ओंकारेश्‍वर   (मध्यप्रदेश) येथे आद्य शंकराचार्य यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ वननेस’ मूर्तीचे अनावरण !

५ सहस्र साधू-संतांची वंदनीय उपस्थिती !

खंडवा (मध्यप्रदेश) – येथील ओंकारेश्‍वरच्या ओंकार पर्वतावर स्थापित आद्य शंकराचार्य यांच्या १०८ फूट उंच मूर्तीचे अनावरण करण्यात आले. ५ सहस्र साधू-संतांच्या वंदनीय उपस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले. आद्य शंकराचार्य यांना ‘एकात्मकतेचे प्रतीक’ संबोधून या मूर्तीला ‘स्टॅच्यू ऑफ वननेस’ असे नाव देण्यात आले आहे. या मूर्तीमध्ये आद्य शंकराचार्यांना १२ वर्षे वयाच्या बालरूपात दाखवण्यात आले आहे. अनावरणानंतर संतांसमवेत चौहान यांनी मूर्तीला प्रदक्षिणा घातली.

१. ओंकारेश्‍वर ही आद्य शंकराचार्य यांची ज्ञान आणि गुरु भूमी आहे. येथेच त्यांना त्यांचे गुरु गोविंद भगवत्पाद भेटले होते. येथेच त्यांनी ४ वर्षे राहून विद्या अध्ययन केले.

२. वयाच्या १२ व्या वर्षी ओंकारेश्‍वर येथून त्यांनी अखंड भारतामध्ये वेदांच्या प्रचारासाठी प्रस्थान केले होते.

३. येथे प्रस्थापित मूर्ती महाराष्ट्राच्या सोलापूरचे प्रसिद्ध मूर्तीकार भगवान रामपुरा यांनी कोरली आहे. मूर्ती बनवण्यासाठी आवश्यक बाल शंकराचे चित्र मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी वर्ष २०१८ रेखाटले होते.