मुंबईत ‘वेफर्स’पासून बनवली श्री गणेशमूर्ती !

(वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

मुंबई – बटाटा आणि केळे यांच्या वेफर्सपासून श्री गणेशाची मूर्ती बनवण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रसारित करून ‘ती कशी वाटली?’, याविषयीची मतेही मागवण्यात आली आहेत. ही मूर्ती बनवण्यासाठी उडीद डाळ आणि साबुदाण्याचे पापडही वापरण्यात आले आहेत. या व्हिडिओ ८ लाखांहून अधिक जणांनी पाहिला असून या कल्पनेचे काहींनी कौतुकही केले आहे. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने असे प्रकार घडत आहेत ! देवतेची मूर्ती निर्माण करण्याचा उद्देश मनोरंजन नव्हे, तर उपासना हा असला पाहिजे. अशी मूर्ती बनवणार्‍याला आणि दर्शन घेणार्‍यांना दोघांनाही लाभ होईल का ? – संपादक)

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदुद्रोही कृती !

खाद्यपदार्थांपासून श्री गणेशाची मूर्ती बनवणे किंवा मूर्तीला अशा प्रकारे खाद्यपदार्थ लावणे, म्हणजे देवतेचे विडंबनच होय. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंना हे लक्षात येत नसल्याने नाविन्याच्या नावाखाली, असे काही तरी केले जाते. खाद्यपदार्थांपासून बनवलेल्या मूर्तीला कीटक, मुंग्या आदी लागू शकतात आणि त्याची अधिक विटंबना होऊ शकते. श्री गणेशमूर्ती बसवण्याचा उद्देश त्या देवतेची उपासना करणे आणि चैतन्याचा लाभ घेणे हा असतो. शाडूमातीच्या मूर्ती अधिक सात्त्विक असते. हिंदूंनीही अशा प्रकारे मूर्ती करणार्‍यांचे प्रबोधन केले पाहिजे !