशाला खिळखिळे करा, अराजक माजवा, सत्ता काबीज करा आणि अजून काही प्रमाणात रक्तपात घडवून आणता येतो का ? हे पहा’, असे आहे. म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय योग्य शब्दांमध्ये सांगितले, ‘इंडिया’ नामक (विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव) या ‘घमंडिया’ संघटनेचा उद्देशच देशाच्या मूळ स्थानांवर घाला घालणे, हा आहे.’ ही छोटी टूलकीट्स (देशविरोधी यंत्रणा) आहेत. आज भारत अशा अनेक आघाड्यावर काम करत प्रगती करतांना दिसत आहे.
१२. साम्यवादी हे आयुर्वेदविरोधी !
‘कोविड’मध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर आज भारताला ‘जी-२०’ परिषदेच्या माध्यमातून चांगला जागतिक प्रतिसाद मिळत आहे. हे तेच लोक आहेत की, जे आयुर्वेदाविषयीही खोटनोटे पसरवत असतात. जेमतेम ४ दिवसांपूर्वी बातमी आली आहे की, आयुष मंत्रालयाने अधिकृत केलेले ‘ट्वीट’ आहे की, ब्राझिल देशामध्ये ९ सहस्र संस्थांमध्ये आयुर्वेदाला ‘समकालीन औषधे’ (कंटेंमपररी मेडिसिन) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ही मोठी संधी आहे. कोरोना महामारीच्या नंतर भारतात एक आंतरराष्ट्रीय केंद्र उभारले गेले आहे की, जे आयुर्वेदाचे असून ते जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न आहे. आजपर्यंत साम्यवादी हे आयुर्वेदाच्या विरोधातच होते. त्यांना ‘आयुर्वेद भारतीय आहे’; म्हणून त्यांना नको आहे. आयुर्वेदाची जी काही संशोधने होतात, ती छापायची या लोकांची (साम्यवाद्यांची) सिद्धता नसते. सदर वर्तमानपत्रही आयुर्वेदावर बेछूट आणि आधारहीन आरोप करण्यात मुळीच मागे नसते.
१३. उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्य अहिंसेच्या तत्त्वज्ञानात बसते का ?
तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदु धर्माविषयी जे वक्तव्य केले, हे ज्या गांधींचे गोडवे सातत्याने हेच लोक गात असतात; त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाला शोभणारे आहे का? हे वक्तव्य लोकशाहीच्या तत्त्वज्ञानात बसते का ? ही राज्यघटना संमत भाषा आहे का?
प्रश्न विचारायचे झाल्यास आम्हीही विचारू शकतो; अभ्यासपूर्वक आणि संदर्भासह विचारू शकतो. म्हणूनच आम्ही सनातन धर्माचे पाठीराखे असत्यकथन करणार्यांना गैरसोयीचे वाटत रहातो; कारण या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नसतात !’
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (१९.९.२०२३)
(समाप्त)
संपादकीय भूमिका‘संपूर्ण देशाला खिळखिळे करा, अराजक माजवा, सत्ता काबीज करा आणि रक्तपात घडवून आणा’, हेच साम्यवाद्यांचे धोरण ! |