रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘एका शिबिरा’च्या वेळी मुंबई येथील श्री. बळवंत पाठक यांना आलेल्या अनुभूती
एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘एक शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी मुंबई येथील श्री. बळवंत पाठक यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ‘शिबिराला उपस्थित असलेल्या संतांच्या रूपातून देवतांचे अस्तित्व कसे कार्यरत आहे ?’, याची जाणीव होणे
१ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ : यांच्या माध्यमातून श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व कार्यरत असून सर्व साधकांना सेवेसाठी दिशा, प्रेरणा आणि ऊर्जा मिळते.
१ आ. सद़्गुरु अनुराधा वाडेकर : यांच्या माध्यमातून श्री दुर्गामातेचे तत्त्व कार्यरत असून साधकांमधील स्वभावदोष आणि अहं रूपी असुरांचा नाश करण्यासाठी साधकांना बळ मिळते.
१ इ. सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे : यांच्या माध्यमातून श्री दत्तगुरूंचे तत्त्व कार्यरत आहे. ईश्वरी कार्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातूनच समष्टीला मिळते.
१ ई. सद़्गुरु नंदकुमार जाधव : यांच्या माध्यमातून श्री गणेशतत्त्व कार्यरत असून समष्टीला ऊर्जा आणि चैतन्य मिळते.
१ उ. सद़्गुरु सत्यवान कदम : यांच्या माध्यमातून भगवान शिवाचे तत्त्व कार्यरत असून समष्टी कार्यातील मोठ्या अनिष्ट शक्तींचे अडथळे दूर होत आहेत.
१ ऊ. सद़्गुरु नीलेश सिंगबाळ : यांच्या माध्यमातून प्रभु श्रीरामाचे तत्त्व कार्यरत असून साधकांना समष्टी कार्याचे सुव्यवस्थापन करण्यासाठीचे बळ मिळते.
१ ए. पू. रमानंद गौडा : यांच्या माध्यमातून श्री हनुमंताचे तत्त्व कार्यरत असून हिंदु राष्ट्र-स्थापना करण्याचे बळ मिळते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या जागी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन होऊन भावजागृती होणे
शिबिराच्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ व्यासपिठावरून मार्गदर्शन करत होत्या. त्या वेळी त्यांच्या जागी मला सूक्ष्मातून श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन होऊन देवीने मुकूट आणि विविध अलंकार धारण केलेले दिसले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे पाहून भावजागृती झाली.
वरील अनुभूतींतून ‘श्रीविष्णु पृथ्वीवर अवतार घेतो. तेव्हा सर्व देवताही त्याच्या समवेत अवतार घेतात; म्हणून सनातनचे संत हे दुसरे-तिसरे कुणी नसून साक्षात् देवतांचेच अवतार आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून रामराज्य साकारणार आहे’, असे मला जाणवले.’
– श्री. बळवंत पाठक, मुंबई (२१.६.२०२२)
|